छत्रपती संभाजीनगर

नांदेडला ‘एडीबी’च्या निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय

CD
नांदेडला ‘एडीबी’च्या निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय --- ५९४ पदांना मंजुरी; ३१ कोटींचा वार्षिक वेतनखर्च, खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १६ :नांदेडच्या जिल्हा आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून नांदेड येथे ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत हे रुग्णालय उभारले जाणार असून, खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षांपासून यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी ५९४ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असून, या पदांच्या वेतनासाठी ३१ कोटी २५ लाख रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक सक्षम, दर्जेदार आणि मोफत उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य सेवेचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी एडीबीच्या सहकार्याने ४ हजार २५० कोटी रुपयांचा ‘प्रगती’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ७० टक्के एडीबीचे कर्ज, तर ३० टक्के राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. त्यापैकी १ हजार ५०० कोटी रुपये आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा आणि सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत. --- विधानसभेतील मागणीला मिळाली गती नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याचा शासन निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र, प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून एडीबीच्या माध्यमातून या रुग्णालयासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढील एडीबी प्रस्तावात या रुग्णालयाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’मध्येही ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते. आता शासन निर्णयामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधीची तरतूद आणि प्रशासकीय मंजुरीची ठोस दिशा मिळाली आहे. --- आरोग्य सुविधांचा विस्तार नांदेडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या रुग्णालयामुळे खाटांची क्षमता वाढण्याबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ, उपचार सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्येही वाढ होणार आहे. या निर्णयाबद्दल खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. तसेच मान्यता मिळविण्यासाठी भाजप-महायुतीतील सहकाऱ्यांचेही योगदान लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT