अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा असहकार
---
सर्व प्रशासकीय व्हॉट्सॲप समुहांतून ‘एक्झिट’ करत अनोखे आंदोलन
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : प्रशासकीय व्हॉट्सॲप समुहांचा वाढता वापर आणि शिक्षकांवर पडणारा अशैक्षणिक कामांचा ताण याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (ता. १८) सकाळी दहाला जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरीय प्रशासकीय व्हॉट्सॲप समुहांतून बहुतांश शिक्षक एकाच वेळी बाहेर पडले आणि त्यांनी आपली भूमिका प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट केली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी ठरलेल्या वेळेत कोणतीही तडजोड न करता प्रशासकीय समुहांतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी दहाला अनेक शिक्षकांनी ‘लेफ्ट’ होत या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतरही समुहातून बाहेर पडण्याचे सत्र सुरूच राहिले. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, अध्यापनाव्यतिरिक्त ऑनलाइन माहिती संकलन, विविध अहवाल, सर्वेक्षणे आणि प्रशासकीय कामांमध्येच त्यांचा मोठा वेळ खर्च होतो. त्यातच वारंवार येणारे प्रशासकीय संदेश, शाळाबाह्य यंत्रणांकडून होणारी पाहणी आणि पूर्वसूचना न देता होणाऱ्या कारवायांमुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘प्रत्यक्ष कृतीशिवाय वक्तव्याला अर्थ नाही’, असे सांगत हिवाळे स्वतः जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावरील आठ प्रशासकीय समुहांतून बाहेर पडले. केंद्रीय मुख्याध्यापकाचा अतिरिक्त पदभार असतानाही त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
--
अध्यापनासाठी पुरेसा वेळ द्या
शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशैक्षणिक कामांचा ताण कमी करावा आणि कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त प्रशासकीय माहिती मागवणे टाळावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.