अत्याचार प्रकरणाचा तपास आता ‘एसआयटी’कडे
-----
अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण; महिला आयपीएस अधिकारी करणार तपास
---
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ११ : एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकाच्या प्रमुखपदी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी मेघना आय.एन. (उपविभाग लातूर ग्रामीण) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८७/२०२६ अन्वये कलम ७४, ७६, ३५१(२) तसेच पोक्सो अधिनियमातील कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आदर्श इंटरनॅशनल स्कूलचा संस्थापक बशीर उस्मान शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वैभव नेटके करीत होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन विशेष तपास पथक स्थापन करून पुढील तपास या पथकाकडे सोपविण्यात आला. या विशेष पथकात प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी मेघना आय.एन. या असून, त्यांच्या मदतीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक भागीरथी पवार व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक सुचिता शिंगाडे यांचा समावेश आहे. विशेष पथकाकडे तपास सोपविल्यानंतर तांबे यांनी तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीव्यतिरिक्त अन्य कोणी पीडित आहे का, या गुन्ह्याशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचा बारकाईने तपास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या गुन्ह्यात नमूद पीडितेव्यतिरिक्त अन्य कोणी पीडित असेल किंवा या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती असेल, तर संबंधितांनी कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊन पोलिसांना माहिती द्यावी. पीडितांनी विशेष तपास पथकाच्या प्रमुख किंवा पोलिस उपअधीक्षक भागीरथी पवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.