हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावाची वात पेटेना!
---
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला की रोजगाराच्या शोधात मजुरांची कुटुंबे गाव सोडून परराज्यांत किंवा इतर जिल्ह्यांत स्थलांतरित होतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लहान मुलेही गावाबाहेर पडतात आणि शाळेची पाटी अर्धवट सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. या मुलांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे, यासाठी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत सुरू होणारी हंगामी वसतिगृहे मात्र यंदा जिल्ह्यात नोव्हेंबर उजाडूनही सुरू झालेली नाहीत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अद्याप वसतिगृहांचा श्रीगणेशा झालेला नाही. पाच वसतिगृहांसाठी ६५४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असली, तरी प्रस्तावाची फाइल नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या सुटीनंतरच वसतिगृहे सुरू होण्याचे चित्र आहे. ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा राज्यांत आणि इतर जिल्ह्यांत स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांतील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दरवर्षी हंगामी वसतिगृहांची व्यवस्था केली जाते. यंदा कन्नड तालुक्यात चार, तर पैठण तालुक्यात एक अशी पाच वसतिगृहे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आतापर्यंत ६५४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
---
सीईओंच्या मंजुरीनंतरच पुढील कार्यवाही
हंगामी वसतिगृहे ऑक्टोबरपासूनच सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, जिल्हा परिषदेच्या प्रस्तावालाच अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर शिक्षण विभागाकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वसतिगृहे सुरू होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
---
(((कोट)))
हंगामी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था केली जाते. दुपारचे शालेय पोषण आहारातील जेवण शाळेत, तर सकाळचा नाश्ता आणि सायंकाळचे भोजन वसतिगृहात दिले जाते. दिवसा संबंधित कर्मचाऱ्यांकडून मुलांची देखभाल केली जाते, तर रात्री नातेवाइकांच्या मदतीने त्यांची काळजी घेतली जाते.
- गीता तांदळे, उपशिक्षणाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.