छत्रपती संभाजीनगर

नळदुर्ग येथे म्हशी पळवण्याच्या स्पर्धा संपन्न

CD
NUG26A02327 नळदुर्ग : विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. नळदुर्गमध्ये म्हशी पळवणे, किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात नळदुर्ग, ता. १२ (बातमीदार) : दिवाळी सणानिमित्त नळदुर्ग शहरात पारंपरिक म्हशी पळवणे आणि किल्ले बांधणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये नळदुर्गसह चव्हाणवाडी, जखनी तांडा, मुर्टा, अणदूर, केशेगाव, कसई, कासेगाव आणि सोलापूर येथील पशुपालकांनी सहभाग नोंदवला. पारंपरिक खेळांच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. खांड म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत अजय जाधव, सोमनाथ पवार आणि लक्ष्मण करदुरे (मुर्टा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. एकल म्हैस पळवण्याच्या स्पर्धेत रजाक शेख, जफर टेलर आणि विजय अवचार यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. स्पर्धेदरम्यान आमदार प्रवीण स्वामी आणि मल्हार पाटील यांनी भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. दिवंगत सुधाकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ प्रवीण चव्हाण यांच्यातर्फे म्हैस पळवणाऱ्या पशुपालकांना तीन लिटर क्षमतेचे दुधाचे कॅन भेट देण्यात आले. अजय जाधव, जफर टेलर, पिल्लू मुळे, तानाजी जाधव आणि उत्तम जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. किल्ले बांधणी स्पर्धेत शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांनी सहभाग घेतला. प्रा. संतोष पवार व मुख्याध्यापक श्रीनिवास भोसले यांनी परीक्षक म्हणून किल्ल्यांची पाहणी केली. राजमुद्रा ग्रुप (भुईगल्ली), शंभूराजे ग्रुप (मराठा गल्ली) आणि ए. बी. ग्रुप (बसवेश्वर चौक) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. ज्ञानेश्वरी सुरवसे व पद्माक्ष सुरवसे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. ................... UMR26A19172 उमरगा ः एकुरगावाडी येथील दिव्यांग, मतिमंद व अनाथ मुलांच्या शाळेला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेला रुग्णवाहिका भेट उमरगा, ता. १२ (बातमीदार) : समाजातील वंचित आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने एकूरगावाडी (ता. उमरगा) येथील तुळजाभवानी अपंग, मतिमंद व अनाथ मुलांच्या शाळेला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेतील विशेष मुलांच्या आपत्कालीन वैद्यकीय सुविधेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ, कदेर संचलित या शाळेत दिव्यांग, मतिमंद आणि अनाथ मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता लक्षात घेऊन फाउंडेशनने पुढाकार घेतला. अधिकृतपणे रुग्णवाहिका शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे प्रमुख शरण पाटील म्हणाले की, अनाथ, दिव्यांग आणि मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. याच सामाजिक जाणिवेतून फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे प्रमुख गोविंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. फाउंडेशनच्या संचालिका संपदा पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जाधव, अमर वाले, सचिन पाटील, चंद्रशेखर पवार, अनिल ऊर्फ पप्पू सगर, सतीश पवार, बालाजी शिंदे, पद्माकर कुनाळे, महेशशंकर पाटील, सुनील जवळगे, दीपक करके, भरत मारेकर, दीपक पवार, राजू मुल्ला, राजू बेंडकाळे, यशपाल कांबळे, सागर पाटील, सुजित शेळके, राजकुमार अंबुसे आणि आकाश इंगळे आदी उपस्थित होते. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मुलांना आपत्कालीन परिस्थितीत वेळेत रुग्णालयात पोहोचविणे शक्य होणार आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन आणि पालकांनी फाउंडेशनचे आभार मानले. ................ ‘उमरगा-लोहारा मतदारसंघातील डायलिसिस सेंटर बंद पडू देणार नाही’ उमरगा, ता. १२ (बातमीदार) : उमरगा-लोहारा मतदारसंघातील मुरूम, लोहारा आणि सास्तूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरू असलेली मोफत डायलिसिस केंद्रे बंद होण्याच्या शक्यतेने रुग्णांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, या केंद्रांची सेवा सुरू ठेवण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी यांनी तातडीने हस्तक्षेप केला असून, मतदारसंघातील एकही डायलिसिस सेंटर बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. एचएलएल कंपनीमार्फत या केंद्रांमध्ये मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा दिली जाते. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही केंद्रे मोठा आधार ठरली आहेत. मात्र, राज्य सरकारकडून कंपनीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी प्रलंबित असल्याने कंपनीने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याची सूचना रुग्णांना देण्यात आली होती. बुधवारपासून (ता. ११) केंद्रे बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. माहिती मिळताच आमदार स्वामी यांनी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आरोग्य विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांच्याशी दूरध्वनी व संदेशाद्वारे संपर्क साधला. थकबाकीच्या कारणामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. एचएलएल कंपनी आणि शासन यांच्यातील करारानुसार गतवर्षी ही मोफत डायलिसिस केंद्रे सुरू झाली होती. मात्र, थकीत रकमेपोटी कंपनीने आठ दिवसांची नोटीस देऊन सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना या केंद्रांचा मोठा आधार आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून, ही केंद्रे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले. ............ BMH26A10142 ॲड. विलास पवार ॲड. विलास पवार यांना ‘बळीराजा गौरव पुरस्कार’ भूम, ता. १२ (बातमीदार) : सामाजिक कार्यातून समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देणारे पाथरुड (ता. भूम) येथील ॲड. विलास पवार यांची प्रतिष्ठेच्या बळीराजा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोहकल (ता. परंडा) येथील बळीराजा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जात आहे. बळीराजा संस्थेचे संस्थापक ॲड. महादेव विष्णू जाधव यांनी ८ नोव्हेंबर २०२६ ला पत्राद्वारे ॲड. पवार यांना पुरस्कार निवडीची अधिकृत माहिती दिली. शुक्रवारी (ता. १३) सकाळी अकरा वाजता रोहकल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा कृषी संस्कृतीतील समृद्धी, कृतज्ञता आणि समतेचा संदेश देणारा सण आहे. ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ या लोकभावनेतून सुखी, समताधिष्ठित आणि शोषणमुक्त समाजाची अपेक्षा व्यक्त केली जाते. शेतकरी, कष्टकरी आणि श्रमजीवी वर्गाच्या योगदानाचा सन्मान करणे, सामाजिक सलोखा जपणे आणि सर्वांच्या कल्याणाची भावना वृद्धिंगत करणे हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. कृषी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी बळीराजा संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. ॲड. पवार यांनी केलेल्या सामाजिक आणि समाजहिताच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. .......................... KMW26A01272 खामसवाडी ः दहिफळ येथे बालाजी भातलवंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दारूबंदीसाठी दहिफळमध्ये बेमुदत उपोषण सहा महिन्यांपूर्वी थांबलेला महिलांचा लढा पुन्हा सुरू; बालाजी भातलवंडेंचा पुढाकार खामसवाडी, ता. ११ (बातमीदार) : कळंब तालुक्यातील दहिफळ गावात दारूबंदी लागू करण्याच्या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेला महिलांचा लढा पुन्हा एकदा पेटला आहे. भाऊबिजेच्या मुहूर्तावर सामाजिक कार्यकर्ते बालाजी भातलवंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान पदवीधर मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह पाटील यांनी भातलवंडे यांची बुधवारी (ता. ११) सायंकाळी भेट घेतली. यावेळी गावकरी त्यांचा सत्कार करीत असताना त्यांनी दहिफळात दारूबंदी झाल्यानंतरच सत्कार स्वीकारणार असल्याचे सांगितले. सहा महिन्यांपूर्वी दहिफळ येथील महिलांनी एकत्र येत गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी आवाज उठविला होता. यासाठी महिला ग्रामसभा बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ग्रामसभा होऊ शकली नाही. त्यामुळे महिलांच्या मागणीला न्याय मिळाला नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. महिला ग्रामसभा तातडीने बोलावून दारूबंदीचा निर्णय प्रशासनाच्या दप्तरी नोंदवावा, या मागणीसाठी बालाजी भातलवंडे यांनी ११ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित सर्व विभागांना निवेदने दिली आहेत. दहिफळ गावात सध्या एक देशी दारूचे दुकान आणि पाच बिअर बार सुरू असल्याची माहिती आहे. दारूमुळे महिलांना आणि कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे गावात दारूबंदी होणे आवश्यक असल्याचे उपोषणकर्ते भातलवंडे यांनी सांगितले. गावात दारूबंदी झाली, तर तीच भाऊबीजेची भेट सर्व महिला भगिनींना दिल्यासारखे होईल. याच भावनेतून भाऊबिजेच्या दिवशी उपोषण सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपोषणस्थळी गावातील महिलांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन महिला ग्रामसभा कधी घेणार आणि दारूबंदीबाबत काय निर्णय घेणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. ........... ((चार अँकर)) MMR26A01946 मुुरुम ः ‘दीपसंध्या’मध्ये सौरभ नाईक यांनी भावगीते सादर केली. भावगीतांच्या सुरेल मैफिलीने रंगली ‘दीपसंध्या’ गायक सौरभ नाईक यांच्या गायनाने मुुरूमकर मंत्रमुग्ध; वाचनालयाला अकरा ग्रंथांची भेट मुरूम, ता. १२ (बातमीदार) : अभंग, भक्तिगीते आणि भावगीतांच्या सुमधुर सुरांनी सजलेल्या ‘दीपसंध्या’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने मंगळवारी (ता. १०) प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात दीपावली पाडव्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. महेश मोटे आणि त्र्यंबक व्हटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्यही साधण्यात आले. प्रारंभी गायक सौरभ नाईक, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे केंद्रप्रमुख राजूभाई भालकाटे, प्रोजेक्ट डायरेक्टर प्रा. डॉ. महेश मोटे आणि मीरा मोटे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गायक सौरभ नाईक यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘वंदीन अयोध्येचा राजा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘घेई छंद मकरंद’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘बाजे मुरलिया बाजे’ अशा विविध गीतांनी मैफिलीला रंगत आणली. प्रशांत गाजरे (नांदेड) यांनी तबला, विनायक चौधरी (भालकी) यांनी हार्मोनियम, विश्वेश्वर जोशी (नांदेड) यांनी पखवाज, तर श्रीकर लालवंडीकर (नांदेड) यांनी टाळवादनाची साथसंगत केली. सुनील राठोड, मनश्री मोटे आणि अनुष्का कबाडे यांनीही गीत सादर केली. यावेळी ब्रह्मकुमार राजूभाई भालकाटे यांनी ओमशांती केंद्राची भूमिका स्पष्ट केली. वाढदिवसानिमित्त डॉ. मोटे यांनी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालयाला ग्रंथ भेट दिले. वाचनालयाचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे आणि बाबासाहेब पाटील यांनी हे ग्रंथ स्वीकारले. डॉ. नितीन डागा, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, मल्लिकार्जुन बदोले, कल्लाप्पा पाटील, डॉ. राजकुमार हिरेमठ, राजकुमार वाकडे, ॲड. उदय वैद्य, प्रा. राजकुमार नाईक, रतन पाटील आणि दिलीप हंगरगे आदींनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर सुनील राठोड यांनी आभार मानले. ..................... चार डायलिसिस केंद्रांसाठी काँग्रेसकडून आंदोलनाचा इशारा मुरूम, ता. ११ (बातमीदार) : धाराशिव जिल्ह्यातील मुरूम, सास्तूर, लोहारा आणि वाशी येथील महा डायलिसिस सेंटरची सेवा साहित्य पुरवठादारांची मागील दोन वर्षांपासूनची देयके थकल्याने विस्कळीत झाली आहे. मुरूम येथील केंद्र ११ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष बंद झाल्याने या चारही केंद्रांवर उपचार घेणाऱ्या ४४ गरजू रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रशासनाला तातडीने सेवा पूर्ववत करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने सुरू असलेल्या या केंद्रांमधून मुरूम येथे १०, सास्तूर येथे १६, लोहारा येथे आठ आणि वाशी येथे १० अशा एकूण ४४ मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना नियमित डायलिसिसची सुविधा मिळत होती. मात्र, साहित्य पुरवठादारांची बिले प्रलंबित राहिल्याने केंद्रे बंद पडण्याची वेळ आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ धाराशिव आणि तुळजापूर येथे शासकीय डायलिसिस केंद्रे उपलब्ध आहेत. मुरूमपासून ही केंद्रे सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहेत. डायलिसिसनंतर रुग्णांना एवढा लांबचा प्रवास करणे कठीण आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांना खासगी वाहनांचा खर्चही परवडणारा नाही. या समस्येची दखल घेत जिल्हा काँग्रेस सचिव सिद्धलिंग हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश अर्दाळे यांना निवेदन दिले. मुरूम येथील केंद्र तातडीने सुरू करावे, पुरवठादारांची थकीत बिले अदा करावीत, सेवा पूर्ववत होईपर्यंत मोफत पर्यायी डायलिसिसची व्यवस्था करावी, कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करावी आणि प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT