‘खाकी’चा रील्समोह पुन्हा उफाळला
एसपींच्या कारवाईच्या इशाऱ्याला पोलिसांचीच केराची टोपली
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ : जिल्ह्यात खाकी वर्दीचा मान आणि कर्तव्यावरील नियमांची पायमल्ली करत पोलिसांचा ‘रील्स’मोह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पदभार स्वीकारताच ऑन ड्युटी आणि वर्दीत रिल्स बनवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही दंडात्मक कारवाई न झाल्याने पोलिसांकडून या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, खुलेआम वर्दीत रील्स बनवण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शिस्तीचा बडगा उगारत, ड्युटीच्या वेळेत किंवा अंगावर खाकी वर्दी असताना कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडिया रिल्स बनवण्यास सक्त मनाई केली होती. या इशाऱ्यानंतर काही काळ या प्रकारांना आळा बसला होता. मात्र, कारवाई न झाल्याने पोलिसांचे धाडस पुन्हा वाढले आहे. सध्या बीड जिल्ह्यात अनेक पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी आणि अंगावर वर्दी असताना विविध गाण्यांवर रिल्स बनवत असल्याचे उघडकीस येत आहे. हे व्हिडिओ इन्स्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात आहेत. वरिष्ठांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून थेट केराची टोपली दाखवली जात असून, अद्याप एकावरही ठोस कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
------
प्रतिक्रिया
खाकी वर्दीची शिस्त आणि ड्युटीचे भान राखणे अनिवार्य आहे. ऑन ड्युटी व वर्दीवर रिल्स बनवू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर खात्यांतर्गत कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. शिस्तीबाबत तडजोड केली जाणार नाही.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.