शेवाळा ः सोयाबीनच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
-------
पावसाअभावी खरीप धोक्यात
शेवाळा, ता. ३१ (बातमीदार) ः शेवाळा, देवांना, कवडी, कान्हेगाव पिंपरी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस लावगवड केली परंतु यंदा पावसाळ्याचे तीन महिने संपत आले तरी दमदार पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत.
या आठवड्यात पोळा असून परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने पिके कोमेजली आहेत. शिवाय यंदा मागील वर्षीपेक्षा ५६ टक्केच पावसाची नोंद झाली. शेवाळा गावालगत कयाधु नदी असून यंदा नदी आतापर्यंतच दोन वेळेस नदी दुथडी भरून वाहिली. शिवाय गावालगत इसापूर धरणाचा उजवा कालवा असूनही कालव्यास पाणी नसल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, हळद, ऊस सुकून जात आहे.
------------
शेवाळा ः शेवाळा गावालगत देवजना शिवारात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला.
--------
शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली
-------
देवजना शिवारात शेकडो शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
------------------
शेवाळा, ता. ३१ (बातमीदार)ः शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी भूमू अभिलेख अधिकारी, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांना शेवाळा, देवजना शेत शिवारात येण्यापूर्वीच सोमवारी (ता.३१) शेवाळा शिवारात एकत्र आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शेवाळा ते हदगाव रस्त्यावर बसून विरोध केला.
शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे दोन दिवसांपूर्वी तलाठ्याने परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गत जाणार त्यांची मोजणी करण्यात येणार असल्याच्या १०० शेतकऱ्यांना नोटिसी आणल्या होत्या. सोमवारी (ता.३१) शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी येणार असल्याचे कळविले मात्र शेतकऱ्यांनी नोटिसा परत केल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले, की आमची शेती म्हणजे काळजाचा तुकडा आहे. याची आम्ही मोजणी होऊ देणार नाही असे म्हणत विरोध केला. शेवाळा गावालगत कयाधू नदी असून नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने शेकडो हेक्टर जमीन व पिके पुराच्या पाण्याने वाहून जातात. शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली आल्याने पिकांचे नुकसान होते व आता उर्वरित राहिलेली शेकडो शेतकऱ्यांची दोनशे हेक्टर जमीन ही सुपीक आहे. या शेतात पूर येत नाही हिच दोनशे हेक्टर जमीन शक्तिपीठ महामार्गसाठी जाणार आहे. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला.
यावेळी शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
शेतकऱ्यांचा विरोध पाहता महसुल अधिकारी, कृषी अधिकारी सचिन वाघमारे, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे यांनी पंचनामा करून उपस्थित शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गसाठी मोजणीला विरोध होत आहे असा पंचनामा करून शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. यावेळी सामाजिक कार्येकर्ते अजय सावंत, श्याम सावंत, विठ्ठल सावंत, दतराव सावंत, संदीप पाटील, बालू पाटील, बालाजी सूर्यवंशी, शेख नयुम, शेख जुबेर, दादाराव सावंत, शरद सावंत, नयुम नाईक, चंद्रकांत सूर्यवंशी, दयानंद शेतकरी, धोंडबा सावंत, सुजित सावंत, संदीप पाटील, सुनील सावंत, किरण सूर्यवंशी, सीताराम पाटील, मोईन बागवान, हनिफ बागवान, खालेद शेख, विजय बोंढारे, शंकर सावंत, स्वप्निल सूर्यवंशी, सचिन सावंत, प्रल्हाद सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक बालाजी गोणार, पोलिस कर्मचारी मस्के, जमादार गजानन राठोड, पोलिस पाटील स्वप्निल गांजरे, कोतवाल अंकुश पोलेंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
((चौकट)))
कसा करणार कुटुंबाचा उदरनिर्वाह?
देवजना शिवारात शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत रोखले. शेवाळा, देवजना, कवडी, कान्हेगाव पिंपरी, दाती, कांडली, बोथी बहुर, आडा शिवारातील दोनशे हेक्टर सुपीक जमीन महामार्गात जाणार असल्याने आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला.
--------------------------------------
कनेरगाव नाका : तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गजानन किसन गावंडे यांची फेरनिवड करण्यात आली.
गजानन गावंडे यांची फेरनिवड
कनेरगाव नाका ः कनेरगाव-मोप गट ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी गजानन गावंडे यांची फेर निवड करण्यात आली. सांस्कृतिक सभागृहात सोमवारी (ता.२४) रोजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच नीलेश दहात्रे, सचिवपदी मुख्याध्यापक गणेश सिसोदे हे होते. यावेळी अध्यक्षपदासाठी पाच अर्ज दाखल झाले. दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राहिलेल्या तीन अर्जांमधून अध्यक्षपदी गजानन गावंडे यांची फेरनिवड करण्यात आली. तर कनेरगावसाठी उपाध्यक्ष म्हणून विजय पठाडे तर मोपसाठी उपाध्यक्ष म्हणून विजय बर्वे यांची निवड झाली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------
गतिरोधक बसवण्याची मागणी
गिरगाव ः गावात येणाऱ्या सर्व रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गिरगाव-मालेगाव, गिरगाव-पार्डी, गिरगाव-वसमत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून वाहनचालक सुसाट असल्याने अपघात रोखण्यासाठी या सर्व रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची गरज आहे. गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नांदेड-हिंगोली मधला मार्ग असल्याने वाहनांची संख्या वाढली. या रस्त्यावर दोन शाळा असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने गतिरोधक बसण्याची मागणी दीपक नादरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
----------------------
शालेय समिती अध्यक्षपदी सुनील केंद्रे
कनेरगाव नाका ः जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गुरुवारी (ता.२८) रोजी पालक सभेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सुनील केंद्रे, तर उपाध्यक्षपदी वर्षाबाई विसावे यांची निवड झाली. समितीतील इतर सदस्य भारत महाले (दिव्यांग विद्यार्थी पालक), दीक्षा कांबळे, लक्ष्मीबाई हंबर्डे, रमेश इंगोले, निर्मला गावंडे, कैलास मुदळकर, शिवशंकर गावंडे, वर्षा गोडघासे, ललिता बर्वे, नितीन पवार, सपना सहातोंडे यांचा समावेश आहे. यावेळी मुख्याध्यापक गणेश सिसोदिया यांच्यासह शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.