एमबीबीएस, बीडीएसच्या १३८ रिक्त जागांसाठी विशेष फेरी
दोन नोव्हेंबरपर्यंत नव्या नोंदणीची संधी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे वेळापत्रक जाहीर
छत्रपती संभाजीनगर, ता. १ ः वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष रिक्त जागा फेरी जाहीर करण्यात आली आहे.
या फेरीत राज्यातील सरकारी, खासगी महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमधील एकूण १३८ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना दोन नोव्हेंबरपर्यंत नव्याने ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. सीईटी कक्षाने ता. २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या रिक्त जागांच्या अहवालानुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ८४, तर बीडीएस अभ्यासक्रमाच्या ५४ जागा रिक्त आहेत. एमबीबीएसच्या रिक्त जागांमध्ये खासगी महाविद्यालयांतील ३९ आणि खासगी विद्यापीठांमधील ४५ जागांचा समावेश आहे. सरकारी, महापालिका, केंद्रीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसची एकही जागा रिक्त नाही. बीडीएस अभ्यासक्रमाच्या सरकारी आणि महापालिका महाविद्यालयांमध्ये दोन, खासगी महाविद्यालयांमध्ये २२, तर खासगी विद्यापीठांमध्ये ३० जागा रिक्त आहेत. त्यामुळे एमबीबीएस आणि बीडीएस अशा दोन्ही अभ्यासक्रमांसाठी एकूण १३८ जागा उपलब्ध आहेत.
-------------------
नोंदणीसाठी वेळेची मर्यादा
विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांना सोमवारी (ता. दोन) सायंकाळी साडेपाचपर्यंत ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज करता येईल. नोंदणी शुल्क भरण्यासाठी त्याच दिवशी रात्री साडेसातपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आवश्यक मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती रात्री आठपर्यंत संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. ऑनलाइन कागदपत्र पडताळणीची प्रक्रीया तीन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या विशेष फेरीसाठी यापूर्वीच नोंदणी केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या फेरीत जागा मिळूनही प्रवेश न घेतलेल्या किंवा प्रवेश रद्द केलेल्या उमेदवारांना, यापूर्वी नोंदणी केली नसल्यास, नव्याने नोंदणी करता येणार आहे. मात्र, तिसऱ्या फेरीत किंवा त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये जागा मिळालेल्या उमेदवारांना या विशेष फेरीसाठी नव्याने नोंदणी करता येणार नाही.
--------------------
वेळापत्रक जाहीर होणार
नोंदणी आणि कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेशाचे पुढील सविस्तर वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर केले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला (mahacet.org) भेट द्यावी.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.