((फोटो- सचिन माने सोडणार आहे))
------
‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमली शिवालये
------
तिसऱ्या सोमवारी पहाटेपासून मंदिरांमध्ये रांगा, मुगाची शिवामूठ अर्पण
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ ः श्रावणातील तिसऱ्या सोमवारी (ता. ३१) पहाटेच्या मंगलमय वातावरणाला घंटानादाची साथ मिळाली आणि शहरातील शिवालये ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने दुमदुमली होती. पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. फुलांची आकर्षक सजावट, धूप-दीपाचा सुगंध, मंत्रोच्चार आणि अभिषेकाच्या विधींमुळे शहरातील वातावरण अक्षरशः शिवमय झाले होते.
शहरातील खडकेश्वर महादेव मंदिर, दशमेशनगर येथील दशमेश्वर मंदिर, उल्कानगरीतील ओंकारेश्वर, कांचनवाडीतील पांचाळेश्वर, साताऱ्यातील कार्येश्वर, विद्यापीठ परिसरातील विश्वेश्वर महादेव मंदिर तसेच पळशी शिवारातील पारदेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे महापूजा, अभिषेक आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. अनेकांनी बेलपत्र, फुले, दूध आणि पाणी अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतले. कुटुंबाचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि समाधानासाठी भाविकांनी प्रार्थना केली.
--
शिवामूठीतून अन्नाबद्दल कृतज्ञता
श्रावणी सोमवारी शिवलिंगावर विविध धान्यांची ‘शिवामूठ’ अर्पण करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण केली जाते. यंदा तिसरा श्रावण सोमवार ३१ ऑगस्टला असल्याने मंदिरांमध्ये मुगाची शिवामूठ वाहण्यात आली. मूग हे सात्त्विक व पौष्टिक कडधान्य मानले जाते. त्यामुळे मुगाची मूठ महादेवाला अर्पण करताना कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच सुख-समृद्धीची प्रार्थना करण्याची भावना भक्तांमध्ये दिसून आली. शिवामूठ हा केवळ धार्मिक विधी नसून अन्नधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि निसर्गाशी नाते जपण्याची परंपरा असल्याचे धार्मिक अभ्यासक सांगतात.
---
महाप्रसाद, अन्नदानासह सामाजिक उपक्रम
दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विविध मंदिर समित्या व सामाजिक मंडळांच्या वतीने महाप्रसाद, अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी, सरबत आदींचीही व्यवस्था करण्यात आली होती. काही सामाजिक संस्थांनी आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिरे घेत श्रावण सोमवारला सामाजिक सेवेची जोड दिली. दिवसभर भाविकांची वर्दळ सुरू राहिल्याने प्रमुख शिवालयांच्या परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळच्या आरतीवेळी पुन्हा एकदा ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. रात्री उशिरापर्यंत शिवालयांत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.