बांधकाम कामगारांच्या बंद योजना पूर्ववत करा
-----
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
-----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १ ः राज्य शासनाने १३ जुलैला घेतलेल्या निर्णयानुसार बंद करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना त्वरित पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच प्रलंबित लाभांचे सर्व अर्ज तातडीने मंजूर केले जावेत, या प्रमुख मागणीसाठी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.
शासनाच्या या निर्णयामुळे भांडी संच, सुरक्षा संच, पाल्यांसाठीचे शैक्षणिक अर्थसाह्य, आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, घरकुल योजना, विवाह अर्थसाह्य, अपघात विमा आणि मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक साह्य यांसारख्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. परिणामी, नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय शासनाच्या या लाभांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे १३ जुलैचा शासन निर्णय रद्द करून या सर्व योजना पूर्ववत सुरू कराव्यात आणि महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर नव्याने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या बांधकामाचे व्यवहार मंदावले आहेत. रोजगाराअभावी कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या बिकट परिस्थितीत दुष्काळग्रस्त बांधकाम कामगारांना दिलासा देण्यासाठी त्यांना दरमहा तीन हजार रुपये आर्थिक साह्य देण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष नंदकुमार मानाळे, रवी पवार, सूरज भालेराव, आशा लोंढे, सरदार शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.