परभणी दीपोत्सव.....
--------
सांस्कृतिक-भावनिक विचारधारा : दिवाळी...
----------------
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आश्विन महिन्यापासून शेतातील नवीन धान्य घरात यायला सुरवात होते. पालवलेला कापूस, सोयाबीन, त्याअगोदर उडीद, मूग, मका, पावसाळी भुईमूग आदी पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरी आलेले असते. दसऱ्यानंतर आणि दिवाळीच्या चाहुलीला गुऱ्हाळ घरं आणि साखर कारखाने सुरू होतात. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आलेल्या पिकांच्या पै-पैतून कमी-अधिक आर्थिक संपन्नता यायला सुरवात होते. मन आणि शरीर सचेतन असते.
- अरुण चव्हाळ, परभणी
७७७५८४१४२४
-----------------
प्रकाशाचा उत्सव साजरा केल्यामुळे मानसिक आरोग्य आणि कुटुंब व नात्यातील माणसं-मित्रांसोबत हा मंगलमय सण साजरा होतो, भावनिकता जपली जाते. संत साहित्य आणि दिवाळी अंकांची परंपरा यामुळे संस्कृती परिपोष होतो. सांस्कृतिक आणि भावनिक विचारधारा म्हणजेच दिवाळी. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसांत हा सण वसुबारस किंवा वाघबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्थी-लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा-दिवाळी पाडवा आणि भाऊबीज असा साजरा केला जातो. या प्रत्येक दिवसाचे क्षण हे निसर्ग-शेती-आरोग्य-नातेसंबंध आणि समता-आर्थिक व्यवहारातील नैतिक कर्तव्य जपण्याच्या संदर्भाने अत्यंत मौलिक आहेत. जीवनातील एकूणच काळोखाचा अर्थातच, सर्वार्थाने वाईट गोष्टींचा नाश करून उजेडाकडे-विकासाकडे जाण्याचा आणि मूल्ये, माणुसकीचा उजेड उजळ करण्याचा हा सण आहे. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे हा वर्षाचा मोठा सण साजरा करतो. आता तर आपले भारतीय परदेशात असल्याने विविध ठिकाणी परदेशातही दिवाळी सण साजरा होत आहे. अंगण शेणाने सारवून रांगोळी काढणे, आकाशकंदील लावणे आणि अंगणात-कोपरा न् कोपऱ्यात-उकांड्यावरही पणत्या लावल्या जातात. फटाके-नवीन कपडे-फराळपाण्याची चंगळ हे ओघाने आलेच. आदिवासी भागातील तरुण मुले घरोघरी तेल मागण्यासाठी जातात. यावेळी जंगलात भरपूर आलेल्या कडू चिबडाची फळे तोडून त्याचा आतला गर काढून टाकला जातो. बाहेरच्या कडक आवरणातील वाटीचीच पणती केली जाते. घरोघरी मागून आणलेल्या तेलाने त्यात दिवे लावतात. हे दिवे मंदिरात आणि गावाच्या अंधाऱ्या भागात लावले जातात. सार्वजनिक प्रकाशपर्व साजरे करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. वसुबारसेला गोधन म्हणून गाय-वासरांची पूजा करण्याची प्रथा आहे. पण, गायीपासून मिळणारे दूध आणि दिवाळीत झोंबणारी थंडी या दृष्टिकोनातून दुधापासून तयार होणारे ताक-दही-लोणी-तूप आणि आता पनीर हे स्निग्ध पदार्थ माणसांना खायला मिळतात. शरीर सुदृढ होण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ मिळतात. शेतीसाठी बैलही मिळतात, म्हणून कृतज्ञतापूर्वक वसुबारस साजरी केली जाते. शेतकऱ्यांची वसुबारस तशी जंगलातील आदिवासींची वाघबारस. जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचा सामना कधी ना कधी वाघाशी होत असतो. अनेकदा वाघ नजरेला पडतो. भीती किंवा संरक्षण आणि धाडसी परंपरा त्यामुळे वाघ आपला देव आहे आणि त्याची भीती आपल्या माणसांना नसावी, म्हणून वाघबारस गावांच्या वेशीवर वाघोबाच्या मंदिरात जाऊन साजरी केली जाते. गावात मुले काठी घेऊन घराघरांत जाऊन तांदूळ मागतात. हा जोगवा मागताना गाणंही म्हणतात, ‘वाघ्या रे वाघ्या, आमचा वाघ्या... दूध-भात खाई, गुरुक..! मुलांनी मागून आणलेल्या तांदळाची खीर एकत्र शिजवून गप्पागोष्टी करत खायची. मी वाचले की, जशी ही दुधभाताची वाघबारस तशीच बोंबील वाघबारस असते. बोंबील-सुकट-वाकट माशांचे कालवण तयार करून शिजवलेल्या माशांचा नैवेद्य वाघोबाला दाखवितात. अशी ही बोंबील वाघबारस... आता यात बदल होत आहे. दिवाळीचा दुसरा दिवस: धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. धन्वंतरी वैद्याचे जनक, त्यांची जयंती म्हणून धन्वंतरीपूजन होते. शेतकरी शेतातून आलेल्या नव्या धान्याचे पूजन करतात. या दिवशी अनेकजण दीपदान व परोपकार करतात. आयाबाया सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करतात आणि काहीजण तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, ‘आम्हा घरी धन-शब्दांचेच’, शब्द पाळतात. असा हा एकमेकांना समजून घेण्याचा हा दिवस. तिसरा दिवस-नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासुराला ठार मारले ती नरकचतुर्दशी. या दिवशी त्वचा कांतिमान राहण्यासाठी आणि स्नायू बळकटीसाठी अभ्यंगस्नान केले जाते. अनेकदा आणि यावर्षीही नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन अनुक्रमे सकाळ आणि संध्याकाळी केले जात आहे. लक्ष्मी-कुबेरपूजन करतात. लक्ष्मीची धनलक्ष्मी-धान्यलक्ष्मी-धैर्यलक्ष्मी-शौर्यलक्ष्मी-विद्यालक्ष्मी-कीर्तीलक्ष्मी-विजयलक्ष्मी-राज्यलक्ष्मी अशी आठ रूपे सांगितलेली आहेत. प्रत्येकाच्या घरीदारी अशी लक्ष्मी असतेच. प्रत्येकाला जाणीव असणे महत्त्वाचे. सन्मार्गाने-सत्कर्माने-सद्उद्योगाने सर्वांनीच लक्ष्मी कमवावी आणि सद्गुणांनी खर्च व्हावी. हे खरे लक्ष्मीचे रूप झाले, तर लाचखोरी बंद होईल. लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीची पूजा करून तिचे गावाबाहेर विसर्जन केले जाते. तिचे वाहन गाढव असून तिच्या हातात शस्त्र म्हणून झाडू असतो, म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा करण्याची रीत आहे. झाडू किंवा फडा खरं पाहता स्वच्छतेचे काम करतो. आपणही आर्थिकदृष्ट्या स्वच्छ वागूयात. कुबेर हा संपत्तीचा रक्षक मानला जातो, म्हणून त्याचीही लक्ष्मीबरोबर पूजा करतात. जुन्या चालीरीती नवीन युगात आपण बदलल्या पाहिजेत. त्यांचे संदर्भ आपणच निर्माण केले पाहिजेत. काळानुरूप त्यातील बदल करण्याकरिता आपण स्वतः जपले पाहिजे.
-------
बलिप्रतिपदा, विक्रम संवत प्रारंभ, गोवर्धनपूजा
बळी हा राजा होता. ‘बळिराजा’ हा भक्त प्रल्हादाचा नातू. या राजाचे भूलोकावर राज्य होते. सर्व प्रजा शेतकरी होती. बळिराजा प्रजेच्या कल्याणासाठी दिवसरात्र झटत असे, म्हणून शेतकऱ्यांना बळीचे लेकरं म्हणत. त्याचा कारभार चांगला होता. पण, त्याच्या दैत्यसेनेवर अत्याचारी म्हणून ठपका ठेवण्यात आला. विष्णू ‘बटू’च्या रूपात वामन अवतार घेऊन बळीकडे आले आणि तीन पावले जमीन मागितली. शेतकऱ्यांच्या राजाला जमीन म्हणजे काहीच नाही. मुळात राजा उदार होता, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. मग पहिल्या पावलात आकाश, दुसऱ्या पावलात भूलोक आणि तिसऱ्या पावलात जागाच शिल्लक न राहिल्याने बळिराजाने विष्णूंच्या पुढे आपले मस्तक ठेवले आणि तो पाताळलोकात ढकलला गेला. त्यास पातळाचे राज्य मिळाले. विष्णूंनी बळिराजाला एक दिवस भूलोकावर येऊन आपल्या प्रिय प्रजेला म्हणजेच शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली. बळिराजा आपल्या शेतकरी लेकरांना भेटण्यासाठी पृथ्वीतलावर येतो तोच दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकरीदादा गावागावांत-रानात हजारो पणत्यांची आरास करून पूर्वीपासून बळी आगमन दिवस साजरा करतात. आता त्याच्या रूपाने धान्याची पूजा म्हणजेच बळीची पूजा केली जाते. शेतकरणी बळीचा प्रतिनिधी म्हणून आपल्या शेतकरी पतीला ओवाळतात आणि मागणी करतात, की ‘इडा पिडा टळो अन् बळीचे राज्य येवो.’ पुराणात सांगितलेले आता सुधारावे लागेल. जो तो शेतकरी पुत्र म्हणून घेतो, शेतकरी प्रतिनिधी असंख्य आहेत. पण, बळिराजाचे राज्य आलेच पाहिजे. कृषिप्रधान देशातला हा प्राधान्यक्रम आहे. कुणब्यांना खरा फायदा आता झालाच पाहिजे! विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभही याच पाडव्याच्या दिवसापासून होतो. उज्जैनीचा महापराक्रमी राजा विक्रमादित्य याने परकीय शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पराभव केला. त्या रोमहर्षक विजयाचे प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्य याने ‘विक्रम संवत’ ही कालगणना सुरू केली. इसवी सन पूर्व ५७ पासून ही कालगणना अजूनही प्रचलित आहे. या दिवशी गोवर्धनपूजनही करतात. गोकुळवासीयांना वाटे, की इंद्रदेव पाऊस पाडतो. म्हणून ते इंद्राची पूजा करत; पण भगवान श्रीकृष्णाने सांगितले, की इंद्र पाऊस पाडत नसून गोवर्धनपर्वत पाऊस पाडतो, म्हणून गोवर्धनपर्वत पूजन होते. हे भगवान श्रीकृष्णाने ५२४८ वर्षांपूर्वी सांगितलेले आहे. झाडांपासून पाऊस पडतो, किती सोपे आणि साधे उदाहरण दिलेले आहे आपल्या भारतीय माणसाने. पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान आता प्रगत झालेले आहे. पण, विमानापेक्षा झाडे कधीही पाऊस पडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. नैसर्गिक-बिनाखर्चिक-वेळकाढूपणा नसलेले आणि शाश्वत भारतीय शास्त्र आपण जपूयात! दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते. नाजूक रेशीम नात्याचा पती-पत्नीचा हा सण रेशीमबंध घट्ट करणारा आहे. कवयित्री शांता शेळके यांनी, ‘रेशमाच्या रेघांनी...’ हा भाव अचूक टिपला आहे. घरधनीण ‘पैठणीसाठी’ आसुसलेली असते. सोने-चांदीचे दागिने भेट मिळतात. यापेक्षाही पती-पत्नीची आवड-विश्वास-सहकार्य-सोबत-मोकळेपणा आणि संसाराला जपलेले गुण ध्यानात घेऊन जगणे उत्तम आहे. अशा गोष्टी संवर्धित करण्यासाठी सण असतात. बहिणभावाचा सण भाऊबीजही दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी भाऊबीजेसाठी गेला होता, त्यामुळे यमद्वितीया आणि आत्ताची भाऊबीज आहे. सुख-दुःखात आईनंतर बहीणच अत्यंत जवळची असते भावासाठी. समवयाची असल्यामुळे आयुष्याचे अनेक चढ-उतार बहीण हलके करते. म्हणून बहीण-भावाच्या नात्याला फार जपले जाते, ते श्रेष्ठत्त्व आहे. एकूणच मानवी जीवनाचा खोपा विणणारा दिवाळी हा सण आनंद व उत्साहाचा आहे.
-----
शेतकऱ्यांची दिवाळी...
अनेकांची दिवाळी आणि शेतकऱ्यांची दिवाळी यामध्ये निश्चित फरक आहे. शेत पिकल्यावर शेतकऱ्यांचे जीवन पिकत असते. यावर्षी बेताचा झालेला पाऊस, दुष्काळी परिस्थिती, कापूस, सोयाबीन, मका, ऊस पिकांचा कमी येत असलेला उतारा याचा फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो. हमीभावासाठी दिवाळीतही शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागतात. जगाचा पोशिंदा शेतकरी लढतो... परिस्थिती कितीही अवघड असू द्या, तग धरतो... कष्टाची किंमत करायची नाही अन् शिधा वाटायचा ही उलटी गंगा सरकार का आणते? पीकविमा अग्रीम रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शुभेच्छांची नव्हे कृतीची गरज आहे. सरकार मायबापाला एवढेच सांगणे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.