जिल्ह्यात पावसाची २८० मिलिमीटर तूट
---
खरीप पिकांवर संकटाचे सावट; मुदखेडमध्ये सरासरीच्या १००.९९ टक्के पाऊस, हदगावात सर्वाधिक कमतरता
---
नांदेड, ता. ७ : यंदाच्या पावसाळ्यात नांदेड जिल्ह्यात पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५१७.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत ७९७.२० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा तब्बल २७९.९० मिलिमीटर, अर्थात सुमारे २८० मिलिमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्याचा १ जून ते ३१ ऑगस्टपर्यंतचा अपेक्षित सरासरी पाऊस ६४७ मिलिमीटर इतका आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ५१७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, अपेक्षित सरासरीच्या ७९.९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतील वार्षिक सरासरी ८९१.३० मिलिमीटर असून, त्याच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ५८.०४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाची कमतरता जाणवत आहे. किनवट तालुक्यात ७०२.४० मिलिमीटर, माहूरमध्ये ६८८.३० मिलिमीटर, मुदखेडमध्ये ६४३.६० मिलिमीटर आणि अर्धापूरमध्ये ५४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नायगाव तालुक्यात सर्वांत कमी ४१०.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. बिलोलीत ४२७.९०, हदगावमध्ये ४४०.८०, धर्माबादमध्ये ४७३.९० आणि नांदेड तालुक्यात ४७६.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
---
शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे
सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारीसह इतर खरीप पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. काही भागांत अधूनमधून झालेल्या पावसामुळे पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी सलग आणि समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत असून, आता त्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.
----
मुदखेडमध्ये सरासरीच्या १००.९९ टक्के पाऊस
जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक १००.९९ टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे नायगाव, नांदेड व धर्माबादसह अनेक तालुक्यांत पावसाची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा कमी आहे. हदगाव तालुक्यात सर्वांत कमी ६५.१७ टक्के, तर बिलोलीत ६५.४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी ७९.९५ टक्के असून, अपेक्षित पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात अद्याप सुमारे २० टक्के तूट कायम आहे.
---
तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
नांदेड-७९.३७, बिलोली-६५.४१, मुखेड-९३.३२, कंधार-८६.०३, लोहा-८८.३१, हदगाव-६५.१७, भोकर-७१.३१, देगलूर-८९.२७, किनवट- ८९.९२, मुदखेड-१००.९९, हिमायतनगर-८०.९७, माहूर-८२.२०, धर्माबाद-७६.२०, उमरी-८१.३०, अर्धापूर-९४.६७, नायगाव (खै.)- ७९.८३ टक्के अशी जिल्ह्यात सरासरी ७९.९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.