माहूरच्या रेणुकादेवी संस्थानचे संकेतस्थळ आजपासून भाविकांच्या सेवेत
---
लाइव्ह दर्शनासह धार्मिक कार्यक्रमांचे व्हिडिओ अपडेट्स; वाहतूक, पार्किंग व आरोग्य सुविधांची माहिती मिळणार
---
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. १० : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रेणुकादेवी संस्थान, माहूरचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात ११ ऑक्टोबर २०२६ पासून हे संकेतस्थळ भाविकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. नवरात्रोत्सवासाठी माहूरगडावर येणाऱ्या भाविकांना आवश्यक माहिती व विविध सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, हा यामागील उद्देश आहे.
अद्ययावत संकेतस्थळावर श्री रेणुकादेवीच्या गाभाऱ्यातील लाइव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच महाआरती, छबिना, कुमारिका पूजन यांसह विविध धार्मिक विधींचे दैनंदिन व्हिडिओ अपडेट्स पाहता येतील. नऊ दिवसांच्या नऊ आरत्या, नऊ अष्टके तसेच नृत्य व संगीत कार्यक्रमांचे व्हिडिओ प्रक्षेपणही उपलब्ध होणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचे वेळापत्रक, माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगची माहिती, लाइव्ह मॅपद्वारे दिशादर्शन, आरोग्य सुविधांची माहिती व गुगल लोकेशन तसेच आपत्कालीन सेवांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध आस्थापनांची माहितीही लाइव्ह मॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. नवरात्रोत्सवात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक माहूरगडावर दर्शनासाठी येतात. त्यांना घरबसल्या दर्शन घेता यावे आणि वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्कालीन सेवांची माहिती सहज मिळावी, यासाठी संकेतस्थळ अधिक उपयुक्त स्वरूपात अद्ययावत करण्यात आले आहे, अशी माहिती श्री रेणुकादेवी संस्थान, माहूरच्या विश्वस्त समितीच्या वतीने देण्यात आली.
---
डिजिटल माध्यमातून भाविकांना सुविधा
संकेतस्थळाची निर्मिती व अद्ययावतीकरण महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सेटट्राइब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीमार्फत सेवाभावी तत्त्वावर करण्यात येत आहे. ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून संस्थानच्या भाविकांना डिजिटल स्वरूपात माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. भाविकांनी अधिक माहितीसाठी shrirenukadevi.in या संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.