छत्रपती संभाजीनगर

शालार्थ घोटाळ्यात दोन हजारांवर शिक्षकांच्या मान्यतांवर संशय

CD
शालार्थ घोटाळ्यात दोन हजारांवर शिक्षकांच्या मान्यतांवर संशय ----- कारवाईकडे लक्ष; विभागातील १५ हजारांवर संचिकांची एसआयटीकडून तपासणी ----- उद्धव भा. काकडे छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : बोगस शिक्षक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी वेतन-अनुदान लाटल्याच्या संशयाने शिक्षण विभागातील गैरव्यवहाराचे जाळे उघड झाले असताना आता कारवाईच्या टप्प्यावर प्रशासनाची कसोटी लागली आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील १३२ शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागात दोन हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियुक्त्या आणि वैयक्तिक मान्यता संशयाच्या भोवऱ्यात असताना, चौकशीनंतर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात २०१९ ते २०२५ या कालावधीतील शालार्थ आयडी प्रकरणांच्या तपासणीसाठी सुमारे १४ हजार संचिका विचाराधीन होत्या. त्यापैकी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडील १० हजार ६० संचिकांची सप्टेंबरमध्ये विशेष तपास पथकाने (एसआयटी) पंचतारांकित पाहुणचारात तपासणी केली. तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडील चार हजार ७५ संचिकांपैकी सुमारे एक हजार संचिकांचीही छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत संबंधित नियुक्त्या आणि मान्यतांमधील अनियमितता अजूनही तपासली जात आहे. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये घोटाळ्याच्या तपासाचा पुढील टप्पा म्हणून २०१६ ते २०१९ या कालावधीतील संचिकांची पडताळणी थेट पुण्यातून करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,७६४ संचिका पुण्यातील शिक्षण संचालनालयाकडे मागविल्या होत्या. यामध्ये प्राथमिक विभागाच्या ७६१ आणि माध्यमिक विभागाच्या ९०३ संचिकांचा समावेश आहे. या संचिकांच्या पडताळणीतून नियुक्त्या आणि वैयक्तिक मान्यतांबाबतचे आक्षेप तपासले जात आहेत. ---- ७४२ शाळांच्या नोंदींची तपासणी जिल्ह्यातील सुमारे ७४२ शाळांच्या नोंदी आणि मान्यता प्रक्रियेची तपासणी एसआयटीने केली. यात बनावट मंजुरीपत्रे, संशयास्पद जावक क्रमांक आणि संचमान्यतेतील अनियमिततेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शाळांकडून कागदपत्रे मागविली होती. प्रत्यक्ष विद्यार्थीसंख्या आणि मंजूर तुकड्यांबाबतही ही पडताळणी महत्त्वाची ठरली आहे. मात्र, तपासणीच्या कक्षेत असलेल्या कोणत्या शाळांमध्ये अनियमितता झाली, हे अजून समोर आलेले नाही. ---- नाशिकच्या धर्तीवर कारवाई होणार? नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यातील १३२ शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्याचे आदेश प्राप्त झाले असून, संबंधित शिक्षक, संस्थाचालक आणि तत्कालीन मुख्याध्यापकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागात मान्यता रद्द करण्याचे आदेश, वेतन अनुदान रोखण्याची कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याबाबतच्या निर्णयांकडे लक्ष लागले आहे. ---- आदेश अप्राप्त, अधिकाऱ्यांचा दावा जळगावच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर विभागात वैयक्तिक मान्यता रद्दप्रकरणी आदेश प्राप्त झाले आहेत का, हे जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’ने उपसंचालक कैलास दातखीळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी अद्याप शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता रद्दसंदर्भात शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. ---- एसआयटीकडे संचिका पाठविण्यापूर्वी त्रुटींची पूर्तता? एसआयटीच्या पथकाकडे तपासणीसाठी संचिका पाठविण्यापूर्वीच शिक्षण उपसंचालक कार्यालयासह प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शालार्थ आयडी आणि शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांशी संबंधित बिंदू नामावली, सेवासातत्य आदी कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता करून घेण्यासाठी संबंधित संस्थाचालक आणि शिक्षकांना वेळ दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटीकडे संचिका पाठविण्यापूर्वीच कागदपत्रे दुरुस्त करून घेण्याची संधी दिली गेली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT