हयातीचा दाखला न दिल्यास डिसेंबरपासून पेन्शन होणार बंद
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ (बातमीदार) ः जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारकांसाठी (पेन्शनर्स) एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चालू वर्षातील (२०२६) हयातीचा दाखला सादर करण्यासाठी प्रशासनाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२६ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे. जर या निर्धारित मुदतीत हयातीचे प्रमाणपत्र सादर केले नाही, तर संबंधितांना डिसेंबर २०२६ पासून पेन्शन अदा केली जाणार नाही, असा सज्जड इशारा बीडचे जिल्हा कोषागार अधिकारी महेश बाब्रस यांनी दिला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनी शेवटच्या दिवसांची वाट न पाहता लवकरात लवकर आपला दाखला सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बँकांमध्ये होणारी अनावश्यक गर्दी आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहिल्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी शासनाने डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. jeevanpramaan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्मार्टफोनवर जीवन प्रमाण ॲप्लिकेशन डाउनलोड करून घरबसल्या चेहरा किंवा बोटांच्या ठशांद्वारे ऑनलाईन ओळख पटवून आपला हयातीचा दाखला सहज सादर करता येणार आहे. याशिवाय, डाक विभागातर्फे देखील सशुल्क डिजिटल दाखला घरपोच ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
-----
बँकेत प्रत्यक्ष जाऊन सुविधा
ज्यांना ऑनलाइन शक्य नाही, ते संबंधित बँकेत प्रत्यक्ष उपस्थित राहून यादीतील नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून दाखला देऊ शकतात. यादरम्यान आपला चालू मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, तसेच पुनर्विवाह किंवा पुनर्नियुक्तीबाबतची माहिती नोंदवणे अनिवार्य आहे. हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी घेऊन ते थेट जिल्हा कोषागार कार्यालयातही जमा करता येते.
----
परदेशातील पेन्शनर्ससाठी पर्याय
जे निवृत्तीवेतनधारक काही कारणास्तव परदेशात वास्तव्यास आहेत, त्यांच्यासाठीही विशेष सोय करण्यात आली आहे. तेथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून संबंधित पेन्शनर्स आपला हयातीचा दाखला कोषागाराकडे सुरक्षितपणे पाठवू शकतात. वेळेत दाखला न दिल्यास वेतन थांबवले जाईल, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे कळवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.