महापालिकेतर्फे मिळणार शवपेटीची सुविधा
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १४ ः शहरातील कुटुंबांमधील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर परगावी किंवा परदेशात असलेले नातेवाईक येईपर्यंत मृतदेह सुस्थितीत जतन करून ठेवणे अनेकदा जिकिरीचे ठरते. नागरिकांची हीच गरज ओळखून आता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शवपेटी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नगरसेवक राजू वैद्य यांनी शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या या प्रस्तावाला महापौर समीर राजूरकर यांनी मंजुरी दिली.
सभागृहात याविषयी वैद्य म्हणाले, शहरातील अनेक नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त परराज्यात किंवा परदेशात स्थायिक झाले आहेत, त्यांचे वृद्ध आई-वडील आणि कुटुंबीय शहरात राहतात. अशा कुटुंबांत कोणाचे निधन झाल्यास घरातील प्रमुख व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये पोचेपर्यंत अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अशावेळी एक-दोन दिवस मृतदेह जतन करून ठेवावा लागतो. सध्या शहरात सरकारी व खासगी रुग्णालयांत शवागारे उपलब्ध आहेत. मात्र, मृतदेह घरातून शवागारात नेणे आणि अंत्यसंस्कारावेळी पुन्हा घरी आणणे ही प्रक्रिया नातेवाइकांसाठी अत्यंत क्लेशदायक आणि खर्चिक असते. प्रत्येक कुटुंबाला हे शक्य होतेच असे नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच शवपेट्या उपलब्ध करून दिल्यास, नागरिकांना त्या थेट घरी नेऊन वापरता येतील आणि मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली. यासाठी नगरसेवकांनी आपला स्वेच्छानिधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना नगरसेवक मनोज गांगवे यांनी मांडली. शवपेट्यांची देखभाल आणि व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे व्हावे, यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेला या उपक्रमाशी जोडून घ्यावे, असे मत नगरसेवक प्रमोद राठोड यांनी व्यक्त केले. चर्चेनंतर महापौर समीर राजूरकर यांनी सर्व नगरसेवकांच्या सूचनांची दखल घेत प्रशासनाने प्रस्तावात आवश्यक ते सकारात्मक बदल करावेत, असे निर्देश दिले.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.