कुठं अदली, तर कुठं
पायलीभर मूग-उडीद
पावसाचा दगा; उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी
कळंब, ता. ११ (बातमीदार) : सुरवातीला हिरवेगार दिसणारे मूग-उडदाचे पीक, भरलेला फुलोरा आणि लागलेल्या शेंगा पाहून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. बाजारात उडदाला सुमारे १० हजार रुपये क्विंटल, तर मुगाला १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याने या पिकातून दोन पैसे हातात पडतील, अशी आशा होती. मात्र, शेंगा भरण्याच्या ऐन काळात पावसाने दडी मारल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
कळंब तालुक्यात मूग आणि उडदाच्या काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मूग-उडदाची आवक सुरू झाली आहे. बाजारात येणारा शेतमाल पाहता उत्पादनातील घट स्पष्टपणे जाणवत आहे. सुरवातीला शेतात पीक चांगले दिसत होते. पण दाणे भरण्याच्या काळात पावसाने साथ सोडल्याने अनेक शेतांतील शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. काही ठिकाणी शेंगा गळून पडल्याने काढणीनंतर अत्यल्प उत्पादन हाती येत आहे.
कमी कालावधीत येणारे पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मूग-उडदाला पसंती दिली होती. पेरणीनंतर सुरवातीला पिकांची वाढ चांगली झाली. फुलोरा आणि शेंगा लागल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा निर्माण झाली. पण पावसाच्या खंडामुळे ही अपेक्षा फोल ठरली.
.................
((चौकट))
खाण्यापुरता मूग, पापडापुरता उडीद
पिकासाठी केलेला खर्च, फवारण्या, मजुरी आणि काढणीचा खर्च पाहता हाती काय उरणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक शेतकरी ‘खाण्यापुरता मूग आणि पापडापुरता उडीद’ अशी व्यथा व्यक्त करीत आहेत.
................
((कोट))
मूग-उडदाची पेरणी वेळेत केली. पीक फुलात आले आणि शेंगा लागल्या; तेव्हा पावसाने दडी मारली. शेंगा भरल्याच नाहीत. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली. कुठे अदली, तर कुठे पायलीभर मूग-उडदाचे उत्पादन निघत आहे. एवढे पीक घेऊन काय फायदा झाला, असेच वाटत आहे.
- गोरोबा गायके, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.