पान तीन लीड
---
उत्सवांच्या काळात प्रतीक्षा आनंदाच्या सरींची
पावसाची प्रदीर्घ ओढ; परभणी जिल्ह्यात १२ सप्टेंबरपर्यंत केवळ ३६५.२ मि.मी. पाऊस
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १४ ः पावसाळ्याचे साडेतीन महिने संपत आले तरी परभणी जिल्ह्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. जूनपासून १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. विशेषतः सप्टेंबरच्या पहिल्या १२ दिवसांत केवळ ५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याने खरीप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. पावसाचा दीर्घ खंड, जमिनीतील कमी होत चाललेला ओलावा आणि घटणारे जलसाठे यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सद्यःस्थितीत बळिराजा सण-उत्सवांच्या काळात तरी जोरदार सरींच्या प्रतीक्षेत आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्याचे सामान्य पर्जन्यमान ५९२.३ मि.मी. आहे. या कालावधीत प्रत्यक्षात ३६०.२ मि.मी. पाऊस झाला असून, हे प्रमाण सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ ६०.८ टक्के आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्येही पावसाने मोठी हुलकावणी दिली. सप्टेंबरचे सामान्य पर्जन्यमान ६७.६ मि.मी. असताना १२ सप्टेंबरपर्यंत केवळ ५ मि.मी. पाऊस झाला. म्हणजेच महिन्याच्या सामान्य पर्जन्यमानाच्या अवघे ७.४ टक्के पाणी जिल्ह्याला मिळाले आहे. जून ते १२ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सामान्य पर्जन्यमान ६६९.९ मि.मी. अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३६५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत केवळ ५५.३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ६००.५ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच कालावधीत ३६५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २३५.३ मि.मी. पावसाची तूट आहे. संपूर्ण जून ते सप्टेंबर कालावधीचे सामान्य पर्जन्यमान ७६१.३ मि.मी. असताना आतापर्यंत त्याच्या तुलनेत सुमारे ४८ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील प्रमुख पिके आहेत. जून-जुलैमध्ये झालेल्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसात वारंवार खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सध्या पिकांना वाढीसाठी आणि दाणे भरण्यासाठी ओलाव्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीत असलेली पिके कोमेजण्यास सुरवात झाली असून, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सप्टेंबरच्या उर्वरित दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सोयाबीन व कापसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
चौकट
सोनपेठ, मानवत, सेलू तालुके सर्वाधिक बाधित
जून ते सप्टेंबर या कालावधीतील सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे. सोनपेठ तालुक्यात सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ ३८.८ टक्के, मानवत येथे ४३.२ टक्के, सेलू ४४.२ टक्के, पाथरी ४४.८ टक्के आणि परभणी तालुक्यात ४८ टक्के पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यात ५०.८ टक्के, गंगाखेडमध्ये ५१.१ टक्के, पालममध्ये ५२.५ टक्के, तर जिंतूर तालुक्यात ५६.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबरच्या सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यातील एकही तालुका समाधानकारक पातळीवर पोचलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.