छत्रपती संभाजीनगर

नात्यांच्या गंधाने दरवळणारा आनंदोत्सव

CD
फोटोसह PRB26B66990 PRB26B66991 PRB26B66992 ---------------- ग्रामीण दिवाळी ः नात्यांच्या आनंदोत्सव …. शहरातील दिवाळी कितीही झगमगाटाची असली तरी ग्रामीण भागातील दिवाळीचा आनंद काही औरच असतो. मातीच्या सुगंधात, माणुसकीच्या उजेडात, आठवणींच्या पणत्यांत उजळणारी गावाकडची दिवाळी आठवली, की काळजात घालमेल होते. जुन्या आठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोर उभा राहतो. ते बालपणीचे गाव, मातीचे अंगण, शेणाने सारवलेली घरे, रांगोळ्यांचे रंग, वडीलधाऱ्यांनी स्वतः तयार केलेला आकाशकंदील, उटण्याचा सुगंध, फराळाचा घमघमाट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणसामाणसांतील जिव्हाळ्याची नाती! -जगदीश जोगदंड, पूर्णा --------------------- ग्रामीण संस्कृतीत दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नसतो, तर नात्यांना उजाळा देणारा, माणसांना एकत्र आणणारा आणि आठवणींची शिदोरी समृद्ध करणारा उत्सव असतो. गावात दिवाळीची चाहूल लागली की घराघरांत लगबग सुरू व्हायची. कुणी घराची साफसफाई करायचे, कुणी अंगण सारवायचे, तर कुणी जुन्या कपड्यांतून नवे काहीतरी शोधायचे. घरातील लहान मुलांना दिवाळीच्या खरेदीचे वेध लागायचे. नवीन कपडे, फटाके, फराळ, सुटीत मामाच्या गावाला जाण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यांत चमकायचे. दिवाळी आधीच घरातील वातावरण आनंदाने भरून जायचे. --- फराळाच्या डब्यात भरलेले प्रेम! ग्रामीण दिवाळीत फराळ म्हणजे केवळ खाण्याचे पदार्थ नव्हते, तर प्रेमाची देवाणघेवाण होती. चकल्या, करंज्या, लाडू, अनारसे, शंकरपाळे, चिवडा आणि शेव यांचा सुगंध घराघरांत दरवळायचा. विशेष म्हणजे फराळ तयार झाला की शेजारच्या घरात व नातेवाइकांना फराळ पोचल्याशिवाय दिवाळी पूर्ण झाल्यासारखी वाटत नसे. ‘आमच्याकडचे लाडू चाखून बघा!’ असे म्हणत डबा देणारी काकू आणि ‘तुमच्या करंज्या तर अगदी भारी झाल्यात!’ असे कौतुक करणारी शेजारीण, या संवादांतून नात्यांचा गोडवा अधिकच वाढायचा. कधी कधी फराळाची देवाणघेवाणही गंमतीशीर व्हायची. एका घरातून चिवडा आला की दुसऱ्या घरातून लाडू, तिसऱ्या घरातून करंज्या, चौथ्या घरातून शंकरपाळे! शेवटी प्रत्येक घरात फराळाचे इतके डबे जमा व्हायचे की घरातील मंडळी म्हणायची, ‘दिवाळी संपली तरी फराळ संपणार नाही बहुतेक!’ ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ हे वाक्य बहीण ओवाळताना पुटपुटायची त्यावेळी ऐकलेल्या वाक्याचा अर्थ तर मोठा झाल्यावर उमगला. बळिराजा प्रती असलेली कृतज्ञता ग्रामीण भागात आजही कायम आहे. भाऊबीजेचा ओलावा अन् बहिणीच्या ओवाळणीतील प्रेम चिरंतर आहे. ‘ग्रामीण दिवाळीतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे भाऊबीज. लग्न होऊन सासरी गेलेली बहीण भाऊबीजेला माहेरी येते, तेव्हा घरातील वातावरणच बदलून जाते. भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा, ओवाळणीचे ताट, बहिणीच्या डोळ्यांतील प्रेम, भावाच्या हातातील भेट... या सगळ्यांत एक वेगळाच भावनिक ओलावा असतो. कधी भाऊ उशिरा आला की बहीण रुसून बसायची. ‘आता ओवाळणारच नाही!’ अशी धमकी द्यायची. पण, भाऊ दोन गोड शब्द बोलला, एखादी छोटीशी भेट दिली की रुसवा क्षणात विरघळायचा. शेवटी ओवाळणी झाल्यावर बहिणीच्या हातचे लाडू खाताना भाऊ म्हणायचा, ‘अगं, पुढच्या वर्षी जरा मोठे लाडू कर!’ आणि त्यावर बहिणीचे उत्तर तयार असायचे, ‘आधी भेट मोठी आण, मग लाडूही मोठे मिळतील!’ या हलक्या फुलक्या संवादांतून भाऊबहिणीच्या नात्यातील प्रेम, हक्क आणि आपुलकी सहज व्यक्त व्हायची. लहान भांवडे असतील तर बहीणीला भेटवस्तू किंवा पैसे मी देणार नाही म्हणून हट्ट करणारा चिमुकला व पाया पडण्यावरून घडणाऱ्या गमती जमती विसरणे शक्यच नाही. ग्रामीण दिवाळी म्हणजे गमतीजमतींची खाणच! लहान मुलांचा फटाके फोडण्याचा उत्साह तर विचारायलाच नको. एखाद्याने मोठा फटाका आणला की सगळ्या मित्रांची गर्दी त्याच्याभोवती जमायची. फटाका पेटवताना धाडस दाखवणारा मुलगा कधी कधी वात पेटताच दूर पळायचा आणि फटाका फुटल्यावर परत येऊन म्हणायचा, ‘मी मुद्दामच दूर गेलो होतो!’ फटाके फोडताना एखाद्याची चप्पल उडाली, कुणाच्या हातातील फुलबाजी विझली, तर कुणी भुईचक्र फिरताना त्याच्या मागे धावत सुटले. या छोट्या छोट्या घटनांवरून दुसऱ्या दिवशी मस्त चर्चा रंगायची. काही घरांत दिवाळीच्या दिवशी पहाटे उठण्याची स्पर्धाच असायची. आईने अभ्यंगस्नानासाठी उठवले की मुलांचे ठरलेले उत्तर, ‘आता पाच मिनिटे झोपू दे!’ आणि आईचे ठरलेले प्रत्युत्तर, ‘सूर्य उगवायच्या आधी उठायचे असते!’ शेवटी तेल लावून, उटणे चोळून, गरम पाण्याने स्नान करून औक्षण झाल्यावर नवीन कपडे घातले की मुलांच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. ---- शेताच्या बांधावरची दिवाळी ः माणुसकीचा उजेड ग्रामीण दिवाळीचा एक वेगळाच पैलू म्हणजे शेतकरी कुटुंबांचा आनंद. वर्षभर शेतात राबणारे हात दिवाळीच्या दिवसांत थोडे निवांत व्हायचे. गोधनाची पूजा, बैलांची सजावट, गोवर्धन पूजा, घरातील जनावरांना गोडधोड खाऊ घालणे, तोरण व हार लावणे, अंगणात रांगोळी काढणे, किल्ला तयार करणे, पाच पांडव तयार करणे आणि देवापुढे दिवा लावणे... या परंपरांतून शेती, पशुधन आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ व्हायचे. गावातील एखाद्या घरात आर्थिक अडचण असेल, तर शेजारी मदतीला धावून यायचे. कुणी फराळ द्यायचे, कुणी मुलांसाठी कपडे आणायचे, तर कुणी दिवाळीचा किराणा पोचवायचे. अशा वेळी कुणी उपकाराची भाषा करायचे नाही. उलट, ‘अहो, आपल्याच घरातले आहेत!’ असे सहज म्हणायचे. ग्रामीण संस्कृतीचे हेच खरे वैभव! आजीच्या गोष्टी, आजोबांच्या आठवणी आणि बालपणाचा ठेवा. दिवाळीच्या रात्री अंगणात बसून आजीच्या गोष्टी ऐकण्याची मजा काही औरच होती. रामायण, महाभारत, राजा-राणी, भुताखेतांच्या गोष्टी आणि गावातील जुन्या आठवणी... आजीच्या शब्दांतून एक वेगळे विश्व उभे राहायचे. आजोबा आपल्या काळातील दिवाळी सांगायचे. ‘आमच्या वेळी फटाके कुठे होते?’ आम्ही मातीचे दिवे लावायचो. घरच्या घरी फराळ व्हायचा. सगळे एकत्र बसून जेवायचो!’ त्यांच्या या आठवणी ऐकताना मुलांना आश्चर्य वाटायचे. मग एखादा नातू विचारायचा, ‘आजोबा, तुमच्या वेळी मोबाइल नव्हता, मग तुम्ही दिवाळीचे फोटो कसे काढायचे? आणि आजोबा हसत म्हणायचे, ‘आम्ही फोटो मनात काढायचो, म्हणून ते अजूनही जपून ठेवलेत!’ या एका वाक्यातच पिढ्यांमधील फरक आणि आठवणींची श्रीमंती सामावलेली असते. बदलत्या काळात ग्रामीण दिवाळी बरीचशी हरवली. तीला शहरी दिवाळीचा अधुनिक स्पर्श झाला आहे. मोबाइल, सोशल मीडिया, महागड्या भेटवस्तू, रेडीमेड फराळ, इलेक्ट्रिक रोषणाई यांचा प्रभाव वाढला आहे. एकत्र बसून गप्पा मारण्यापेक्षा संदेश पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी शेजारीपाजारी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला घरोघरी जायचे. वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे. आता एका क्लिकवर शुभेच्छा दिल्या जातात. तरीही ग्रामीण दिवाळीतील मातीचा सुगंध, नात्यांचा गोडवा, शेजाऱ्यांतील आपुलकी आणि सामूहिक आनंद आजही टिकून आहे. कारण गावातील दिवाळीचा खरा प्रकाश विजेच्या दिव्यांत नसून माणसांच्या मनांत आहे. ---- माणसांना जोडणारा प्रकाश! ग्रामीण दिवाळी ही केवळ सणाची परंपरा नाही, तर जगण्याची सुंदर पद्धत आहे. एकमेकांच्या सुखदुःखांत सहभागी होणे, रुसवेफुगवे विसरणे, नात्यांना जपणे, आनंद वाटून घेणे आणि गरजूंच्या घरातही दिवा पेटवणे... हीच दिवाळीची खरी शिकवण. आजही गावाकडच्या दिवाळीची आठवण आली की मन नकळत बालपणात जाते. अंगणातील पणत्या, आकाशात उडणारे फटाके, फराळाचा सुगंध, आजीच्या गोष्टी, भावंडांची धमाल आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणारा ''दिवाळीच्या शुभेच्छा!'' हा आवाज कानांत घुमू लागतो. दिवाळीच्या त्या आठवणी म्हणजे मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या असंख्य पणत्या. काळ कितीही बदलला, तरी या पणत्यांचा प्रकाश कधीच मंद होत नाही. म्हणूनच ग्रामीण दिवाळीचा खरा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर ‘दिवे घरात लावले जातात; पण दिवाळी मात्र माणसांच्या मनात उजळते!’ हीच ग्रामीण दिवाळीची खरी श्रीमंती, हीच नात्यांची खरी संपत्ती आणि हाच आपल्या संस्कृतीचा चिरंतन प्रकाश! ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT