जलाशयातील मोटारी काढून घ्या,अन्यथा जप्ती
------------------
-पेडगावात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आक्रमक
जांब, ता १५ (बातमीदार) : दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने पेडगाव जलाशयातील पाण्याच्या वापराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. जलाशयावर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी, अन्य प्रकारचे पंप तातडीने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या मोटारी, वायर व इतर साहित्य जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध साठा जपणे आणि पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक पाणीस्रोतांमधील पाण्याचा अनियंत्रित उपसा झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासह इतर गरजांसाठीही टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पेडगाव जलाशयातील उपलब्ध साठा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. पेडगाव जलाशयाच्या पाण्यावर विद्युत मोटारी किंवा अन्य माध्यमांतून चालणारे पंप बसविणाऱ्या शेतकऱ्यांनी आज किंवा उद्या स्वतःहून ते काढून घ्यावेत असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. दिलेल्या मुदतीत मोटारी काढून न घेतल्यास शासनाच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत संबंधित मोटारी, विद्युत वायर आणि इतर साहित्य जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
(((चौकट)))
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
दुष्काळाच्या काळात प्रत्येक थेंब पाण्याचे महत्त्व वाढते. त्यामुळे वैयक्तिक गरजांबरोबरच सार्वजनिक पाणीसाठ्याचे संरक्षण करण्याची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारणे आवश्यक आहे. पेडगाव जलाशय परिसरातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून मोटारी तातडीने काढून घ्याव्यात, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय आणि अनियंत्रित उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे जलाशय परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील कारवाईकडे लागले आहे.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.