ABD26J82080 छत्रपती संभाजीनगर ः सीएमआयए-बीएसईमध्ये कराराप्रसंगी डावीकडून हर्षित मोदाणी, अनुज बन्सल, सीए सोहम कोटक, रविश सोनी, सुंदररामन राममूर्ती, अथर्वेशराज नंदावत, अजिंक्य सावे आणि राधा कीर्तिवासन.
---
यंदा १०० कंपन्यांना भांडवली बाजारात उतरण्यासाठी प्रोत्साहन
-------
सीएमआयए-बीएसईमध्ये करार ः आयपीओ, आर्थिक साक्षरता, संस्था निधी उभारणीवर भर
-------
छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : मराठवाड्यातील उद्योगांना विस्तारासाठी भांडवली बाजारातून निधी उभारणीचे पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत चालू आर्थिक वर्षात मराठवाड्यातील १०० कंपन्यांना भांडवली बाजारात सूचिबद्ध होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
याशिवाय उद्योजक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे, सायबर गुंतवणूक फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक संस्थांना निधी उभारणीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई येथे गुरुवारी (ता. २२) झालेल्या कार्यक्रमात बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन राममूर्ती यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी बीएसईच्या इश्यूअर रिलेशन्स अँड कॉर्पोरेट सेल्स विभागाच्या प्रमुख राधा कीर्तिवासन, एसएमई विभागाचे प्रमुख वरुण गुप्ता आणि उपाध्यक्ष रिद्धेश शाह उपस्थित होते. सीएमआयएच्या वतीने अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे, खजिनदार सीए सोहम कोटक, वाळूज विभागप्रमुख हर्षित मोदाणी, बिझनेस फॅसिलिटेशन सेलचे प्रमुख रविश सोनी आणि मराठवाडा विभागप्रमुख अनुज बन्सल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
---------
आयपीओसाठी उद्योजकांना मार्गदर्शन
मराठवाड्यातील पात्र कंपन्यांना बीएसईच्या मुख्य बाजारपेठेसह लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या (एसएमई) व्यासपीठावर प्रारंभिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) भांडवल उभारणी करता येऊ शकते. यासाठी उद्योजकांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सूचिबद्ध होण्याची प्रक्रिया, नियामक अटी आणि भांडवली बाजारातील संधी यांची माहिती कंपन्यांना दिली जाईल. त्यामुळे विस्तारासाठी पारंपरिक कर्जपुरवठ्या व्यतिरिक्त पर्यायी निधी स्रोतांचा विचार करण्यास उद्योजकांना मदत होणार आहे.
------
सायबर फसवणुकीपासून सावधतेसाठी जनजागृती
शेअर बाजारातील गुंतवणूक, आर्थिक नियोजन, गुंतवणुकीतील जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धती याबाबत विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येतील. बनावट ट्रेडिंग ॲप्स, सायबर फसवणूक आणि अवास्तव परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.
----------
सामाजिक संस्थांनाही निधीची संधी
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत पात्र सामाजिक संस्थांना बीएसईच्या सोशल स्टॉक एक्स्चेंजची माहिती देण्यात येणार आहे. या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थांना पात्रतेचे निकष, निधी उभारणीची प्रक्रिया आणि उपलब्ध पर्याय समजून घेता येतील. परिणामी, सामाजिक उपक्रमांसाठी संसाधने उभारण्याच्या नव्या संधींची माहिती संस्थांना मिळू शकेल, असे सीएमआयएतर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.