ऊस आंदोलनासाठी ‘स्वाभिमानी’ची तयारी
बीड ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शुक्रवारी संघटनात्मक बैठक श्रीक्षेत्र संस्थान, रामगड येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यात संघटनेची पुनर्रचना, शाखा विस्तार आणि सभासद नोंदणीचा निर्णय घेण्यात आला. आगामी ऊस आंदोलनात बीड जिल्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, जयसिंगपूर येथे येत्या १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या २१ व्या ऊस परिषदेला शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावर ऊस परिषदेचे पोस्टर लावून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांचे म्हणणे ३ तास ऐकून घेण्यात आले.
-----
बीड आणि माजलगाव तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
बीडडः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बीड तालुका अध्यक्षपदी नारायण रायचंद करपे यांची तर माजलगाव युवा तालुका अध्यक्षपदी दत्ता मोरे यांची ही निवड करण्यात आली. आदेशानुसार ‘गाव चलो, कार्यकर्ता जोडो’ अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात संघटनेची बांधणी केली जाणार असून संघटनेची शाखा स्थापन केली जाणार आहे. यावेळी बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे, उपविभागीय जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन, माजी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांच्यासह घनश्याम चौधरी, अशोक भोसले, बाळासाहेब शेंडगे उपस्थित होते.
------
वाण आणि बोरणा धरणात अत्यंत कमी पाणीसाठा
परळी ः तालुक्यातील अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. नागापूर येथील वाण धरणामध्ये केवळ २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे तर बोरणा प्रकल्पात १७ टक्के पाणीसाठा उरला आहे. महसूल प्रशासनाने पाणीस्रोतांवरील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी कारवाई केली आहे. बोरणा प्रकल्पातील अनधिकृत पाणीउपशाविरुद्ध महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने पंप आणि मोटारी बंद केल्या आहेत. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी खंदवा-सावरगाव तलावातील अनधिकृत पाणीउपशावर कारवाई केली आहे. तहसीलदार विनोद रणवरे यांनी जलस्रोतांमधून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या वीज जोडण्या आणि उपकरणांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. नगरसेविका जयश्री रवींद्र गित्ते यांनी पाणीगळती तत्काळ नगर परिषदेला कळवण्याचे सांगितले आहे.
------
‘ज्ञानकुंभ सप्ताहा’ला उत्साहात सुरुवात
परळी ः पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळेत (पद्मावती व विद्यानगर) संस्थापक कै. विठ्ठलरावजी तांदळे यांच्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानकुंभ सप्ताहा’चा रविवारी शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व सामान्यज्ञान स्पर्धा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास तांदळे होते. प्रमुख पाहुणे सचिव दीपक तांदळे, सहसचिव प्रमिलाताई तांदळे, मुख्याध्यापिका माधुरी तांदळे, पर्यवेक्षक इंगळे, गायकवाड, देठणेकर व शिक्षक फड उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबर यांनी केले, तर फाजगे यांनी आभार मानले. दीपक तांदळे यांनी कै. विठ्ठलराव तांदळे यांच्या शैक्षणिक योगदानाची आठवण करून देत संस्थेतून सक्षम पिढी घडेल, असा सार्थ विश्वास व्यक्त केला.
-----
प्रहार शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी कुलकर्णी
बीडः प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी धनंजय कुलकर्णी, जिल्हा सचिवपदी अविनाश काळे यांची बिनविरोध निवड झाली. राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांनी बीडमधील जिल्हा पदाधिकारी आढावा बैठकीत घोषणा केली. बीड येथे राजगुरू यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. राज्य उपाध्यक्ष संजयजी होळकर उपस्थित होते. अंबड पतसंस्था संचालक दत्ता वाघमारे उपस्थित होते. राज्य संपर्कप्रमुख बाबुराव राजपूत उपस्थित होते. बैठकीला ज्ञानेश्वर कांगुडे, महादेव म्हात्रे, अंबादास बागलने, निर्मला वाघमारे, मनीषा पांढरे, रोहिणी चाळगे, प्रवीणा कांबळे, संगीता तिडके, बाळासाहेब वाघुले, प्रभुदास सोनवणे, सुरेश वाघमारे, अशोक ढाकणे, बाळासाहेब गावडे, सय्यद जिलानी आदींची उपस्थिती होती.
-----
कृष्णा वाघमारेला विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक
कडा ः आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द येथील श्री अखंडानंद उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कृष्णा वाघमारे याने विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदक प्राप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की, कारखेल सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने ते देखील बॉक्सिंग सारख्या स्पर्धेत यश संपादन केल्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके व विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
------
अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ः घोटे
अंबाजोगाई ः अभियंता हा संशोधन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने समाजातील महत्त्वाचा घटक आहे. कोणत्या क्षेत्रातील विकासात अभियंत्याचे महत्त्वाचे योगदान आहे. अभियंत्यांनी अद्ययावत ज्ञान, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे विचार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक राम घोटे यांनी व्यक्त केले. शनिवारी (१ ऑक्टोबर) योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णामयी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकमध्ये स्वामी रामानंद तीर्थ जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी विकसित भारतामध्ये अभियंत्यांची भूमिका विषयावर राम घोटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
------
नवीन बांधकामे टाळण्याचे पवन मुंडे यांचे आवाहन
परळी ः यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. पुढील काळात तीव्र पाणीटंचाईची शक्यता वाढली. सध्या नवीन बांधकामे टाळावीत, प्रशासनाला सहकार्य करावे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती, भाजप गटनेते प्रा. पवन मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले. शहर परिसरातील जलस्रोतांवर मोठा परिणाम झाला. भूजल पातळी लक्षणीय घटली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर येथील वाण धरणात सध्या सुमारे २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील अनेक बोअरवेलची पातळीही खालावली. सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली तर टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. पिण्याचे पाणी पुरवताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
------
तालुका आरोग्य अधिकारीपदी भगत
वडवणी ः बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. वनिता वसंतराव भगत यांची नुकतीच वडवणी तालुका आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्या रुजू झाल्यानंतर प्रहारच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार केला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. भगत यांनी शासकीय, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कार्यभार सांभाळला.
------
बेकायदेशीर विहीर खोदणाऱ्यांवर कारवाई
गेवराई ः गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात दोन शेतकरी बेकायदेशीरपणे विहिरीचे खोदकाम करत असल्याची माहिती तहसीलदार गीतांजली गरड यांना मिळाली. यावरून त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी व पाटबंधारे विभागाला कारवाईचे आदेश दिले. पथक घटनास्थळी पोहोचताच २५ फूट खोल खोदकाम करणारा चालक पोकलेन घेऊन पसार झाला. कर्मचाऱ्यांनी अवैध खोदकामाचे जिओ-टॅगिंग करून फोटो घेतले व संबंधित शेतकऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली, अशी माहिती तहसीलदार अंजली गरड यांनी दिली. दुष्काळजन्य परिस्थितीत गोविंदवाडीसह कोणत्याही तलावात बेकायदेशीर खोदकाम केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर व कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार गीतांजली गरड यांनी दिला आहे.
-----
रखडलेले काम मार्गी लावण्याची मागणी
शिरूर कासार ः तालुक्यातील शिरूर-राक्षसभुवन ते खोल्याचीवाडी या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस किशोर खोले यांनी माजी केंद्रीय मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. रस्त्याचे काम रखडल्यामुळे दुरावस्था झाली असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने, तो तातडीने पूर्ण झाल्यास सर्वांना दिलासा मिळेल. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होऊन विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित विभागामार्फत रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी किशोर खोले यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली.
--------
विपश्यना आणि ध्यानधारणा शिबिर उत्साहात
शिरूर कासार ः प्रगती सेवाभावी संस्था व शासकीय निवासी शाळा शिरूर कासार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी एकदिवसीय बुद्धिस्ट आणि विपश्यना, ध्यान धारणा शिबिराचे आयोजन झाले. सन्माननीय प्रदीप भोंगले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम झाला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मभूमी महाविहार भिक्खू बीड भंते बुद्ध बोधी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. सानप तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगती सेवाभावी संस्थेचे सचिव गणेश आळतकर, चंद्रकांत राजहंस, शाळेचे गृहपाल एस. एम. पाचे, शिक्षक चाटे, शिरसाट, वाघमारे, शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. के. फंड, विपश्यना साधक यांनी केले. आभार अशोक वाघमारे यांनी मानले.
----------
‘जलजीवन मिशनचे काम सुरू करा; अन्यथा उपोषण’
केज ः केज तालुक्यातील सातेफळवाडी, घाडगेवस्ती व डोराळेवस्ती येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २०२२ मध्ये १ कोटी ६० लाख रुपये निधीतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, चार वर्षांचा कालावधी लोटला तरी सातेफळवाडीतील हे काम अद्याप रखडलेले आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करू, असा इशारा गावातील निवृत्त शिक्षक हनुमंत बळीराम घाडगे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि ग्रामविकास मंत्री यांना देण्यात आल्या आहेत.
----------
‘शिक्षकांमुळेच सामाजिक मूल्यांची रुजवण’
आष्टी ः विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून नैतिक मूल्य, शिस्त आणि सामाजिक जाणीवा शिक्षक रुजवतात असा गौरव करत शिक्षणातून समर्पण देणारी पिढी तयार होईल, असे मत खरडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बबनराव ढाकणे यांनी व्यक्त केले. तीनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संवाद आणि मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख ढाकणे बोलत होते.
------
देवठाणा-मुंगी ते सजगणी तांडा रस्त्याच्या कामाला सुरवात
धारूर ः धारूर तालुक्यातील देवठाणा-मुंगी ते सजगणी तांडा या महत्त्वाच्या शिवरस्त्याला मंजुरी मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. आमदार प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद सभापती जयसिंग सोळंके यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. हा मार्ग दळणवळणाचा प्रमुख स्रोत आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या विकासाची मागणी होती. सरपंच भागवत दराडे यांनी आमदार सोळंके व जयसिंग सोळंके यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने अखेर रस्त्याला मंजुरी मिळाली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.