यंदाऊ दुष्काळ तीव्र; कृत्रिम पाऊस पाडा
-----------
चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने पर्याय तपासावा
चाकूर, ता. ६ (बातमीदार) : अपुरा आणि खंडित पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नदी-नाले, तलाव व जलसाठ्यांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून भूजल पातळीतही घट झाली आहे. खरीप पिकांना पावसाच्या दीर्घ खंडाचा मोठा फटका बसला असून उत्पादनात घट होत आहे, काही दिवसात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होईल त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईचा विचार करून, वातावरणीय परिस्थिती अनुकूल असल्यास कृत्रिम पर्जन्यनिर्मितीचा पर्याय शासनाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या असून त्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे, पीककर्जाबाबत सवलती, महसूल सवलती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यकतेनुसार टँकर आणि चारा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरीच्या सुमारे ४५ टक्केच पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह अन्य पिकांवर परिणाम झाला आहे. पावसाचा खंड वाढल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, पावसाअभावी जलसाठे आटत असल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या पाण्याची समस्या आगामी काळात अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक गावांमध्ये भूजल पातळीही खोलवर गेली आहे. तालुक्यातील काही गावे आधीपासूनच कमी भूजल उपलब्धता असलेल्या क्षेत्रात येतात. त्यामुळे यंदाच्या पावसाच्या कमतरतेचा परिणाम केवळ खरीप हंगामापुरता मर्यादित न राहता आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईवरही होण्याची शक्यता आहे. कृत्रिम पर्जन्यनिर्मिती अर्थात ‘क्लाऊड सीडिंग’ हा पावसाचा हमखास पर्याय नसला तरी सध्या वातावरणात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. दुष्काळी मदत मिळणे आवश्यक आहेच; मात्र वातावरण अनुकूल असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या शक्यतेचाही शासनाने विचार करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
----
पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची चिंता आहे. दुष्काळी मदत मिळणे आवश्यक आहेच; मात्र वातावरण अनुकूल असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या शक्यतेचाही शासनाने विचार करावा.
- गणपत नुनुंचे, शेतकरी, अलगरवाडी
---
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी योग्य ढग, पुरेशी आर्द्रता आणि अनुकूल वातावरणीय परिस्थिती आवश्यक असते. हा प्रयोग खर्चिक असून त्यातून पाऊस पडण्याची शाश्वती नसते. त्यामुळे कृत्रिम पावसावर अवलंबून राहण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणे अधिक गरजेचे आहे. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने कृत्रिम पर्जन्यनिर्मितीच्या शक्यतेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करावा.-प्रा. जे. एम. वाघमारे, भूगोल विभागप्रमुख,
भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर
-----