भीमाशंकरमधील वृक्षतोड थांबवा
---
पंजाबराव काळे ः तीव्र आंदोलनाचा इशारा
----
सकाळ वृत्तसेवा
नांदेड, ता. २९ : भीमाशंकर परिसरातील विकासकामांच्या नावाखाली शेकडो वर्षांपासूनची वनसंपदा आणि हिरवाई नष्ट केली जात असल्याचा आरोप करत, वृक्षतोड तातडीने थांबविण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले असून, वृक्षतोड न थांबल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काळे यांनी दिला आहे. भीमाशंकर परिसर धार्मिक, पर्यटन आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. अशा संवेदनशील भागातील जुनी वृक्षसंपदा केवळ विकासकामांसाठी नष्ट करणे योग्य नसल्याचे काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
---
विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास नको
संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाचा संदर्भ देत पंजाबराव काळे यांनी निसर्गाशी असलेल्या सांस्कृतिक नात्याची आठवण करून दिली. संतांनी वृक्ष आणि वनराईला आपले सोयरे मानले; मात्र आज विकासाच्या नावाखाली त्याच निसर्गाचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘महाराष्ट्राला विकास नक्कीच हवा; पण महाराष्ट्र भकास करून नव्हे. रस्ते, उद्योग, पर्यटन आणि आधुनिक सुविधा आवश्यक आहेत; मात्र त्यासाठी शेकडो वर्षांची वनसंपदा बळी देणे हा विकास होऊ शकत नाही,’ अशी भूमिका काळे यांनी मांडली.
---
वृक्षलागवडीच्या दाव्यांची माहिती जाहीर करा
सरकारकडून कोट्यवधी वृक्षलागवडीचे दावे केले जातात. मात्र, प्रत्यक्षात किती झाडे जगली आणि त्यांचे किती संवर्धन झाले, याची माहिती जनतेसमोर जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही काळे यांनी केली आहे. भीमाशंकरमधील विकासकामांसाठी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, वृक्षतोडीला तातडीने स्थगिती द्यावी आणि वनसंपदेच्या नुकसानीबाबत तज्ज्ञांच्या मदतीने पुनर्विचार करावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. ‘निसर्गाशी खेळू नका, महाराष्ट्राची हिरवाई वाचवा. निसर्ग जगला, तरच महाराष्ट्र जगेल’, असा इशाराही पंजाबराव काळे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.