दर दुप्पट; पण हाती सोयाबीनच नाही
- बाजार समितीत ९० टक्क्यांनी घटली आवक
- दररोज केवळ २०० ते ३०० क्विंटलची आवक
धाराशिव, ता. ३० (बातमीदार) : यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचा परिणाम धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवकेवर झाला असून, गतवर्षीच्या दिवाळीपूर्वीच्या तुलनेत यंदा सोयाबीनची आवक जवळपास ९० टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत होती. यंदा मात्र केवळ २०० ते ३०० क्विंटल सोयाबीन बाजारात येत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे. यंदा पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दीर्घ ओढ दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली, शेंगा पूर्ण भरल्या नाहीत आणि अनेक ठिकाणी उभे पीक जागेवरच सुकले. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली. अनेक शेतकऱ्यांना पेरणीचा खर्चही वसूल करता आला नाही.
.......................
((चौकट))
शेतकऱ्यांसमोर कोंडी
उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली असली, तरी सोयाबीनचे दर गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. सध्या बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार ९०० ते सात हजार १०० रुपये दर मिळत आहे. मात्र, उत्पादनच कमी झाल्याने वाढलेल्या दराचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसा माल उपलब्ध नाही. मुबलक उत्पादनाच्या काळात दर कमी आणि आता दर वाढले असताना विक्रीसाठी माल नाही, अशी कोंडी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.
..................
((कोट))
गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी बाजार समितीत दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत होती. यंदा मात्र दररोज २०० ते ३०० क्विंटल इतकीच आवक आहे.
- पवन माकोडे, सचिव, बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.