छत्रपती संभाजीनगर

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य वेळी, योग्य कामासाठीच करावा : न्यायाधीश शिवराज पाटील

CD
‘सोशल मीडियाचा वापर जपून करा’ माकणी, ता. २८ (बातमीदार) : विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखून सोशल मीडियाचा वापर योग्य वेळी आणि योग्य कामासाठीच केला पाहिजे. सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि सोशल मीडियाच्या गैरवापरापासून सावध राहावे, असे आवाहन लोहारा न्यायालयाचे न्यायाधीश शिवराज पाटील यांनी केले. माकणी येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लोहारा तालुका विधी समिती, लोहारा पोलिस प्रशासन आणि पंचायत समितीच्या गटशिक्षण कार्यालयाच्या सहकार्याने बुधवारी (ता. २८) ‘सुरक्षित बचपन अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पोलिस निरीक्षक विजय पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. न्यायाधीश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अल्पवयीन मुलांकडून घडणारे गुन्हे आणि मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन केले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कुटुंब, शाळा आणि समाजाने एकत्रितपणे जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. शिवाजीराव मोरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख मोहन अगंबरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांनी आभार मानले. .......................................... पाणीटंचाईच्या प्रश्नावरून बेमुदत उपोषणाचा इशारा उमरगा, ता. २८ (बातमीदार) : डिग्गी गावातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, तसेच जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांनी गुरुवारी (ता. २९) सकाळी दहापासून नवीन पाणीपुरवठा टाकीवर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात गायकवाड यांनी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना दिलेल्या निवेदनानुसार १२ ऑक्टोबरला झालेल्या ग्रामसभेत आठ दिवसांत पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गावातील पाणीपुरवठा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जलजीवन मिशनअंतर्गत बांधलेली पाण्याची टाकी पूर्ण होऊन वर्ष उलटले, तरी ती अद्याप विनावापर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू नसताना संबंधित ठेकेदाराला कोणत्या आधारावर बिल देण्यात आले, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायतीला मिळालेला निधी पाणीपुरवठा योजनेसाठी का वापरला जात नाही, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. पाण्याची टाकी, विहिरीची कामे आणि संबंधित बिलांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ..................................... उमरगा शहरात ७ नोव्हेंबरपासून पाच दिवसीय ध्यानसाधना शिबिर उमरगा, ता. २८ (बातमीदार) : त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने उमरगा येथील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान ‘बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती’ या विषयावर पाच दिवसीय ध्यानसाधना व नीतिमूल्य निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील बौद्ध धम्माचे अभ्यासक धम्मचारी मणिधम्म या शिबिराचे नेतृत्व करणार आहेत. बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन धाराशिव त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी रत्नपालित यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या धम्मक्रांतीचा सखोल अभ्यास करणे, तिचे महत्त्व समजून घेणे आणि ध्यानसाधनेचा नियमित सराव करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात ध्यानसाधना, पूजा, धम्माभ्यास, गटचर्चा, संपर्क सराव, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयंशिस्त या सारखी सत्रे होणार आहेत. महिला आणि पुरुषांसाठी निवास व भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिरात धम्मचारी प्रज्ञाजित, कल्याणदस्सी, रत्नपालित, ज्ञानपालित, जिनोदय, जिनघोष, धम्मभूषण आणि विबोध यांची प्रवचने होणार आहेत. शिबिरासाठी धम्ममित्र अजिंक्य मुरूमकर, सुनील कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. ................................................. UMR26A19023 डॉ. बालाजी मदन इंगळे शैक्षणिक संशोधन शिष्यवृत्तीसाठी डॉ. बालाजी इंगळे यांची निवड उमरगा, ता. २८ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणारे माडज येथील ग्रामीण प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक डॉ. बालाजी मदन इंगळे यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक संशोधन शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. डॉ. इंगळे हे अध्यापनासोबतच शैक्षणिक संशोधनातही कार्यरत आहेत. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे, विचारक्षमतेच्या वृद्धीचे आणि सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे, या उद्देशाने ते प्रयत्नशील आहेत. या शिष्यवृत्तीमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास, अध्यापनाच्या अधिक प्रभावी पद्धती विकसित करण्यासह विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांना संशोधनाची संधी मिळणार आहे. या निवडीमुळे डॉ. इंगळे यांचे शाळेचे मुख्याध्यापक रामजी सोळुंके, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे. .............................. ANU26A01220 ‘मी असे पाणी वाचवले’तून जलसंवर्धनाचा संदेश केंद्रस्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अणदूर, ता. २८ (बातमीदार) : पाणी बचत आणि जलसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद धाराशिव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मी असे पाणी वाचवले’ या विषयावर केंद्रस्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा मंगळवारी (ता. २७) घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध माध्यमांतून पाणी बचतीचा संदेश दिला. केंद्रसमन्वयक डॉ. सीमा दुधगी अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी पाण्याचे महत्त्व, जलसाक्षरता आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज स्पष्ट केली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वर्षा सिंगारे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय वाघमारे यांनी आभार मानले. इयत्ता पहिली ते पाचवी गटात निबंध स्पर्धेत जान्हवी वारकड प्रथम, समृद्धी राठोड द्वितीय, पूर्वी गायकवाड तृतीय, तर चित्रकला स्पर्धेत प्रणय गायकवाड प्रथम, मयूर उजने द्वितीय, लक्ष्मी ढबाले तृतीय. इयत्ता सहावी ते आठवी निबंध स्पर्धेत शिवलीला भोळे प्रथम, रेणुका सांगवे द्वितीय, प्रगती जाधव तृतीय, तर चित्रकला स्पर्धेत अंकिता गळाकाटे प्रथम, देवयानी जाधव द्वितीय, मोहिनी गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. .............................. UMR26A19021 उमरगा ः करिअर कट्टाअंतर्गत शिवाजी महाविद्यालयाच्या गणेश मोरे याची दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली आहे. दिल्ली दौऱ्यासाठी गणेश मोरेची निवड उमरगा, ता. २८ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील बी.सी.एस. तृतीय वर्षाचा विद्यार्थी गणेश मोरे याची ‘नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र’ या उपक्रमासाठी दिल्ली दौऱ्याकरिता निवड झाली आहे. २५ ऑक्टोबरला झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणीच्या आधारे ही निवड करण्यात आली. गणेश मोरे सध्या करिअर कट्टाअंतर्गत धाराशिव जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना वाव देणे, त्यांच्यात राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करणे आणि विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा करिअर कट्टा उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमातून महाविद्यालयात करिअर संसदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविले जातात. या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते गणेशचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, उपप्राचार्य पद्माकर पिटले, करिअर कट्ट्याचे तालुका समन्वयक डॉ. समाधान पसरकल्ले, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अर्जुन कटके, डॉ. चंद्रसेन करे आणि करिअर संसदेतील विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी गणेशचे अभिनंदन केले. ..................... ‘दुष्काळात शेतकऱ्यांच्या हाताला काम द्या’ कळंब, ता. २८ (बातमीदार) : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतातील बांधबंदिस्ती, बंद पडलेल्या बोअरवेलचे पुनर्भरण आणि विहीर पुनर्भरणाच्या कामांचा रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये समावेश करावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी केली आहे. या मागणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या कामांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे रोजगार हमी योजनामंत्री भरतशेठ गोगावले यांनी आश्वासन दिले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पिंगळे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

‘ये प्रेम मोल लिया’ गाण्यावर माधुरी दीक्षितचा भन्नाट डान्स, सोबतीला होती ही मराठी अभिनेत्री, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : दिवाळीनंतर इंडिया आघाडीची सभा घ्या; दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र

Diwali Bonus Laws: कायमस्वरूपीच नव्हे, प्रोबेशनवरील कर्मचाऱ्यांनाही मिळू शकतो बोनस! जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT