माजलगाव-तेलगाव रस्ता की मृत्यूचा सापळा?
बळी गेल्यानंतरही प्रशासन सुस्तच; आश्वासने नको, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी
माजलगाव, ता. २२ (बातमीदार) : माजलगाव-तेलगाव रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला असून, या मार्गावर आतापर्यंत तब्बल ४१ निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकत्याच झालेल्या आणखी एका भीषण अपघातात पाच जणांचा बळी गेल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे रखडलेले काम आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हे मृत्यूतांडव सुरू असल्याचा आरोप करत, नागरिकांनी आता थेट लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी आणि जिल्हा रस्ते सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. प्रत्येक अपघातानंतर केवळ शोक व्यक्त करणे, पोकळ आश्वासने देणे आणि मदतीची घोषणा करणे यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती कधी होणार, असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जात आहे.
कालच्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पाच जणांमुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. यातील काही कुटुंबे आधीच अत्यंत हलाखीचे जीवन जगत होती, तर काही घरांचा संपूर्ण आर्थिक डोलारा या मृत व्यक्तींच्याच खांद्यावर होता. घरातील कर्ता आणि कमावता सदस्यच अचानक हिरावून घेतला गेल्याने आता लहान मुलांचे शिक्षण, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ आणि रोजच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न या कुटुंबांसमोर आ वासून उभा राहिला आहे. अशा हृदयद्रावक प्रसंगी या उघड्या पडलेल्या कुटुंबांना केवळ प्रशासनाच्या कोरड्या सांत्वनाची नव्हे, तर तातडीच्या आर्थिक मदतीसह भक्कम आणि दीर्घकालीन आधाराची नितांत आवश्यकता आहे.
माजलगाव-तेलगाव रस्त्याच्या दुरवस्थेचा आणि दुरुस्तीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या, तसेच कंत्राटदारांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याने नागरिकांचा संताप आता अनावर झाला आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लांबच लांब पडलेल्या भेगा आणि अनेक ठिकाणी तयार झालेले धोकादायक ''जम्पिंग जपांग'' यामुळे या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. या जीवघेण्या त्रुटींवर तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित असताना, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कृती होताना दिसत नाही.
या रस्त्यावरील वाढत्या अपघातांना केवळ दुर्दैवी घटना म्हणून सोयीस्कररीत्या दुर्लक्षित करता येणार नाही. या सर्व घटनांची, रस्त्याच्या सदोष तांत्रिक स्थितीची, रस्ते सुरक्षा उपाययोजनांमधील त्रुटींची आणि दुरुस्तीत होत असलेल्या विलंबाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करणे आता काळाची गरज बनली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी अपघातप्रवण आणि धोकादायक ठिकाणी तातडीने सूचना फलक लावावेत, सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करावी आणि रस्त्याची डागडुजी युद्धपातळीवर सुरू करावी. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना शासकीय नियमांनुसार तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने लालफितीचा कारभार बाजूला ठेवून तत्परता दाखवावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.
------
आणखी किती बळींची प्रतीक्षा?
आतापर्यंत गेलेले तब्बल ४१ बळी प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी पुरेसे नसतील, तर ठोस कारवाई करण्यासाठी आणखी किती निष्पाप जीवांच्या बळींची प्रशासन वाट पाहत आहे? नागरिकांना आता नेत्यांच्या आश्वासनांपेक्षा सुरक्षित रस्ता हवा आहे. केवळ पत्रकबाजी आणि श्रेयवाद करण्यापेक्षा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप प्रवाशांचे संरक्षण होणे अधिक गरजेचे आहे. माजलगाव-तेलगाव रस्त्याचा हा प्रश्न आता केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो जनतेच्या जगण्याच्या अधिकाराचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.