MKN26A00877
माकणी : कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून स्वतः तयार केलेल्या आकर्षक आकाशकंदिलांसह भारत विद्यालयातील विद्यार्थी.
भारत विद्यालयात विद्यार्थ्यांनी
साकारले आकर्षक आकाशकंदील
माकणी, ता. ३१ (बातमीदार) : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून स्वतः तयार केलेल्या आकर्षक आणि रंगबिरंगी आकाशकंदिलांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ३०) प्रशालेचे प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या आठवडाभरापासून विद्यार्थी आकाशकंदील तयार करण्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यानुभव व कला विषयाच्या शिक्षिका शुभांगी शिंदे आणि शिक्षक नसीरपाशा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकाशकंदील तयार केले. कमीत कमी खर्चात उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृती साकारल्या. रंगसंगती, आकर्षक रचना आणि स्वतःच्या कल्पनांचा वापर करून तयार केलेल्या आकाशकंदिलांनी प्रदर्शनात विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या या कलाकृतींचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती, सर्जनशीलता आणि कलागुण विकसित व्हावेत, या उद्देशाने प्रशालेत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळते.
प्रदर्शनातील आकाशकंदिलांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक गणेश साठे, किशोर पवार, उमेश कडले, विजय पवार, रामराव पवार, प्रशांत डिग्गीकर, स्वप्निल मोरे, गोरे, दीपक शिंदे, प्रभाकर बनसोडे आणि राजेश्वर वाघमारे उपस्थित होते.
.......................................................
फोटो ओळ : OSM26B07304
धाराशिव : विभागस्तरीय शालेय क्रीडा किक बॉक्सिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचा सत्कार करताना मान्यवर.
विभागीय स्पर्धेत तृप्ती, अथर्वराज प्रथम
धाराशिव, ता. ३१ : शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे शुक्रवारी (ता. ३०) पार पडलेल्या विभागस्तरीय शालेय क्रीडा किक बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून दोन्ही खेळाडूंनी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या यशामुळे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विभागीय स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटातून तृप्ती गुंड हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटातून अथर्वराज माळी याने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. दोन्ही खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. विभागीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे तृप्ती गुंड आणि अथर्वराज माळी यांची राज्यस्तरीय शालेय क्रीडा किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी भर पडली आहे. विद्यार्थ्यांना अमितकुमार लोमटे आणि विवेक कापसे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, पर्यवेक्षक कैलास कोरके, पर्यवेक्षक मोहनराव शिंदे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
..........................
वेळेत काम झाले असते, तर विदारक चित्र दिसले नसते
आमदार तानाजी सावंत; कृष्णा-मराठवाडा पाणी योजनेवरून आक्रमक
भूम, ता. ३१ (बातमीदार) : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी कृष्णा-मराठवाडा पाणी योजनेच्या रखडलेल्या कामावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या योजनेचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर आज दुष्काळाचे विदारक चित्र दिसले नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
भूम तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना आमदार सावंत बोलत होते. मंत्रिपदाच्या कार्यकाळात या योजनेला गती देण्यासाठी सुमारे १५ हजार ५०० कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी कामाने वेग घेतला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीनंतर सत्तेच्या समीकरणात बदल झाल्याने कामाचे नियोजन आणि निधीचे पुनर्नियोजन अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर कृष्णा-भीमा स्थिरीकरण, उजनी धरणात पाणी आणणे तसेच जेऊर ते मिरगव्हाण या कामांसाठी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राधान्यक्रमात बदल केल्यानंतर जेऊर ते मिरगव्हाण कामाला प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर योजनेची प्रगती जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती, असा दावा आमदार सावंत यांनी केला.
................
((चौकट)
तर पाण्याअभावी आलेले
संकट टाळता आले असते
यंदा उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. हे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्याची व्यवस्था मागील वर्षीच पूर्ण झाली असती, तर भूम-परंडा-वाशी परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला नसता, असे ते म्हणाले. पाण्याअभावी शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेले संकट टाळता आले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
................
((चौकट)
शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
कृष्णा-मराठवाडा पाणी योजनेमुळे मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाला दीर्घकालीन दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाची सद्यःस्थिती, उर्वरित कामे आणि प्रत्यक्ष पाणी उपलब्ध होण्याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रखडलेल्या कामांना गती देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे आव्हान शासनासमोर आहे.
.............................
KLL26B10986
कळंब : पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळाच्या नियोजनासाठी आयोजित संवाद कार्यशाळेत सहभागी महिला.
दुष्काळावर मात करण्यासाठी गावपातळीवर नियोजन करा
महिला, शेतकरी आणि ग्रामस्तरीय नेतृत्वाने एकत्रित पुढाकार घेण्याचे आवाहन
कळंब, ता. ३१ (बातमीदार) : दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणारी पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि रोजगाराचे संकट यावर मात करण्यासाठी गावपातळीवर प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी महिला, शेतकरी आणि ग्रामस्तरीय नेतृत्वाने एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे मत कळंब येथे आयोजित तालुकास्तरीय संवाद कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.
स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने कळंब पंचायत समितीच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेतकरी महिला आणि व्हिलेज ॲक्शन ग्रुपच्या (व्हीएजी) महिला नेतृत्वाने सहभाग घेतला. दुष्काळाच्या काळात गावपातळीवर भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी हे विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती राजश्री वरपे, मनिषा सुकाळे, दिलशाद तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन क्षीरसागर, पत्रकार माधवसिंग राजपूत, भरती शुक्ला आणि आचल जगदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजश्री वरपे यांनी महिलांशी संवाद साधताना पाणीटंचाई, जनावरांचा चारा आणि रोजगाराच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा योग्य आणि गरजेपुरता वापर करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे आणि मागेल त्याला काम मिळण्यासाठी प्रभावी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिलशाद तांबोळी यांनी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या उपक्रमांची तसेच शेतकरी कंपनीच्या कार्याची माहिती दिली. व्हीएजी गटातील महिलांनी गावपातळीवरील अनुभव मांडत दुष्काळातील अडचणी आणि उपाययोजनांवर चर्चा केली.
.......................
MMR26A01930
मुरूम : बसव सहकार भवनमध्ये आयोजित काव्य मैफिलीचे उद्घाटन करताना मान्यवर.
ज्वलंत विषयांवरील कवितांनी जिंकली श्रोत्यांची मने
मुरूममध्ये रंगली काव्य मैफील; रसिक-साहित्यिकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुरूम, ता. ३१ (बातमीदार) : येथील बसव सहकार भवनमध्ये आयोजित ‘कोजागिरी काव्य मैफिली’त रसिकांनी कविता आणि गीतांचा बहारदार आनंद घेतला. श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक ग्रंथालय आणि रोटरी क्लब मुरूम सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २५) हा कार्यक्रम पार पडला.
अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा होते. मंचावर पतसंस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरनाळे, रोटरीचे अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सेवानिवृत्त प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले आणि रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी उपस्थित होते. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक आणि परिसरातील कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कविवर्य सहशिक्षक रुपचंद ख्याडे यांनी प्लास्टिक आणि सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे निसर्गाची होणारी हानी कवितेतून मांडली. शिवशरण वरनाळे यांनी सत्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने यांनी नद्या आटणे, तलाव सुकणे आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या वास्तवाचे चित्रण केले.
कलाप्पा पाटील यांनी पावसाची अनिश्चितता आणि धरणीच्या वेदना शब्दबद्ध केल्या. सुनील नरसिंग राठोड यांनी भूक, संघर्ष आणि सृष्टीचे चक्र यांवर आधारित कविता सादर केली. बाळासाहेब गिरीबा यांनी जिद्द आणि संघर्षाचा संदेश देणाऱ्या कवितेतून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. नितीन डागा, काशिनाथ निर्मळे, मल्लिकार्जुन बदोले, अशोक जाधव, अमृत वरनाळे आणि मनीष मुदकन्ना उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात शरणाप्पा मुदकण्णा यांनी अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन होत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन बालाजी भोसले यांनी केले. प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.