ग्रा.पंं. कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
------------
-परभणी जिल्ह्यातील ७०७ पचायतींमध्ये यंत्रणा; वेळेवर उपस्थितीचा प्रशासनाचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ६ ः ग्रामपंचायतींत अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्याने विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतली आहे. ग्रामविकास अधिकारी, ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती निश्चित करण्यासाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील ७०७ ग्रामपंचायतींत आधार आधारित बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. वीज अथवा इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या ग्रामपंचायतींमध्ये टॅबच्या माध्यमातून हजेरी नोंदविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांची हजेरी लोकेशनसह ऑनलाइन नोंदली जाणार आहेत. संबंधित माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीत ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, संगणक परिचालक, शिपाई, पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सकाळी ९.४५ वाजता, सायंकाळी ५.४५ वाजता हजेरी नोंदवावी लागणार आहे. या प्रणालीमुळे कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित आहेत की नाही, यावर प्रशासनाला थेट देखरेख ठेवता येणार आहे. उशिरा येणे, वेळेपूर्वी कार्यालय सोडणे किंवा विनापरवानगी गैरहजर राहणे यावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. जन्म-मृत्यू दाखले, घरकुल योजना, शौचालय अनुदान, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर ग्रामपंचायत स्तरावरील कामांसाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागते. मात्र, संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्यास नागरिकांना पुन्हा कार्यालयात यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. बायोमेट्रिक हजेरीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती निश्चित होऊन नागरिकांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा आहे. बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय नवीन नसून ग्रामविकास विभागाने २०२४ मध्येच यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, विविध कारणांमुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ७०७ ग्रामपंचायती असून ग्रामसेवकांची मंजूर पदसंख्या ३९६ आहे. त्यापैकी ८७ पदे रिक्त असल्याची माहिती आहे.
((चौकट)))
अंमलबजावणीपूर्वी अडचणी दूर करा
अनेक ग्रामसेवकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार असल्याने एकाच दिवशी वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी कशी नोंदवायची, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामसेवक संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र अधिकारी उपलब्ध करून दिल्यानंतर बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करावी. रिक्त पदे, अतिरिक्त पदभाराचा प्रश्न सोडविल्याशिवाय या प्रणालीची अंमलबजावणी करताना व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात.
---
गैरहजेरीवर कारवाईची शक्यता
बायोमेट्रिक हजेरीमुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद उपलब्ध होणार असल्याने गैरहजेरीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे. वारंवार उशिरा येणे अथवा विनापरवानगी गैरहजर राहण्याचे प्रकार आढळल्यास नियमानुसार वेतन कपात आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत प्रशासनाची जबाबदारी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.