अनुसूचित जाती-जमाती ऐक्य परिषद
बीड ः भारतीय बौद्ध महासभेतर्फे २३ नोव्हेंबरला सकाळी ११.३० वाजता डॉ. आंबेडकर भवनात ऐक्य परिषद, धर्मांतर व शिबिर समारोप होईल. महालिंग निकाळजे अध्यक्षस्थानी, तर डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, एम.एस. वानखडे, बापू गहेच निकाळजे, डी.एस. नरसिंगे मार्गदर्शक राहतील. व्यासपीठावर एम.के. भंडारे, अशोक केदारे, व्ही.एच. गायकवाड, अमरसिंग ढाका, भदंत सुमेध बोधी, परशुराम इंगोले, भिकाजी कांबळे, बापूसाहेब गायकवाड, यु.जी. बोराडे, शरलाई चिकटे, स्वप्निल महासंगिकार, श्रीरंग पवार, सतीश कापले, एम.एम. जोगदंड, उमाजी ननवरे, आर. प्रभाकर चांदणे, एस.एस. उजगरे बापू, टी.जी. कांब, अबुवा शिंदे, मारोती सुरवसे, काशीनाथ वाघमारे असतील.
------
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन
बीड ः ऊस, कापूस, सोयाबीन उत्पादक तसेच पशुधन जगविणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाका, गेवराई येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी गावागावांत जनजागृती करण्यात आली असून, बीड, धारूर, गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील १०० गावांतून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी केले आहे. या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी यांच्यासह महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
-----
स्वरसंध्या संगीत रजनीत रसिकश्रोते मंत्रमुग्ध
गेवराई ः रोटरी क्लब ऑफ गेवराईतर्फे पाडव्यानिमित्त १२ नोव्हेंबरला आयोजित स्वरसंध्या संगीत रजनीने रसिकांची मने जिंकली. धकाधकीच्या जीवनात संगीत आनंद देते, असे मत नाट्य अभिनेत्री डॉ. उज्ज्वला वनवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास नितीन गोपन, सुभाष सुतार, सुशील टकले, सचिव मनोज थिगळे, प्रीत कुकडेजा, अध्यक्ष गणेश कुलकर्णी, सुदाम धुपे, सचिन पुणेकर उपस्थित होते. राजेंद्र डेंगे, राधाकिशन लड्डा, रामकृष्ण चेडे, निखिल काला, नागनाथ घसिंग, रामदास शिंदे, अशोक गलांडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक धर्मराज करपे, तर आभार डेंगे यांनी मानले. धनश्री कुलकर्णी यांच्या गणेशस्तवनानंतर विवेक काटे, आशा भारती, अस्मिता अहिरे, प्रणिती पंडित, शकुंतला खरात यांनी गीते, तुळशीराम आतकरे यांनी अभंग, तर प्रा. सुनील मुंढे यांनी पंकज उधास यांची गझल सादर केली.
------
बोअरवेल व विहिरींवरील निर्बंध हटवण्याची मागणी
बीड ः जिल्ह्यातील भूजलपातळी खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २ नोव्हेंबर २०२६ पासून नवीन बोअरवेल व विहिरी खोदण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि पाणीटंचाईने त्रस्त सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून निर्बंध उठवण्याची मागणी केली आहे. भूजल संरक्षण आवश्यक असले तरी शेतकऱ्यांना पिके, फळबागा आणि जनावरे वाचवण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे गावनिहाय भूजल परिस्थितीचा अभ्यास करून निर्बंध उठवावेत किंवा आवश्यक त्या ठिकाणी शिथिल करावेत, अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस यांनी केली आहे.
----
जिजाराम खुडे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
माजलगाव ः तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाखालगाव येथील शिक्षक जिजाराम ज्ञानबाराव खुडे यांना सीएफटीयूई संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असून, खुडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
------
रामचंद्र ठोसर यांची उपाध्यक्षपदी निवड
बीड ः सहकार खात्यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी १ या पदावर कार्यरत असलेले रामचंद्र ठोसर हे सहकार खाते कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष असून, ते राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस या पदावर देखील कार्यरत आहेत. बीड जिल्हा सहकार खाते कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या., बीड या संस्थेचे ते गेल्या दहा वर्षांपासून अविरोध अध्यक्ष आहेत. त्यांची महाराष्ट्र योग असोसिएशन, पुणेच्या राज्य उपाध्यक्ष पदावर निवड झाली आहे.
-------
वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवा सुरू
बीड ः श्रीक्षेत्र चंद्रभागा धाम, वाळवंट, पंढरपूर येथे कार्तिक वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्यसेवेचे आयोजन डॉ. केशवदास वैष्णव यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सेवेमध्ये वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक गोळ्या, औषधे, सलाईन व इतर वैद्यकीय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या सौजन्याने १४ नोव्हेंबर रोजी बीड येथून शिवसेनेचे त्रिसदस्यीय वारकरी आरोग्यसेवा पथक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले होते. १४ ते २१ दरम्यान येथे आरोग्यसेवा राबवली जात आहे. पथकाचे नेतृत्व डॉ. केशवदास वैष्णव करीत असून, त्यांना अजित कुलकर्णी व अंकुश वायसे हे सहकार्य करीत आहेत.
-------
चातुर्मास उत्सवाची सांगता उत्साहात
बीड ः बीड शहरातील स्वराज्य नगर येथे ज्ञानेश्वरी अभ्यासक भागवताचार्य माधव महाराज डाके काठवडेकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या चातुर्मास उत्सवाची सांगता सोमवार २१ नोव्हेंबर रोजी दादाहरी महाराज गीते यांच्या प्रवचनाने होणार आहे. या उत्सवांतर्गत दर सोमवारी रात्री ८ ते ९ या वेळेत बीड जिल्ह्यातील नामवंत ज्ञानेश्वरी अभ्यासक व कीर्तनकार महाराजांच्या रसाळ व प्रासादिक प्रवचनसेवेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनमालेतून भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळाली. आषाढी ते कार्तिकी एकादशीदरम्यान डाके महाराजांच्या घरी ज्ञानेश्वरी ग्रंथावर अनेक प्रवचने संपन्न झाली. सांगतेचे प्रवचन सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार असून, त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती डाके यांनी दिली. या पवित्र आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ बीड शहर व पंचक्रोशीतील साधकांनी, माउली भक्तांनी व वारकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजक माधव महाराज डाके यांनी केले आहे.
------
दुष्काळग्रस्त भूमिहीन मजुरांना मदत देण्याची मागणी
परळी ः दुष्काळग्रस्त भागातील भूमिहीन मजुरांना ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते मुक्ताराम गवळी यांनी केली. परळी उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले. महाराष्ट्रात पाऊस न झाल्याने तीव्र दुष्काळ पडला आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच सानुग्रह अनुदान दिले आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्या शेतमजूर तसेच इतर कष्टकरी मजुरांना काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील भूमिहीन मजुरांना ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. राज्य शासनाने या मागणीची दखल घेऊन मदत जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुक्ताराम गवळी यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.