जनतेच्या पैशांवर दरोडा; बोगस बिले आणि २० टक्के कमिशन
महावितरणमध्ये १३.७० कोटींचा महाघोटाळा; मुंबईची समिती कुंडली उघड करणार
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ६ : महावितरणच्या बीड विभागीय कार्यालयात देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली जनतेच्या हक्काच्या तब्बल १३ कोटी ७० लाख रुपयांवर राजरोसपणे डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत. कार्यकारी अभियंता सुबोध डोंगरे आणि नागपूरहून चांगलाच अनुभव घेऊन आलेले सहायक अभियंता (खरेदी) श्रीनू चुक्का यांनी संगनमत करून केलेल्या महाघोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुंबईच्या उच्चस्तरीय समितीने बीडमध्ये तळ ठोकला आहे. या समितीच्या चाललेल्या कसून चौकशीमुळे महावितरणच्या भ्रष्ट वर्तुळात प्रचंड भूकंप आला असून, लवकरच हा स्फोटक अहवाल मुंबईतील वरिष्ठांच्या टेबलवर धडकणार आहे.
ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महामंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात बीड विभागाला १३.७० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला होता. मात्र, जनतेच्या या पैशांवर दरोडा टाकण्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीतील कंत्राटदारांशी अभद्र हातमिळवणी केली. कामांचे वाटप, खरेदी प्रक्रिया आणि देयकांची मंजुरी यावर पूर्णपणे ताबा मिळवून २० ते २५ टक्के लाचेची सर्रास वसुली करण्यात आली. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम न करता, केवळ बोगस आणि बनावट बिले फाडून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट स्वतःच्या घशात ओतल्याचा हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे.
----
आमदारांनीच केली तक्रार; समिती बीडमध्ये
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या बीड पॅटर्न घोटाळ्याविरोधात थेट मुंबईतील मुख्य कार्यालयात पुराव्यांनिशी धडक दिली. तांत्रिक निकष, विजेचा भार, ग्राहकसंख्या आणि रोहित्रांची संख्या या सर्व नियमांना केराची टोपली दाखवून, केवळ कमिशन देणाऱ्या कंत्राटदारांचे खिसे भरण्यात आल्याचा व जिथून जास्त माल मिळेल तिथेच निधी वळवून मोठा असमतोल निर्माण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या तक्रारीने हादरलेल्या मुख्य अभियंत्यांनी (वितरण) तातडीने मुंबईतील अधीक्षक अभियंता नितीन काळे आणि कार्यकारी अभियंता सुनील पावरा यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय विशेष चौकशी समिती बीडला पाठवली.
-----
फायली आणि खरेदी आदेश जप्त
या तपास पथकाने बीड कार्यालयातील सर्व कागदपत्रे, मंजुरीच्या फायली आणि खरेदी आदेश जप्त करून धडक झाडाझडती सुरू केली आहे. केवळ कागदपत्रे न तपासता प्रत्यक्षात कामांच्या ठिकाणी जाऊन तांत्रिक आणि स्थळ पाहणी करण्यात येत आहे. जुन्याच कामांचे फोटो लावून बोगस बिले कशी काढण्यात आली, याचे चक्रव्यूह आता उघडकीस आले असून डोंगरे आणि चुक्का यांचे पितळ उघडे पडले आहे.
-------
अंतिम अहवाल प्राप्त होताच कठोर कारवाई होणार
या गंभीर प्रकरणावर महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी सक्त इशारा दिला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत समिती स्थापन केली असून, अंतिम अहवाल प्राप्त होताच दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल. भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या सर्व पुराव्यांचा आणि आर्थिक तफावतीचा पंचनामा करणारा सविस्तर अहवाल तयार झाला आहे. या अहवालानंतर बोगस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई होणार की थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊन ते गजाआड जाणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.