जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदगीरमध्ये घोडेबाजार?
--
विविध आमिषे दाखवून मतदान मिळविण्याच्या हालचालींना वेग; दुष्काळात सोसायटी मतदारांची दिवाळी जोरात
--
युवराज धोतरे
उदगीर, ता. ६ : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले असून, उदगीर तालुका सोसायटी मतदारसंघात राजकीय चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच मतदारांना विविध आमिषे दाखविणे, आर्थिक व्यवहारांची आश्वासने देणे आणि मतांची जुळवाजुळव करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सोसायटी मतदारांची दिवाळी मात्र जोरात सुरू असल्याची उपरोधिक चर्चा ऐकायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उदगीर तालुका मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदारांनी कौल दिला आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उदगीर तालुक्यातील सोसायटी मतदारांनी सातत्याने काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी केले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेससाठी पारंपरिकदृष्ट्या अनुकूल मानला जातो.मात्र, अलीकडच्या काही वर्षांत देशमुख कुटुंबाचा उदगीरमधील राजकीय संपर्क आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता कमी झाल्याने काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे स्थानिक संघटनात्मक पातळीवर पक्षासमोर आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसमधील ही राजकीय पोकळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कितपत परिणामकारक ठरणार, याबाबत उत्सुकता आहे.
या पार्श्वभूमीवर दिलीपराव देशमुख यांनी उदगीरमध्ये बैठक घेऊन महाविकास आघाडीकडून प्रीती चंद्रशेखर भोसले यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र, काँग्रेसमधील काही ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ही उमेदवारी दिल्याने त्याचा फायदा प्रतिस्पर्धी उमेदवाराला होणार का0, तसेच पारंपरिक मतदार काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार का, हे निकालातून स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे महायुतीच्या वतीने बसवराज पाटील कोळखेडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उदगीर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला अनुकूल वातावरण असल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे. मात्र, उदगीर तालुका भारतीय जनता पक्षात गेल्या काही काळापासून अंतर्गत गटबाजीची चर्चा सातत्याने होत आहे. स्थानिक राजकारणातील विविध गटांचे हितसंबंध, नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची भूमिका याचा परिणाम उमेदवाराच्या विजयाच्या गणितावर होऊ शकतो. पक्षातील सर्व गटांना एकत्र आणून मतांची बेरीज करण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर असणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीने मिळविलेल्या राजकीय ताकदीचे रूपांतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतांमध्ये होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे मतदारांना दिल्या जात असल्याची चर्चा असलेली आर्थिक प्रलोभने. उदगीर तालुक्यातील ६२ सोसायटी मतदारांपैकी तब्बल ४८ मतदारांना एका गटाकडून ‘टोकन’ दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविली जात असल्याच्या चर्चेमुळे सहकार क्षेत्रातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकीकडे तालुक्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत, तर दुसरीकडे अवघ्या ६२ मतदारांच्या निवडणुकीत मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात, काँग्रेसचा पारंपरिक गड कायम राहतो की महायुती परिवर्तन घडवते, तसेच अंतर्गत नाराजी आणि कथित घोडेबाजाराचा निकालावर काय परिणाम होतो, याचे उत्तर निवडणूक निकालानंतरच मिळणार आहे.
उदगीरच्या मतदारसंघात ६२ मतदार
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उदगीर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात एकूण ६२ मतदार आहेत. मतदारांची संख्या मर्यादित असल्यामुळे प्रत्येक मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अवघ्या ६२ मतांवर विजयाचे गणित अवलंबून असल्याने दोन्ही बाजूंकडून मतदारांशी संपर्क वाढविण्यात येत आहे. बैठकांचे सत्र, वैयक्तिक भेटीगाठी आणि पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.