बातम्यांची कारणे
---
सकाळ इम्पॅक्ट
---
प्रत्येक पेट्रोल पंपाची आता झाडाझडती
-------
जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; सुविधा कार्यान्वित करण्यासाठी पंपचालकांना दिला १५ दिवसांचा कालावधी; अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार
---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ७ : प्रत्येक पेट्रोल पंपाने मोफत हवा, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रथमोपचार पेटी, मोफत फोन कॉल, तक्रारवही, स्वच्छ स्थितीतील स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह अशा आवश्यक सुविधा ग्राहकांना पुरविणे बंधनकारक आहे. या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी पंपचालकांना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी १५ दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यानंतर शहरातील व जिल्ह्यातील सर्व प्रत्येक पेट्रोल पंपांची उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत काटेकोर तपासणी केली जाणार आहे. यात अनियमितता आणि सुविधांचा अभाव आढळल्यास पेट्रोल पंपांवर दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर आवश्यक सुविधांचा अभाव आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सकाळ’मध्ये ‘कुठेय सुविधा?’ अशी वृत्त मालिका प्रकाशित झाली. पेट्रोल पंपांवर पिण्याचे पाणी नाही, मोफत हवा भरण्यासाठी पैसे मागितले जातात, हवा भरण्याची यंत्रे नादुरुस्त आहेत, हवा भरण्यासाठी कामगार उपलब्ध नाहीत, पेट्रोल पंपांवर स्वच्छतागृहांचा अभाव आहे, तिथे स्वच्छता राखली जात नाही याकडे ‘सकाळ’ने वृत्त मालिकेतून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपचालकांना ‘येत्या पंधरा दिवसांत सर्व सुविधा पुरवा अन्यथा कारवाई होईल’, अशा स्पष्ट सूचना सोमवारी (ता. पाच) परिपत्रकाद्वारे दिल्या.
राष्ट्रीय मार्गावरील किंवा राज्य मार्गावरील पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाच्या सुविधांची तरतूद करणे आवश्यक आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह सुविधा जनतेसाठी २४ तास उपलब्ध असतील, त्याबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी पेट्रोल पंपावर प्रवेश करण्यापूर्वी अशा सुविधांची उपलब्धता दर्शविणारा फलक लावण्याबाबत सर्व पेट्रोल पंपधारकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, काही पेट्रोल पंपावर महिला व पुरुष स्वच्छतागृह कुलूप लावून बंद ठेवल्याचे, स्वच्छतागृह नादुरुस्त असल्याचे, स्वच्छतागृहामध्ये पुरेशा पाण्याची व्यवस्था नसल्याचे तसेच महिला व पुरुषाचे स्वच्छतागृह हे स्वच्छ नसल्याचे व अन्य आवश्यक सुविधा पुरविल्या जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्व पेट्रोल पंपधारकांनी स्वच्छ भारत मिशन व पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियमानुसार पेट्रोल पंपावर स्वच्छ व वापरण्यायोग्य स्वच्छतागृह असणे आणि मोफत देणे बंधनकारक आहे. तेव्हा पेट्रोलपंपावर महिला व पुरुषाचे स्वच्छतागृह व इतर सुविधा जनतेसाठी २४ तास पुढील १५ दिवसांत उपलब्ध करून द्याव्यात. या सर्व बाबींचे काटेकोरपणे तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिले.
----
पथक तयार करण्याच्या सूचना
लातूर, निलंगा, अहमदपूर, उदगीर, औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी (उपविभागीय दंडाधिकारी) यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पेट्रोल पंपाची तपासणी करण्याकरिता पथक तयार करावे. पेट्रोल पंपावरील सुविधांची तपासणी करून, त्याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिले.
----
((कोट))
पेट्रोल पंपावर येणाऱ्या सर्व वाहनधारकांना मोफत हवा, स्वच्छ पाणी, चांगले स्वच्छतागृह या सुविधा पुरवणे हे पेट्रोल पंपचालकांसाठी बंधनकारकच आहे. पेट्रोल पंपचालकांनी या सुविधा तातडीने सुरू कराव्यात. यासंदर्भात पाच ऑक्टोबरला नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी.
- व्यंकटेश रावलोड, जिल्हा पुरवठा अधिकारी
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.