ABD26J82021
((((फोटो ओळ))) नर्सी (जिल्हा हिंगोली) ः संत चोखामेळा साहित्य संमेलनानिमित्त शनिवारी काढलेल्या ग्रंथदिंडीत सहभागी बालवारकरी.
--------------
समाजातील विकृती रोखण्याचे सामर्थ्य संत विचारांत
-----
इंद्रजित देशमुख : नर्सीत तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
------
सकाळ वृत्तसेवा
नर्सी (जि. हिंगोली), ता. २४ : ‘‘आज माणूस माणसापासून दूर जात आहे. वाढती सामाजिक विकृती दूर करून माणसांमधील नाती जोडण्याची ताकद केवळ संतांच्या विचारांत आहे. त्यामुळे सुंदर आणि समृद्ध समाजासाठी संत साहित्याचा जागर करणे आवश्यक आहे’’, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा संत साहित्याचे अभ्यासक इंद्रजित देशमुख यांनी केले.
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मगावी नर्सी येथे शनिवारी (ता. २४) सकाळी १० वाजता तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आळंदी येथील संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे येथील वृंदावन फाउंडेशन आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान यांच्या वतीने हे दोनदिवसीय संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. विठ्ठल जायभाये आहेत. पंढरपूर येथील विश्व पुण्यधाम पीठाचे महंत भारत महाराज जाधव, संत नामदेव महाराज संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, सचिव द्वारकादास सारडा, विश्वस्त मनोज आखरे, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त तेजराव पाचरणे, फुलचंद नागटिळक, संचालक डॉ. रमेश शिंदे, प्रा.डॉ. मुरलीधर जायभाये, सतीश विडोळकर, डॉ. गोविंद भालेराव, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘‘सत्तेमुळे माणसे सुखी होत नाहीत. सत्ता नश्वर असून, सत्ताधारी माजी होतात; मात्र संत कधीच माजी होत नाहीत, म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतरही संतांच्या पालख्या निघतात. इतरांचे जगणे समृद्ध करताना स्वतःचे जीवन कसे समृद्ध होते, ही शिकवण संत साहित्याने दिली. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत पोचवली आणि इतर संतांनाही लेखनासाठी प्रेरित केले.’’ डॉ. शंकर पजई यांनी प्रास्ताविक केले. गणेश येवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर इंगोले यांनी आभार मानले.
--
वंचितांना आधार देण्यासाठी पुढे यावे
‘‘जन्मावरून माणसाची किंमत ठरवण्याची मानसिकता बदलणे गरज आहे. शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या संधींपासून वंचित असलेल्यांना आधार देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. प्रत्येकाला सन्मानाने जगता येणे आणि सार्वजनिक जीवनात समान वागणूक मिळणे हीच समतेची खरी रूपे आहेत. या साहित्य संमेलनातून परिसरातील विषमता ओळखून ती दूर करण्याची दिशा मिळावी’’, अशी अपेक्षाही देशमुख यांनी व्यक्त केली.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.