भूजल पातळीत अडीच मीटरने घट
---------------
पावसाअभावी रब्बीचे क्षेत्र घटणार, नैसर्गिक पाणीस्त्रोत कोरडे
--------
सकाळ वृत्तसेवा
हिंगोली, ता. ३० : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाला फटका बसला असून, आता रब्बी हंगामही संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मागील अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भूजल पातळीत सुमारे अडीच मीटरने घट झाली आहे. विहिरींनी तळ गाठला असून, अनेक ठिकाणचे बोअरवेलही कोरडे पडू लागले आहेत. दुसरीकडे प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी, यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरवातीला समाधानकारक पावसाची अपेक्षा असताना ऐन हंगामात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात घट झाली आणि अनेक शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही वसूल करता आला नाही. काही शेतकऱ्यांवर उभी पिके काढून टाकण्याची वेळ आली. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामाचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण नाही. त्यातच विहिरी आणि बोअरच्या पाणीपातळीत घट झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शाश्वती राहिलेली नाही. नैसर्गिक पाण्याचे स्रोतही आटत चालले आहेत. पावसाची अशीच दडी कायम राहिल्यास रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडण्याबरोबरच लागवडीखालील क्षेत्रही घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही हातचा जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
-------------------
रब्बी हंगामाचे प्रस्तावित क्षेत्र (हे)
ज्वारी - १७,४७९
गहू - ३६,६४६
हरभरा- १,६३,८४०
सूर्यफूल - ८०४
तीळ - ६४१
कांदा - ६०
मका- १,५६९
करडई - २,८०१
--------------
गव्हाचे क्षेत्र निम्म्याखाली येणार
जिल्ह्यातील बहुतांश भागातील सोयाबीन काढणी जवळपास अटोपली आहे. त्या शेतात शेतकरी गव्हाची पेरणी करीत असतात. मात्र, यंदा अत्यल्प पावसाअभावी विहीर, बोअरवेलला मुबलक पाणी नाही. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र निम्म्याखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
----------------
सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित
कृषी विभागाकडून रब्बी हंगामाची तयारी करण्यात आली आहे. या हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खताचा साठा उपलब्ध आहे. यंदा २ लाख २५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीसाठी प्रस्तावित आहे; परंतु, पावसाअभावी जमिनीत ओल नाही आणि विहिरी, बोअर, साठवण प्रकल्पातही पाणीसाठा उपलब्ध नाही. परिणामी, प्रस्तावित क्षेत्राचा आकडा कमी होणार आहे.
--------------
((कोट))
अत्यल्प पावसामुळे सोयाबीन हातचे गेले. किमान परतीचा पाऊस तरी समाधानकारक होईल, अशी आशा होती. जेणेकरून रब्बीची पिके पदरात पडली असती; परंतु, पावसाने दडी मारल्याने हा हंगामही धोक्यात आहे. चार-आठ दिवसांत पाऊस झाला नाही, तर रब्बीची पिके पेरता येणार नाही.
- काशिराम कऱ्हाळे, शेतकरी
---------------------
((कोट))
सध्या विहिरीने तळ गाठला असून, पाणी उपसा केल्यानंतर पुन्हा दोन ते तीन दिवस विहिरीत पाणी येण्यास लागत आहेत. त्यामुळे यंदा गहू, हरभरासह रब्बीची इतर पिके पेरणे शक्य होणार नाही. सध्या शेतात हळद, कापूस, तूर ही पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. अशा परिस्थितीत रब्बीचा विचार करणेही अवघड आहे.
- शिवाजी टापरे, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.