विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीसंदर्भात आज मंथन
विद्यापीठात विविध घटकांचे मत जाणून घेणार समिती सदस्य
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ : राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांसंदर्भात विविध घटकांचे मत जाणून घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समितीचे सदस्य हे शुक्रवारी (ता.१६) या कामासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या तरतुदीनुसार विद्यापीठे, महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना आणि निवडणुका घेण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने शासनाने दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी एकरूप परिनियम प्रसिद्ध केले आहेत. या परिनियमांच्या अंमलबजावणीतील आव्हाने, विविध घटकांशी सल्लामसलत करणे, विद्यार्थी परिषद निवडणुका पूर्णतः शैक्षणिक, निकोप व विद्यार्थीकेंद्रित वातावरणात पार पाडण्यासाठी आणि पुढील दिशा निश्चित करण्यासाठी शासनाद्वारे २४ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीत १२ सदस्यांचा समावेश आहे. माजी कुलसचिव तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत अमृतकर यांचा या समितीत समावेश आहे. या समितीतील सदस्य शुक्रवारी (ता.१६) सायंकाळी पाचला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहेत. या सदस्यांद्वारे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, विभागप्रमुख पदवीधर अधिसभा व पदवीधर व्यवस्थापन परिषद सदस्य आदी घटकांशी चर्चा करून एकरूप परिनियमानुसार विद्यार्थी परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर केला जाणार आहे. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राचार्य, विभागप्रमुख, पदवीधर अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य आदींनी महात्मा फुले सभागृहात शुक्रवारी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. संजय कवडे व संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केले आहे. समितीचे सदस्य राज्यातील सर्व विद्यापीठांना भेटी देऊन आपला विस्तृत, असा अहवाल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.