पाणी, चारा, पिक पस्थितीचा आढावा
--------------
प्रशासनास पालकमंत्री बोर्डीकरांचे सतर्कतेचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २० ः जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्ह्यातील खरीप पिकांची स्थिती, पीकविमा, विविध प्रकल्पांतील पाणीसाठा, चाऱ्याची उपलब्धता, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांना पाणी व इतर मूलभूत सुविधांबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच व्हर्च्यूअल पद्धतीने उपस्थित होते. बैठकीत ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने टंचाई कृती आराखडा तयार करावा, तसेच उपलब्ध पाणी आणि चाऱ्याचे प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. जलजीवन मिशनअंतर्गत बंद असलेल्या अथवा दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. या योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करण्यास संबंधित यंत्रणांना सांगण्यात आले. पाटबंधारे विभागाने परिस्थितीनुसार जायकवाडी व येलदरी प्रकल्पातील पाण्याचा उपलब्ध साठा आणि संभाव्य गरज यांचे नियोजन करावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील नागरिक तसेच शेतकऱ्यांना पाणी, चारा आणि इतर आवश्यक बाबींसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
---
मुदतपूर्व पीक कापणी प्रयोगाचे आवाहन
अनावृष्टी, कीड किंवा रोगामुळे एखादे पीक पूर्णपणे नष्ट झाले असेल, संबंधित शेतकरी पुढील पीक घेण्याच्या तयारीत असेल, तर निवडक शेतांमध्ये मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग घेऊन प्रत्यक्ष उत्पादनाची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले. उत्पादन शून्य आढळल्यास ग्रामस्तरीय समितीच्या उपस्थितीत पंचनामा करण्याची कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले. पीक काढणीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बैठकीत दिली.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.