छत्रपती संभाजीनगर

कृतिशील, बहुआयामी आणि संयमी नेतृत्व : सुरेशदादा सराफ

CD
कृतिशील, बहुआयामी आणि संयमी नेतृत्व : सुरेशदादा सराफ हिंगोली : प्रतिनिधी हिंगोली शहराच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून विविधांगी कार्याचा ठसा उमटविणारे नेतृत्व म्हणून सुरेश वैजनाथअप्पा सराफ अर्थात, सुरेशदादा सराफ यांची ओळख निर्माण झाली आहे. व्यवसायाने सुवर्णकार असले तरी समाजातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत जनसेवेचा वसा जपणारे, संयमी स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. सुरेशदादा सराफ यांचा जन्म ८ सप्टेंबर १९६९ रोजी हिंगोली येथे सराफ कुटुंबात झाला. विज्ञान शाखेचे पदवीधर असलेल्या सुरेशदादांनी वडिलोपार्जित सराफा व्यवसायासोबतच सामाजिक कार्यातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सराफ कुटुंबाचा सुवर्ण व्यवसायाचा वारसा शंभर वर्षांहून अधिक काळाचा आहे. पणजोबा ईरनाप्पा सराफ, आजोबा नागनाथअप्पा सराफ आणि वडील वैजनाथअप्पा सराफ यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता, जनसंपर्क आणि समाजाशी असलेली नाळ सुरेशदादांनी पुढे नेली. सराफ कुटुंबाचा हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ५०० ते ५५० गावांशी दीर्घकाळापासून संपर्क राहिला आहे. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन सर्व समाजघटकांशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्याची परंपरा या कुटुंबाने जपली. याच सामाजिक संस्कारातून सुरेशदादांच्या कार्याची पायाभरणी झाली. नगरसेवेचा वारसा, समाजसेवेचा वसा सुरेशदादांचे आजोबा नागनाथअप्पा सराफ यांनी हिंगोली नगरपालिकेचे सुमारे २५ वर्षे नगराध्यक्षपद भूषविले. त्यानंतर त्यांचे वडील वैजनाथअप्पा सराफ यांनी सुमारे १५ वर्षे नगराध्यक्ष म्हणून शहराच्या विकासात योगदान दिले. त्यांचे बंधू सुधीरअप्पा सराफ यांनीही थेट जनतेतून निवडून येत नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. वैजनाथअप्पा सराफ यांनी १९७२ मध्ये कयाधू एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून खाकीबाबा मेमोरियल इंग्लिश हायस्कूलची मुहूर्तमेढ रोवली. हिंगोली शहर हिरवेगार व्हावे यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ उभी केली. तसेच व्यापारी, उद्योजक, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि बेरोजगार युवकांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन १९९८ मध्ये मराठवाडा नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. वडिलांचे सन २००० मध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर कुटुंबाची तसेच विविध सामाजिक व संस्थात्मक जबाबदारी सुरेशदादांच्या खांद्यावर आली. या कठीण परिस्थितीत न डगमगता त्यांनी सर्वांना सोबत घेत कामाची धुरा पुढे नेली. याच काळात त्यांच्या नेतृत्वाला विविध क्षेत्रांची व्यापक दिशा मिळाली. शिक्षणाला प्राधान्य खाकीबाबा मेमोरियल इंग्लिश हायस्कूलचे अध्यक्ष म्हणून सुरेशदादा शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांना कमीतकमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जावे, यासाठी ते शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेतात. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थी तसेच त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार, मूकबधिर विद्यार्थ्यांना पोषक आहार, शाळांमध्ये अभ्यासासाठी इन्व्हर्टर आणि शुद्ध पाण्यासाठी फिल्टर उपलब्ध करून देणे, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांतून त्यांनी शिक्षण क्षेत्राशी आपली बांधिलकी जपली आहे. क्रीडा क्षेत्रालाही बळ हिंगोली जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला संघटित व्यासपीठ देण्याचे काम त्यांनी केले. जिल्हाध्यक्ष म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन, गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा साहित्याचे वाटप, यावर त्यांनी भर दिला आहे. फुटबॉल संघटनेच्या माध्यमातूनही दर्जेदार खेळाडू घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आरोग्यसेवेतून माणुसकीचा हात वैजनाथअप्पा सराफ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातही विविध उपक्रम राबविण्यात येतात. रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. रोगनिदान शिबिरे, दिव्यांग व अंध व्यक्तींच्या तपासण्या, मोफत चष्मेवाटप, नेत्र शस्त्रक्रिया, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सहकार्य, दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वाटप, रक्तदान शिबिरे आणि मोफत औषधवाटप अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली जाते. धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय कार्य अन्नदान, जलदान, धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना सहकार्य, संस्थांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी मदत, सिमेंट खुर्च्यांचे वाटप, गुरुवर्यांचा सत्कार, अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ पारायण सोहळ्यांमध्ये सहभाग अशा माध्यमातून त्यांचा धार्मिक-सामाजिक सहभाग सातत्याने दिसून येतो. नर्सी नामदेव ते पंढरपूर पायी वारी तसेच नांदेड ते कपिलधार मन्मथस्वामी पायी वारीतही ते सहभागी होतात. शहरातील चौक, बसस्थानके, शाळा, महाविद्यालये, मंदिरे आणि स्मशानभूमी आदी ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी सिमेंट खुर्च्यांचे वाटप करण्याबरोबरच वृक्षारोपण व संवर्धनावरही त्यांनी भर दिला आहे. आर्थिक सक्षमतेसाठी प्रयत्न वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रातही त्यांनी कामाचा विस्तार केला. विविध शाखांच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजक, शेतकरी, छोटे व्यावसायिक, कारखानदार, महिला उद्योजक आणि सुशिक्षित बेरोजगारांना आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सुविधा, शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन मेळावे, स्वयंसेवी संस्थांसाठी मार्गदर्शन आणि योग शिबिरांचे आयोजन अशा उपक्रमांनाही त्यांनी चालना दिली. दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात ग्रामीण भागाची पाहणी करून शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. कोरोना काळात सुमारे ५०० ते ६०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून संकटाच्या काळात सामाजिक जबाबदारी निभावली. राजकीय क्षेत्रातही सक्रिय वाटचाल सामाजिक कार्यातून निर्माण झालेला व्यापक जनसंपर्क आणि सर्व समाजघटकांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे सुरेशदादांची राजकीय क्षेत्रातील वाटचालही लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधिल राहून जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत आक्रमकतेपेक्षा संयम, संवाद आणि समन्वयाला महत्त्व असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. कोणालाही न दुखावता प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विविध जबाबदाऱ्यांमधून कार्याचा विस्तार सुरेशदादा सराफ यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून नेतृत्वाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कयाधू एज्युकेशन सोसायटी संचलित खाकीबाबा मेमोरियल इंग्लिश हायस्कूलचे अध्यक्ष, वैजनाथअप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या विविध जबाबदाऱ्या, हिंगोली जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष, सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष, शिरेहकशाह बाबा दर्गा समितीचे अध्यक्ष, वैजनाथअप्पा सराफ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच हिंगोली-परभणी जिल्हा बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. व्यवसाय, समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, धर्म आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत राहूनही सर्वसामान्यांशी असलेला संवाद आणि आपलेपणा कायम ठेवणे, ही त्यांच्या नेतृत्वाची ठळक बाजू मानली जाते. अनेक वर्षे जनसेवेचे काम व्रत म्हणून सुरू ठेवलेल्या सुरेशदादांना विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. ‘पदापेक्षा काम आणि राजकारणापेक्षा समाजसेवा’ या भावनेतून वाटचाल करणाऱ्या सुरेशदादा सराफ यांच्याकडे भविष्यात व्यापक लोकप्रतिनिधित्वाची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबाने हिंगोली नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या परंपरेला आधुनिक काळातील सामाजिक कार्याची जोड देत सुरेशदादा पुढे जात आहेत. त्यामुळे कृतिशील, बहुआयामी आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची वाटचाल हिंगोलीच्या सामाजिक-राजकीय पटलावर लक्षवेधी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT