मराठवाड्यात उभी राहावी संशोधनाची परिसंस्था
..
(((इंट्रो १))
प्रसाद कोकीळ हे संजय टेक्नो प्रॉडक्ट प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. वर्ष १९९६ पासून उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी प्लॅस्टिक इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाइल घटक निर्मितीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आहे. छत्रपती संभाजीनगरसह रांजणगाव, दिल्ली आणि पंतनगर येथे उद्योग विस्तार केलेला आहे. धातूऐवजी अभियांत्रिकी दर्जाच्या पॉलिमरचा वापर करून अनेक वाहन घटक विकसित केले. त्यांच्या उद्योगाला पाच पेटंट; त्यापैकी तीन स्वतंत्र आणि दोन सहकार्य प्रकल्पांतून मिळालेले आहेत. उद्योग, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात. टिंकरिंग लॅब, आयटीआय, अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. त्यांच्याकडून बायोमिमिक्री लॅब सुरू करण्यात आली असून त्यावर आधारित ते व्याख्यान देत असतात.
-------------
(((इंट्रो २))
मराठवाड्यात उद्योजकता, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता नाही; मात्र या क्षमतांना संशोधन आणि नवकल्पनांची जोड देणारी सक्षम परिसंस्था उभारण्याची गरज आहे. शालेय स्तरावरील टिंकरिंग लॅब, अभियांत्रिकी महाविद्यालये, आयटीआय आणि उद्योग यांच्यात समन्वय साधून संशोधन संस्कृती रुजवावी लागेल. संशोधन व विकासाकडे खर्च नव्हे, तर भविष्यातील गुंतवणूक म्हणून पाहणे आवश्यक आहे. त्यातून पेटंट, स्टार्टअप, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) उभी राहू शकतात. तरुणांचे स्थलांतर रोखून मराठवाड्याला केवळ उत्पादनाचे नव्हे, तर संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीचे केंद्र बनविण्याची क्षमता आहे.
..
मराठवाड्यात उद्योजकतेची परंपरा आहे, गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत, कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक कौशल्यही आहे. मात्र, या सर्वांना एकत्र बांधणारी संशोधनाधारित परिसंस्था अद्याप सक्षमपणे उभी राहिलेली नाही. त्यासाठी टिंकरिंग लॅबपासून ते ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) निर्माण करणे नितांत गरजेचे असल्याचे मत संजय टेक्नो प्रॉडक्टचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केले.
सध्या आपल्याकडे संशोधन आणि विकासात्मक कामांना तेवढी संधी मिळत नाही. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थी आणि अभियंते उच्च शिक्षण व करिअरसाठी मोठ्या शहरांकडे वळतात, विदेशात जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी शालेय स्तरापासून कुतूहल, प्रयोगशीलता आणि संशोधनाची संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. नवोन्मेषाची सुरवात उद्योगात होत नाही, तर ती शाळेतील टिंकरिंग लॅबसारख्या उपक्रमांमधून होते. मुलांच्या हातात साधने देऊन त्यांना प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि चुका करून शिकण्याची संधी दिली, तर त्यातूनच भविष्यातील संशोधक, अभियंते आणि उद्योजक घडतात. मात्र, अनेक शाळांमध्ये टिंकरिंग लॅब उभारल्या असल्या तरी त्यांचा सातत्याने वापर, आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांचा अभाव जाणवत असल्याची खंत कोकीळ यांनी व्यक्त केली.
..
अभियांत्रिकी शिक्षणाला हवी संशोधनाची जोड
आज अभियांत्रिकी शिक्षण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असले तरी संशोधन आणि उत्पादन विकासाकडे विद्यार्थ्यांचा कल अपेक्षेइतका दिसत नाही, असे नमूद करीत कोकीळ म्हणाले, की अंतिम वर्षातील प्रकल्प अनेकदा गुणांसाठी केले जातात; त्यांचे उत्पादन किंवा उद्योगातील समस्यांच्या निराकरणात रूपांतर होत नाही. त्यांनी स्थानिक उद्योगांशी भागीदारी करून प्रत्यक्ष समस्यांवर आधारित संशोधनाला चालना दिली पाहिजे. महाविद्यालये, संशोधन संस्था आणि उद्योग एकत्र आले, तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्पादन विकासाचा अनुभव मिळेल. याच प्रक्रियेतून पेटंट, स्टार्टअप आणि नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती होऊ शकते.
----------------
‘आर ॲण्ड डी’ खर्च नव्हे, तर गुंतवणूक समजावी
काही सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग संशोधन व विकासाला अतिरिक्त खर्च समजतात. मात्र, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आर ॲण्ड डी (रिसर्च आणि डेव्हपमेंट) हा उद्योगाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. नव्या उत्पादनांची निर्मिती, उत्पादन खर्चात बचत, दर्जात सुधारणा आणि आयात पर्याय विकसित करण्यासाठी संशोधन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या उद्योगाचे उदाहरण देताना कोकीळ म्हणाले, की आम्ही धातूऐवजी अभियांत्रिकी दर्जाच्या पॉलिमरचा वापर करून अनेक वाहन घटक विकसित केले. त्यामुळे उत्पादन हलके झाले, खर्च कमी झाला आणि कार्यक्षमताही वाढली. अशा प्रकारचे बदल केवळ उत्पादन प्रक्रियेतून नव्हे, तर सातत्यपूर्ण संशोधनातूनच शक्य होतात.
-----------------------
जागतिक क्षमता केंद्रांसाठी सक्षम पाया उभारण्याची वेळ
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी पदवीधर तयार होतात. मात्र, संशोधन आणि उच्च दर्जाच्या तांत्रिक नोकऱ्यांच्या संधी मर्यादित असल्याने अनेक तरुण पुणे, बंगळुरू, हैदराबाद किंवा परदेशात जातात. भविष्यात ऑटोमोबाइल, पॉलिमर, इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्राशी संबंधित जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी-ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर) उभारायची असतील, तर त्यासाठी संशोधन, कौशल्य आणि उद्योग यांची मजबूत साखळी तयार करावी लागेल. मराठवाड्यात प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती संधी, संशोधन सुविधा आणि उद्योग-अभ्यासक्रम यांच्यातील प्रभावी समन्वयाची. हा दुवा निर्माण झाला तर मराठवाडा केवळ उत्पादन करणारा नव्हे, तर तंत्रज्ञान विकसित करणारा प्रदेश म्हणूनही ओळख निर्माण करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------------------
‘जीसीसी’ म्हणजे काय?
जीसीसी (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर) म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधन, उत्पादन विकास (आर ॲण्ड डी), अभियांत्रिकी, डिझाइन, सॉफ्टवेअर, डेटा विश्लेषण आणि जागतिक व्यवसाय सेवा देण्यासाठी उभारलेले तांत्रिक केंद्र. या केंद्रांमधून जागतिक स्तरावरील नवकल्पना आणि उच्च कौशल्याधारित काम केले जाते. गेल्या ५ वर्षांत देशात १८०० सेंटर उभारले असून एकट्या पुणे आणि परिसरात असे २०० सेंटर तयार झालेले आहेत. पण आपल्याकडे त्यांची कमतरता आहे. यासाठी शासनाची वाट बघण्याची गरज नाही, आपणही पुढाकार घेऊ शकतो, असे मतही कोकीळ यांनी व्यक्त केले.
...
प्रयोगशाळा शेवट नव्हे
प्रयोगशाळा उभारणे हा शेवट नसून, तिथे नवकल्पना घडविण्याची संस्कृती निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे. कौशल्य विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी आयटीआय आणि उद्योग यांच्यात अधिक सुसंगत सहकार्य आवश्यक आहे. उद्योगांना कोणत्या प्रकारच्या कौशल्यांची गरज आहे, यानुसार अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणात सातत्याने बदल झाले पाहिजेत. केवळ प्रमाणपत्र देणाऱ्या संस्था न राहता प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेची ओळख करून देणारी कौशल्य केंद्रे म्हणून आयटीआय विकसित होण्याची गरज आहे. उद्योगांमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळातच अनुभवता आले, तर उद्योगांना तयार मनुष्यबळ मिळेल. विद्यार्थ्यांनाही रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. यामुळे उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.