मानवतला मंगळवारपासून
शारदोत्सव व्याख्यानमाला
मानवत ता.२४ (बातमीदार)ः शिक्षक पालक संघ मानवत यांच्यातर्फे आयोजित ५८ वी शारदोत्सव व्याख्यानमाला मंगळवार (ता. २७ ते गुरुवार ता. २९) ऑक्टोबरदरम्यान होत आहे. शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्ते, सामाजिक, कृषी, समकालीन विषयांवर विचार मांडणार आहेत. देवी मंदिर सभागृहात रोज रात्री आठ वाजता व्याख्यानांना सुरवात होणार आहे.
मंगळवारी (ता. २७) व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. रामेश्वर नाईक ‘बदलती पिढी, बदलता देश’ या विषयावर गुंफणार आहेत. बुधवारी (ता.२८) ज्ञानप्रबोधिनी, अंबाजोगाई केंद्राचे प्रमुख प्रसाद चिक्षे हे ‘दुष्काळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवारी (ता. २९) तिसऱ्या दिवशी शेतकरी संघटनेचे गोविंद जोशी हे ‘शेती व शेतकरी’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. या दिवशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेच्या आयोजनासाठी डॉ. शरयू खेकाळे, शोभा कुलकर्णी, विलास मिटकरी, किशोर तुपसागर, ॲड. अनिरुद्ध पांडे, उदय जैन, डॉ. निरज दगडू, प्रा. रूपेश देशपांडे, सोनय्या कीर्तनकार, प्रा. गजानन अंबेकर, शशिकांत नेवरेकर, अमित कहेकर, विजय होडे, श्रीकांत माकुडे, अक्षय कत्रुवार, प्रा. शारदा कच्छवे, लता भरड, छाया मुंदडा आदी पुढाकार घेत आहेत.
--------------