पैसे भरले, पावती मिळाली, पण एनसीएमसी कार्ड कुठेय?
नव्या नियमामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप; नोंदणी करूनही १.१५ लाख प्रवाशांना प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १ : एसटी स्टँडवर लालपरीची वाट पाहताना चेहऱ्यावर असलेला आनंद आणि बसमध्ये चढल्यानंतर वाहकाने तिकीट काढताना सवलत नाकारल्यामुळे उडालेला गोंधळ... मंगळवारी बीडच्या बसस्थानकावर अगदी असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीचा प्रवास म्हणजे जणू हक्काचा, सुरक्षित आणि आर्थिक दिलाशाचा मोठा मार्ग. मात्र, आता या दिलाशाला एका नव्या स्मार्ट कार्डची कडक अट घालण्यात आली आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) उपक्रम हाती घेतला असून, मंगळवारी, १ सप्टेंबर २०२६ पासून जिल्ह्यात या उपक्रमाची अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नवीन व सुधारित नियमानुसार आता सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात मिळणारे सवलतीचे तिकीट केवळ या स्मार्ट कार्डद्वारेच दिले जाणार आहे. पण प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप तब्बल १,१५,७८४ प्रवाशांना प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी बीड बसस्थानकावर कार्ड मिळवण्यासाठी आणि सवलत नाकारल्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड तसेच संतापाची लाट पाहायला मिळाली.
बीड विभागातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात एसटीने प्रवास करणाऱ्या सवलतधारक प्रवाशांची मोठी संख्या आहे. महामंडळाच्या मुख्यालयातून सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना विशेष परिपत्रक पाठवून या निर्णयाची कोणतीही हयगय न करता तत्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. याच आदेशाचा आधार घेत १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला लाभार्थींना बसमध्ये सवलतीचे तिकीट मशीनमधून काढताना एनसीएमसी कार्ड स्वाइप किंवा टॅप करणे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी, ज्या प्रवाशांकडे हे कार्ड नाही त्यांना सवलत नाकारून पूर्ण रकमेचे तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. वेळेत आवश्यक ती नोंदणी करूनही संबंधित एजन्सीकडून कार्ड न मिळाल्यामुळे मंगळवारी प्रवासात तिकीट नाकारले गेल्याने हजारो ज्येष्ठांना आणि महिला प्रवाशांना ऐनवेळी मोठा आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागला.
-----
बीड विभागाची आकडेवारी
सवलत मिळवण्यासाठी बीड विभागात एकूण ४,९०,१०२ सवलतधारकांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३१ ऑगस्टपर्यंत केवळ ३,७५,११८ प्रत्यक्ष कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. याचाच अर्थ, अद्याप १,१५,७८४ लाभार्थींनी वेळेत नोंदणी करूनही कार्ड न मिळाल्यामुळे सवलतीपासून वंचित आहेत.
-----
कार्ड वितरण आणि रिचार्जची व्यवस्था
कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि. या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी आगारे आणि बसस्थानकांच्या परिसरात अधिकृत एजंट्समार्फत ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसच्या वाहकांना (कंडक्टर) या कार्डचे टॉप-अप (रिचार्ज) करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता बसमध्येच आपले कार्ड सहजपणे रिचार्ज करता येणार आहे.
-------
कोट
आम्ही महिनाभरापूर्वीच आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि पैसे देऊन ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली होती. मात्र, १ सप्टेंबर उजाडला तरी एजन्सीने आम्हाला कार्ड दिलेच नाही. यात आमची काय चूक? आता एसटी प्रशासनाने अचानक सवलत नाकारल्याने आम्हाला पूर्ण तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. कार्ड मिळेपर्यंत नोंदणी पावतीवर प्रवास करण्याची सवलत द्यायला हवी होती.
- मारुती शिंदे, ज्येष्ठ नागरिक, बीड
------
शासनाने कार्ड अनिवार्य केले हे ठीक आहे, पण आधी सर्वांना कार्ड वाटप पूर्ण करायला हवे होते. आज पहिल्याच दिवशी कार्ड घेण्यासाठी आणि चौकशीसाठी बसस्थानकावर महिला व ज्येष्ठांची प्रचंड गर्दी झाली. एजन्सीने कार्ड वाटपासाठी अतिरिक्त खिडक्या सुरू कराव्यात, जेणेकरून महिलांना तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही.
- सुनीता जाधव, महिला प्रवासी
------
राज्य शासनाच्या आदेशानुसार १ सप्टेंबरपासून एसटी प्रवासातील सवलतीसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसलेल्या प्रवाशांना सवलतीचे तिकीट दिले जाणार नाही. कार्ड वितरणाचे काम ईबिक्स कंपनीच्या अधिकृत एजंट्समार्फत बसस्थानक परिसरात वेगाने सुरू आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्व सवलतधारक प्रवाशांनी कोणताही मनस्ताप टाळण्यासाठी तत्काळ आपली नोंदणी पूर्ण करून एनसीएमसी कार्ड प्राप्त करून घ्यावे आणि सहकार्य करावे.
- नीलेश पवार, आगार प्रमुख बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.