रायझिंग मराठवाडा - रवी खिंवसरा
----
खिंवसरा ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष रवी खिंवसरा यांचा रिअल इस्टेट हा तसा पिढीजात उद्योग.
सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून आणि अहमदाबाद येथे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९८५ मध्ये त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरातील मच्छली खडक परिसरात वसंत भवनजवळ पहिला बांधकाम प्रकल्प उभारला. त्यानंतर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांची मालिका सुरू झाली. वर्ष २००० पूर्वी शहरात गृहबांधणीची मागणी मर्यादित होती. बाहेरील छोट्या शहरांमधून स्थलांतर होत असले तरी खरेदी क्षमता कमी आणि गृहकर्जाची उपलब्धता मर्यादित असल्याने बाजारपेठ संथ होती. त्यानंतर शहराच्या गरजा वाढतील तसे ‘मॉडिफिकेशन’ करत ते वाटचाल करत राहिले. रिअल इस्टेट क्षेत्राच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात खिंवसरा यांचे मोठे योगदान मानले जाते.
-------
गृहप्रकल्पांसोबतच आता को-वर्किंग स्पेस
छत्रपती संभाजीनगरसोबत मराठवाड्यात बांधकाम क्षेत्रासाठी नवनव्या संधींची दारे खुली होत आहेत. रिअल इस्टेट उद्योगानेही येत्या काळात गृहप्रकल्पांसोबतच हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र राहण्याची सेवा (सिनिअर लिव्हिंग सिस्टीम), को-वर्किंग स्पेस यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अग्रेसर व्हायला हवे, असे मत खिंवसरा ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष रवी खिंवसरा यांनी व्यक्त केले. कोणत्याही शहराचा विकास केवळ इमारती उभारण्यात नसून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणाऱ्या नियोजनात असते. समृद्धी महामार्गासोबतच मराठवाड्यातील सुधारलेले इतर रस्ते आणि हवाई सेवांमुळे मुंबई अवघ्या साडेतीन तासांवर आणि नागपूर चार-पाच तासांच्या अंतरावर आले. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि डेस्टिनेशन वेडिंगसाठी दिवसेंदिवस मराठवाड्यातील शहरांचे महत्त्व वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
-----
छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यातील विविध शहरांचा विस्तार आता वाढलेला आहे. विशेषतः संभाजीनगराने महानगराचे रूप धारण केलेले आहे. नव्या नागरी वसाहतींची उभारणी शहराच्या बाह्यभागात झालेली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदार आणि मोठ्या ब्रँडचा छत्रपती संभाजीनगराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पूर्वी लोक विचारायचे, ‘संभाजीनगरला का यायचे?’ आज परिस्थिती उलट आहे. आता मोठमोठे उद्योग समूह, हॉटेल ब्रँड आणि गुंतवणूकदार स्वतःहून येथे येण्यास उत्सुक आहेत, असे खिंवसरा यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय को-वर्किंग स्पेस शहरात
जागतिक स्तरावरील ‘रिगस’ या को-वर्किंग स्पेस कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. येत्या काळात चिकलठाणा विमानतळ परिसरात २०० जणांच्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय दर्जाची को-वर्किंग स्पेस असलेले अत्याधुनिक कार्यालय विकसित तयारी सुरू आहे. आज अनेक कंपन्यांना कायमस्वरूपी कार्यालय नको असते. त्यांना काही दिवस किंवा काही महिन्यांसाठी सुसज्ज कार्यालय हवे असते. ही गरज ओळखून आम्ही को-वर्किंग स्पेस निर्माण करत असल्याचेही खिंवसरा यांनी सांगितले. याशिवाय सेवा अपार्टमेंट्स, सुपरमार्केट आणि कॉर्पोरेट ग्राहकांसाठी दीर्घकालीन निवास सुविधा विकसित करण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहराला हव्यात या सुविधा
छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी अंतर्गत रस्ते, सार्वजनिक वाहतूक, परिसरनिहाय नियोजन, व्यापाऱ्यांसाठी नियोजित व्यावसायिक जागा आणि सरकारी पातळीवर व्यावसायिक हब उभारण्याची गरज आहे. सिडकोच्या एन-१, एन-२ आणि एन-३ भागांप्रमाणे प्रत्येक परिसरात शाळा, उद्याने, बाजारपेठ आणि दैनंदिन सुविधा असलेले नियोजन आवश्यक आहे. सुसज्ज नाट्यगृहाचीही गरज खिंवसरा यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठांचे जीवन व्हावे सुलभ
छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विचारही होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत नक्षत्रवाडी मुख्य रस्त्यावरील खिंवसरा सिटी येथे एक एकर जागेवर ‘विश्रामवाडा’ हा सिनिअर लिव्हिंग प्रकल्प उभारला जाणार आहे. सुमारे २०० सदनिका आणि काही व्यावसायिक जागांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात व्हीलचेअर, रॅम्प, रुंद दरवाजे, विशेष स्नानगृहे आणि आधारासाठी ग्रॅब बारची व्यवस्था असेल. २४ तास वैद्यकीय सुविधा, डॉक्टर, फिजिओथेरपी केंद्र, मेडिकल, रुग्णवाहिका सेवा आणि रुग्णालयांशी समन्वयाची व्यवस्था असेल. यासाठी पाच मोठ्या हॉस्पिटलसोबत करार करण्यात येणार आहे. याशिवाय कॅरम, बुद्धिबळ, कार्ड रूम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनशैली उपलब्ध करून देण्यावर भर असेल. विशेष स्मार्ट घड्याळाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा कर्मचारी, डॉक्टर आणि कुटुंबीयांना तत्काळ सूचना पाठविण्याची सुविधाही करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पारंपरिक वृद्धाश्रम नसून मालकी हक्काच्या स्वरूपातील सुरक्षित आणि सन्मानपूर्व सिनिअर लिव्हिंग संकल्पना असल्याचेही खिंवसरा यांनी स्पष्ट केले.
हॉस्पिटॅलिटी विकसित करण्यावर भर
शहरात विविध भागीदारीतून ६०० ते ७०० खोल्यांची हॉस्पिटॅलिटी क्षमता विकसित केली जाणार आहे. टाटा समूहाशी संबंधित ब्रँड, जिंजर, क्लार्क्स, अनंता, लोणावळ्यातील ‘मचान हिल’ यांसारख्या ब्रँड्सबरोबर विविध प्रकल्प सुरू आहेत. विशेषतः वेरूळ परिसरात लक्झरी रिसॉर्ट उभारण्याचे काम सुरू झाले असून, त्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंगसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जात आहेत. मुंबईत तीन कोटी रुपये खर्च करून लग्न करण्यापेक्षा संभाजीनगरमध्ये कमी खर्चात अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगचे मोठे केंद्र म्हणून शहर विकसित होण्याची क्षमता आहे.
खिंवसरा समूहाच्या वाळूज आणि औरंगपुरा अंबा-अप्सरा सिनेमागृहांत चार स्क्रीन कार्यरत आहेत. उल्कानगरीतील हाय स्ट्रीट मार्केट परिसरात सहा स्क्रीनचे लक्झरी मल्टिप्लेक्स उभारले जात आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत ते सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकूण १४ स्क्रीनचे नेटवर्क उभारले जात असून, शहरात आणखी मनोरंजन सुविधांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
---
विपश्यना केंद्राचा प्रकल्प
खिंवसरा ग्रुपतर्फे सुरू करण्यात आलेल्या जांभाळा परिसरातील विपश्यना केंद्रात सुमारे ७० मीटर उंच पॅगोडा आणि २०० ध्यान कक्ष उभारले जात आहेत. बौद्ध प्रेरित वास्तुरचनेतील हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, जात-पात आणि धर्माच्या पलीकडे सर्वांसाठी खुला असेल, अशी माहिती खिंवसरा यांनी दिली.
--
खिंवसरा उद्योगाची प्रेरणादायी वाटचाल
रिअल इस्टेट हा खिंवसरा यांचा पिढीजात उद्योग. वर्ष १९५८ मध्ये प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून सुरवात केलेल्या खिंवसरा रिअल इस्टेट समूहाने आज निवासी प्रकल्पांसह हॉस्पिटॅलिटी, मनोरंजन, सिनिअर लिव्हिंग, को-वर्किंग स्पेस आणि भविष्यातील शहरी विकासाच्या दिशेने मोठी वाटचाल सुरू केली. वर्ष १९५८ मध्ये केवळ १ हजार रुपयांत प्लॉट खरेदी करून त्यावर ३०० रुपयांचे टोकन देत या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला होता. त्यानंतर रवींद्रनगर, दमडी महाल यांसारख्या भागांतील सुरवातीच्या ले-आऊटच्या विकासात आमच्या कुटुंबाचा सहभाग होता. वर्ष १९६५ पूर्वी विकास आराखडा अस्तित्वात नसतानाही नियोजनबद्ध आणि कायदेशीर ले-आऊट तयार करण्यावर भर दिला, असे खिंवसरा यांनी सांगितले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.