Water released from the Nandur Madhameshwar canal for Rabi irrigation, while declining dam storage raises water scarcity concerns in Soygaon.
esakal
वैजापूर : खरीप पिकांच्या नुकसानीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब समोर आली असून, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नांदूर मधमेश्वर कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २०) रात्री सुरवातीला ३०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. या आवर्तनातून मिळणाऱ्या सुमारे दीड टीएमसी पाण्यामुळे तीन तालुक्यांतील १०२ गावांमधील ४३ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा आधार मिळणार आहे.
धरणात आवश्यक पाणीपातळी उपलब्ध होताच हे आवर्तन सोडण्यात आले. यामध्ये वैजापूर ४९, गंगापूर ४६ आणि कोपरगाव तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे. सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या कालव्यावर ४९ पोटचाऱ्यांद्वारे पाणीवाटपाचे नियोजन केले असून, यामुळे रब्बी पिकांसह भूजल पुनर्भरणालाही मदत होणार आहे.
हे आवर्तन तीन आठवडे सुरू राहणार असून शुक्रवारी रात्री ३०० क्युसेक विसर्गाने कालव्यात पाणी सोडले. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग ८५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती नांदूर मधमेश्वर कालवा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाबळे यांनी दिली. नियोजित पाणीपातळीनुसार कालव्यात पाणी सोडण्यास सुरवात झाली असून रविवारी सकाळी कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्याच्या हद्दीत दाखल होणार आहे.
‘टेल टू हेड’पद्धतीने वाटप
पाणीवाटप ‘टेल टू हेड’ पद्धतीने होणार असून प्रथम गंगापूर, नंतर वैजापूर आणि शेवटी कोपरगाव तालुक्याला पाणी मिळेल. अनधिकृत उपसा, कालव्याच्या गेटमध्ये हस्तक्षेप व वाद टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी ११ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, पाणीवाटपात अडथळा आणणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
सोयगावचा पाणीसाठा खालावला
सोयगाव, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील ८७ गावांमधून अद्याप एकाही टँकरची मागणी न आल्याने सद्यःस्थितीत सोयगाव तालुका कागदोपत्री टँकरमुक्त आहे. मात्र, २१ धरणांतील पाणीसाठा वेगाने खालावत असल्याने आगामी काळात टंचाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता आहे.
यंदा पावसाळ्यातील तीन महिने कोरडे गेले असून केवळ जुलैत अल्प पाऊस झाला. बंधाऱ्यांतील पाणी वाहून गेल्याने तालुक्यातील २९ गावांमधून वाहणाऱ्या नद्या, पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. तालुक्यात ८७ गावे व ४८ ग्रामपंचायती असून शहरासह एकूण लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे.
बनोटी व सावळदबारा परिसर पर्जन्यछायेत येत असल्याने तेथे दरवर्षी टंचाई भासते. यंदा सर्वच जलस्रोतांनी तळ गाठल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीकडून सध्या टँकर मागणीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे सध्या एकही टँकर सुरू नसला, तरी संभाव्य टंचाई लक्षात घेऊन ग्रामसेवकांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत. परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे.
- शिवाजी यमुलवाड, गटविकास अधिकारी, सोयगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.