struggle story of Rahul who took last chance in life to became a teacher Sakal
छत्रपती संभाजीनगर

Success Story : मध्यरात्री कळाले, मी शिक्षक झालो! आयुष्यातील शेवटच्या संधीचं सोनं करणाऱ्या राहुलची संघर्षगाथा

अडथळ्यांची शर्यत पार करून शिक्षक भरती झाली. निकालाची वाट पाहून थकल्यानंतर अखेर एक दिवस निवड यादी प्रसिद्ध झाली.

संदीप लांडगे

अडथळ्यांची शर्यत पार करून शिक्षक भरती झाली. निकालाची वाट पाहून थकल्यानंतर अखेर एक दिवस निवड यादी प्रसिद्ध झाली. त्यातही सर्व्हर डाऊन असल्यामुळे ओटीपी येत नव्हता. मध्यरात्री एकला मोबाईलवर लॉगिन केले, ओटीपी आला अन् संभाजीनगरसाठी निवड झाली होती!

ही आनंदाची बातमी सांगायला मध्यरात्री एकला अर्धांगिनीला झोपेतून उठवले. नोकरीचे स्वप्न सत्यात उतरल्याने त्या आनंदात आम्हा दोघांनाही रात्रभर झोपच आली नाही. सकाळी सर्वांना सांगितल्यावर घरात आनंदोत्सव साजरा झाला.

घरच्यांनी यशाचा पेढा मला भरविल्यानंतर त्याचा गोडवा कैकपटीने वाढला होता. संघर्षानंतर जो विजय मिळतो, त्याची मजा काही औरच असते. ती मी आज अनुभवली.’’ शिक्षक पदस्थापनेसाठी वैजापूर येथून आलेल्या राहुल अविनाश कळंकेची ही कहाणी म्हणजे संघर्षगाथाच.

हुलने सांगितले, की २००९ मध्ये इंटरनेटसह समाजमाध्यमांचा वापर जास्त होत नव्हता. त्यावेळी बारावीचा निकाल आल्यानंतर दोन वर्षांत नोकरी मिळेल म्हणून लगेचच दोन लाख रुपये भरून डी.एड.ला ॲडमिशन घेतले.

मात्र, डी.एड.ची दोन वर्षे संपली अन् शासनाने पटपडताळणीचा निर्णय घेतला. त्यामध्ये बरीच मुले बोगस आढळली. परिणामी, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यानंतर शिक्षक भरती रखडली ती आजपर्यंत! तब्बल १५ वर्षांनंतर शिक्षक भरतीसाठी निवड झाल्याचा आनंद राहुलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

पगार कमी, खर्च जास्त

२०१० नंतर शिक्षक भरती होणार नाही, हे लक्षात आले होते. अशा परिस्थितीत घरची जबाबदारीदेखील उचलण्याची वेळ माझ्यावरच होती. त्यामुळे एका छोट्या इंग्रजी शाळेमध्ये दोन हजार रुपये पगारावर काम करायला सुरवात केली.

मात्र, पगार कमी, खर्च जास्त अशी परिस्थिती होती. त्यानंतर जवळपास बारा वर्षे वेगवेगळ्या सीबीएसई शाळांत ८ ते १० हजारांवर नोकरी केली. दरम्यान, स्पर्धा परीक्षा, बॅंकिंगची परीक्षा देत राहिलो. त्यात यश मिळत नव्हते, पगार वाढत नव्हता, वाढत होते फक्त वय. त्यामुळे २०१९ मध्ये घरच्या मंडळींनी लगीनघाई उरकून टाकली.

त्यानंतर लगेच कोरोनाचे थैमान सुरू झाले. इंग्रजी शाळा बंद पडू लागल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. माझी मात्र थोडक्यात तरली. पण, पगार थकविण्यात आले. त्यानंतर कुठून तरी शिक्षक भरतीच्या बातम्या यायच्या. त्यामुळे मन प्रसन्न व्हायचे, मात्र भरती होत नव्हती. दरम्यानच्या काळात बी.एड., सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली.

२०२३ मध्ये अचानक नोटिफिकेशन आले की, शिक्षक भरतीची परीक्षा होणार आहे. हा संघर्ष इथे संपला नव्हता. अडथळे नसेल तर ती शिक्षक भरती कसली? त्यानंतरही बऱ्याच प्रशासकीय बाबी आडव्या आल्या.

बिंदूनामावली योग्य नव्हती, जागांचे रोस्टर अपडेट नव्हते. या प्रक्रियेत वर्ष गेले. एवढ्या अडथळ्यांनंतर निवड झाली अन् आयुष्याला यशाची झालर मिळाली.

माझं वय ३२ असल्याने ही शेवटची संधी होती. सर्वस्व पणाला लावून दिवस-रात्र अभ्यास केला. परीक्षा झाली, निकालाचा दिवस उजाडला. निकालात नाव सर्च होत नव्हते. त्यात कोणीतरी सांगितले १०५ मार्क्स आहेत. त्यामुळे मन तुटले, पुढे काय? असे प्रश्न मनात घोळत असतानाच घरच्यांनी फोन करून सांगितले, ‘तुला १३६ मार्क्स पडलेत.’ तोच आनंदाचा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता.

— राहुल कळंके, नवनियुक्त शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT