पान एकसाठी लिड
-----
महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यास मुहूर्त कधी?
साडेआठशे अतिक्रमणधारकांना नोटिसा; जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाई गतिमान करण्याचे आदेश
-----
परभणी, ता. ८ : न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्याप शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण कायम आहेत. जवळपास साडेआठशे अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या. मात्र, तरीही बहुतांश जणांनी अद्याप आपली अतिक्रमणे काढून घेतली नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह यांनी बैठक घेऊन अतिक्रमणे हटविण्याची कारवाई गतिमान करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
परभणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वर प्रचंड कच्ची, पक्की प्रचंड अतिक्रमणे आहेत. त्यामुळे या मार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू असते. अनेकांचे या रस्त्याने बळीदेखील घेतले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्गासह अन्य प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, महानगरपालिका, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम व अन्य संबंधित यंत्रणेला वारंवार दिल्या आहेत; परंतु कारवाई मात्र अत्यंत संथगतीने सुरू आहे.
-----
साडेआठशे अतिक्रमणधारकांना नोटिसा
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील जवळपास ८५० अतिक्रमणधारकांना राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने आपआपली अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहे. तसेच ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातूनदेखील जनजागृती केली आहे. छोट्या-मोठ्या शंभर ते सव्वाशे अतिक्रमणधारकांनी आपली थोडीफार असलेली अतिक्रमणे काढून घेतली; परंतु उर्वरित अतिक्रमणधारक अद्यापही टस की मस झालेले नाहीत. त्यामुळे अपघाताचा व नागरिकांच्या जीविताचा धोका कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. शहर वाहतूक शाखा तयार आहे. मात्र, गेल्या १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अजूनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
-----
कारवाई गतिमान करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मंगळवारी (ता. आठ) पुन्हा एकदा दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत अतिक्रमणांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही अधिक गतिमान करावी आदेश दिले आहेत. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, वाहतूक पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार हे प्रत्यक्ष तर कार्यकारी अभियंता तृप्ती नाग, अनिस खैरदी, गणेश क्षीरसागर, सागर तायडे, अमित उबाळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
-----
अभियंत्यांनाही नोटिसा द्या
राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते हद्दीतील अतिक्रमणे तत्काळ हटविण्याच्या सूचना देतानाच, या कार्यवाहीत हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अभियंत्यांविरोधात विभागीय चौकशीच्या नोटिसा बजावण्यात याव्यात, तसेच अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे आदेशदेखील जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले. अतिक्रमणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यास संबंधितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस विभागाला दिल्या आहेत. तसेच अतिक्रमण हटविण्याच्या शासकीय कार्यवाहीत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास नियमानुसार तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
अतिक्रमण हटविताना वीज जोडणी काढण्याची आवश्यकता असल्यास संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा कार्यवाहीत समावेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेदरम्यान संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने घटनास्थळी उपस्थित राहून अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.