टोयोटाची ई-ड्राइव्ह निर्मितीसाठी ४६० कोटींची गुंतवणूक
---
बिदाडी प्रकल्पात नवी उत्पादन लाइन सुरू, वार्षिक क्षमता ३.६ लाख युनिटवर
---
छत्रपती संभाजीनगर, ता. १६ : टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्टने (टीकेएपी) कर्नाटकातील बिदाडी येथील प्रकल्पात ई-ड्राइव्ह निर्मितीसाठी ४६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या नव्या उत्पादन लाइनचे सोमवारी (ता. १६) उद्घाटन झाले. यामुळे कंपनीची ई-ड्राइव्ह निर्मिती क्षमता वार्षिक दोन लाख युनिटने वाढून तीन लाख ६० हजार युनिटवर पोचली.
कर्नाटक सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. एस. सेल्वकुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या उपाध्यक्ष मानसी टाटा आणि टीकेएपीचे व्यवस्थापकीय संचालक तबरेज अहमद उपस्थित होते. नवीन लाइनमध्ये भारत सरकारच्या वाहन उद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत अधिसूचित प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान श्रेणीतील उत्पादने तयार होतील.
टोयोटाच्या हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या ई-ड्राइव्हची निर्मिती येथे होणार आहे. वर्ष २०२२ मध्ये सुरू झालेल्या चौथ्या पिढीच्या ई-ड्राइव्ह लाइनसोबत ही नवीन लाइन कार्यरत राहील. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्थानिक पुरवठादारांचे जाळे आणि कुशल मनुष्यबळ विकसित होण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प टोयोटा समूहातील कंपन्या आणि कर्नाटक सरकार यांच्यातील चार हजार ८०० कोटींच्या सामंजस्य कराराचा भाग आहे. हा करार अत्याधुनिक उत्पादन, स्थानिकीकरण, रोजगारनिर्मिती आणि हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे; संपूर्ण गुंतवणूक केवळ या उत्पादन लाइनसाठी नाही.
टोयोटाने जगभरात ३.६८ कोटींहून अधिक हायब्रीड वाहने विकली आहेत. भारतातील सेल्फ-चार्जिंग हायब्रीड तंत्रज्ञानामुळे बाह्य चार्जिंगशिवाय ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत अधिक इंधन कार्यक्षमता मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. विविध इलेक्ट्रिक आणि पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञानांचा विस्तार करण्याच्या धोरणाचाही कंपनीने पुनरुच्चार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.