टेक इनोव्हेशन हब बदलेल मराठवाड्याचे चित्र
---
((((इंट्रो-१)))
छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व म्हणून प्रशांत विजय देशपांडे यांची ओळख आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या देशपांडे यांना माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी सेवा, डिजिटल सोल्युशन्स आणि जागतिक व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. वर्ष १९९० मध्ये त्यांनी एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्सची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने भारतासह युरोप आणि अमेरिकेत व्यवसाय विस्तार केला. वर्ष २०२१ मध्ये फ्रान्समधील आल्टेन समूहाने कंपनीचे अधिग्रहण केले. त्यानंतर वर्ष २०२४ मध्ये त्यांनी आल्टेन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सध्या ते आरोग्यसेवा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रांत नवकल्पना विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) या संस्थांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. ‘छत्रपती संभाजीनगर फर्स्ट’चे माजी अध्यक्ष म्हणून ‘सिटी बिफोर सेल्फ’ या भावनेतून त्यांनी शहराच्या विकासासाठी योगदान दिले. सध्या ते मराठवाडा ॲक्सेलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक) आणि देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संचालक आहेत.
---
(((इंट्रो-२)))
छत्रपती संभाजीनगरने गेल्या पाच दशकांत उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आता पुढील दोन दशकांत मराठवाड्याला जागतिक स्तरावरील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र बनविण्याची संधी आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन, डिझाइन, ॲग्रीटेक, मेडटेक, प्रगत उत्पादन, स्टार्टअप्स आणि बौद्धिक संपदा निर्मितीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्थानिक तरुणांच्या कौशल्याला योग्य संधी, उद्योग-शिक्षण संस्थांचा समन्वय आणि स्वतंत्र तंत्रज्ञान केंद्राची जोड मिळाल्यास पुढील २० वर्षांत दहा हजार टेक स्टार्टअप्स आणि पाच लाख रोजगार निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट गाठता येऊ शकते.
---
‘गेल्या ५० वर्षांत छत्रपती संभाजीनगर देशातील उत्पादन क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आता पुढील दोन दशकांत या शहराला जगातील महत्त्वाचे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी संशोधन, डिझाइन, कृत्रिम बुद्धिमत्ता, अभियांत्रिकी आणि बौद्धिक संपदा निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होऊ शकतील’, अशी खात्री उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्रातील अभ्यासक आणि सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी व्यक्त केली.
इंजिनिअर असल्याने वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात उतरण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या; मात्र एका वेगळ्या वळणामुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात उतरून एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्स ही मराठवाड्यातील सुरवातीच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक कंपनी स्थापन करून जगभर ठसा उमटवणाऱ्या देशपांडे यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या भविष्यातील प्रगतीवर प्रकाश टाकला. काही अपेक्षाही व्यक्त केल्या.
ते म्हणाले, ‘‘एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन्सच्या माध्यमातून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम छत्रपती संभाजीनगरात सुरू केल्यानंतर वर्ष २००० मध्ये अमेरिकेत पहिले काम मिळाल्यावर जागतिक दर्जाचे काम करू शकतो असा विश्वास निर्माण झाला. वर्ष २००४ मध्ये अमेरिकेत कंपनी स्थापन केली. वर्ष २०१२ मध्ये पुण्यातील एक कंपनी विकत घेतली. मग २०१६ मध्ये जर्मनीतील सीमोर या कंपनीबरोबर भागीदारी मध्ये ईसी मोबिलिटी कंपनी संभाजीनगर येथे स्थापन केली. स्वयंचलित वाहनांसाठीच्या तंत्रज्ञानावर काम केले. मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, बॉश, कॉन्टिनेन्टल अशा ग्राहक कंपन्यांसाठी काम केले. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, ॲनोटेशन, टेस्टिंग, व्हॅलिडेशन अशा विविध सेवा आम्ही पुरवायचो. हे सारे छत्रपती संभाजीनगरमधील मनुष्यबळाचा वापर करून केले. मराठवाड्यातील गुणवंत तरुण बहुतांशी पुण्याला जातात. तिथे शिक्षण घेऊन देशात आणि परदेशात विविध ठिकाणी जातात. येथे उपलब्ध असलेल्या तरुणांमधूनच आम्ही कर्मचारी निवडले आणि त्यांच्याकडून हे सर्व काम करून घेतले. यावरून येथील तरुण कौशल्य आणि गुणवत्तेत मुळीच मागे नाहीत, हे दिसते. त्यांना आवश्यकता आहे ती फक्त योग्य संधीची.’’
----
हे करायला हवे
वर्ष २०२६ पासून मराठवाड्याच्या पुढच्या विकासाचे टप्पे काय हवेत, हे सांगताना देशपांडे म्हणाले, ‘‘कृषी क्षेत्रात सध्या आपण कापूस, सोयाबीन, डाळी आणि बियाणांच्या उत्पादनात पुढे आहोत. आता त्यात एआय-संचालित अचूक शेती, हवामानाशी सुसंगत स्मार्ट शेती करण्यासोबत जागतिक दर्जाचे कृषी तंत्रज्ञान (ॲग्रीटेक) विकसित करणे आणि बियाणांच्या नवकल्पनांचे केंद्र बनवणे, याची भर घालायला हवी. उत्पादन क्षेत्रात पुढील काळात अत्याधुनिक आणि प्रगत उत्पादन प्रणाली, रोबोटिक्स आणि निर्यात यावर भर असायला हवा. सेवा क्षेत्रात ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना द्यावी लागेल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मेडटेक, ॲग्रीटेक, इंजिनिअरिंग डिझाइन आणि डीप टेक यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आरोग्य क्षेत्रात हेल्थटेक, मेडटेक आणि मेडिकल टुरिझममध्ये मोठी संधी आहे. शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र संशोधन विद्यापीठे स्थापन करण्यासोबतच नवकल्पनांना आणि उद्यमशीलतेला पाठबळ देणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. पर्यटन क्षेत्रात अजिंठा, वेरूळ ही जागतिक वारसा स्थळे आणि इतर अनेक पर्यटनस्थळांची देखभाल व संवर्धन करण्यासोबतच या ठिकाणांना केवळ स्थळदर्शनापुरते मर्यादित न ठेवता पर्यटकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल, अशा पद्धतीने विकसित करावे. तसेच इको-टुरिझम, वेलनेस टुरिझम आणि डिजिटल टुरिझमवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे केल्यास मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि संबंधित क्षेत्राचा हिस्सा १५ ते १८ टक्के, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राचा हिस्सा ३२ ते ३५ टक्के आणि सेवा क्षेत्राचा वाटा ४७ ते ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल. तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्राचे योगदानही लक्षणीय वाढून विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये मिळून ८ ते १० टक्क्यांपर्यंत पोचू शकेल.’’
----
स्टार्टअपचे भविष्य उज्ज्वल
देशपांडे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात स्टार्टअप्सचे भविष्य उज्ज्वल आहे. येथे गुणवत्ता आणि कौशल्य भरपूर आहे. येथील तरुणच बाहेर जाऊन पेटंट आपल्या नावावर नोंदवतात. मग इथल्याच तरुणांनी पुढे येऊन त्यात झेप का घेऊ नये? मॅजिक संस्थेच्या माध्यमातून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कल्पना मागवल्या होत्या. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यातील निवडक कल्पनांवर काम झाले आणि अनेक स्टार्टअप्स सुरू झाली. याशिवाय स्वतंत्रपणे मेहनत घेऊन सुरू झालेली स्टार्टअप्स आहेत. पुढील २० वर्षांत १० हजार टेक स्टार्टअप्सचे लक्ष्य ठेवायला हवे. त्यातून किमान पाच लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता विकसित करता येऊ शकते. यासाठी उद्योग, तंत्रज्ञानविषयक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांनी मिळून काम करायला हवे. त्यासाठी एक स्वतंत्र टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हब विकसित करण्याची गरज आहे.’’
---
मराठवाडा १.० ते ६.०
देशपांडे यांनी मराठवाड्याचा १९८६ ते २०४७ या कालावधीतील विकासाचा प्रवास आणि भविष्यातील वाटचाल यांची सहा टप्प्यांत संकल्पनात्मक मांडणी केली आहे. त्यात आतापर्यंत झालेली प्रगती आणि पुढील काळातील अपेक्षित विकासाची दिशा स्पष्ट केली आहे.
१.० | वर्ष १९८६–१९९५
कृषी, वारसा, पर्यटन आणि औद्योगिकीकरणाचा प्रारंभ.
--
२.० | वर्ष १९९६–२००५
झपाट्याने झालेले औद्योगिकीकरण आणि उत्पादन क्षेत्रातील वाढ.
--
३.० | वर्ष २००६–२०१५
उत्पादन क्षेत्रात मुसंडी; ऑटोमोटिव्ह, औषधनिर्मिती, मद्यनिर्मिती, कृषी आणि निर्यात क्षेत्रांचा विस्तार.
--
४.० | वर्ष २०१६–२०२५
ईव्ही परिसंस्थेचा विकास, औद्योगिक कॉरिडॉर आणि प्रमुख पायाभूत सुविधांची निर्मिती.
--
५.० | वर्ष २०२६–२०३५
ज्ञान, गुणवत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून विकास.
--
६.० | वर्ष २०३६–२०४७
जागतिक दर्जाचे अभियांत्रिकी, उत्पादन आणि तंत्रज्ञान केंद्र; नवकल्पनांमध्ये नेतृत्व आणि बौद्धिक संपदा निर्मिती.