अँकर
---
तुळजापूरसाठी दररोज धावणार २५० बस
-----
आश्विनी यात्रेसाठी महामंडळाचे सहा लाख ६४ हजार किलोमीटर प्रवासाचे उद्दिष्ट
-----
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. ५ : श्री तुळजाभवानी देवीच्या आगामी आश्विनी यात्रेनिमित्त भाविकांची गैरसोय टळावी, यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या धाराशिव विभागाकडूनदेखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेच्या मुख्य काळात म्हणजेच पंचमी ते नवमीदरम्यान दररोज २५० जादा बस धावणार असून, संपूर्ण यात्राकाळात तब्बल सहा लाख ६४ हजार ८०० किलोमीटर प्रवासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आश्विनी यात्रेसाठी जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या जिजाऊ बस अधिक सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे अधिक संख्येने प्रवाशांना प्रवास करणे शक्य होणार आहे.
तिथीनिहाय बसफेऱ्यांचे नियोजन
यात्रेच्या टप्प्यानुसार भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाने टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढवली आहे.
- प्रारंभिक टप्पा (एकादशी ते चतुर्दशी/६ ते ९ ऑक्टोबर) : यात्रेच्या सुरवातीला दररोज ४३ ते ७० बसद्वारे सेवा दिली जाईल.
- सर्वपित्री अमावास्या व घटस्थापना (१० व ११ ऑक्टोबर) : अमावास्येला १०५ बस, तर घटस्थापनेच्या (प्रतिपदा) दिवशी १६५ बस प्रवाशांच्या सेवेत असतील.
- द्वितीया ते चतुर्थी (१२ ते १५ ऑक्टोबर) : या काळात गर्दीचा आलेख वाढणार असून, दररोज १७० ते १९० बस चालविल्या जातील.
- गर्दीचा मुख्य टप्पा (पंचमी ते नवमी/१६ ते २० ऑक्टोबर) : ललित पंचमी, महासप्तमी, दुर्गाष्टमी आणि महानवमी या मुख्य दिवसांमध्ये दररोज २०० जादा बस धावतील. यादरम्यान रोज सुमारे ६० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- दसरा/सीमोल्लंघन (२१ ऑक्टोबर) : दसऱ्याच्या दिवशी भाविकांचा परतीचा प्रवास सुकर करण्यासाठी २३ विशेष बस नियोजित आहेत.
-----
कर्नाटक व सोलापूर मार्गावर विशेष भर
राज्यासह लगतच्या कर्नाटकातून येणाऱ्या हजारो भाविकांची सोय व्हावी, यासाठी कर्नाटक सीमा भाग, सोलापूर व इतर मार्गांवर विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण बसफेऱ्यांमध्ये दररोज सुमारे ९५ बस कर्नाटक मार्गावर, तर तब्बल १०५ बसेस सोलापूर व इतर स्थानिक मार्गांवर धावणार आहेत.
---
आगारनिहाय सहभाग व योगदान
यात्रेसाठी धाराशिव विभागातील सर्वच आगारांनी कंबर कसली आहे.
- उमरगा आगार : यात्रेच्या मुख्य दिवसांत दररोज सर्वाधिक ३५ बस उमरगा आगारातून सुटतील.
- तुळजापूर आगार : मुख्य केंद्र असलेल्या तुळजापूर आगारातून सर्वाधिक ४० बसचे रोजचे नियोजन आहे.
- धाराशिव व कळंब आगार : धाराशिव आगारातून दररोज ३५ बस, तर कळंब आगारातून ३५ बस सेवा देतील.
- भूम व परंडा आगार : भूम आगारातून दररोज ३० बस व परंडा आगारातून २० बस धावतील.
----
प्रवाशांच्या सुविधेसाठी यंत्रणा सज्ज
आश्विनी यात्रा काळात प्रवाशांना सुरक्षित व विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी मुख्य बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी, वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. भाविकांनी खासगी वाहनांचा त्रास टाळून एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-----
एनसीएमसी कार्ड नसल्यास फुल्ल तिकीट
महामंडळाकडून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवार (ता. एक) पासून महिला प्रवाशांसाठी असणारी ‘महिला सन्मान योजना’ (५० टक्के सवलत) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी सवलत/मोफत प्रवास योजनेचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड असणे बंधनकारक असेल. जे महिला व ज्येष्ठ नागरिक हे स्मार्ट कार्ड सादर करणार नाहीत, त्यांना तिकीट दरातील सवलतीचा लाभ मिळणार नसून पूर्ण दराचे (फुल्ल) तिकीट खरेदी करावे लागणार आहे.