रायझिंग मराठवाडा ः उमेश दाशरथी
---------
कंपनी कर्मचारी ते उद्योजक
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेश दाशरथी यांनी बजाज ऑटोमधून आपले करिअर सुरू केले. नोकरीतील एकसुरीपणामुळे त्यांनी उद्योगक्षेत्रात उतरायचे ठरवले. पहिला व्यवसाय पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानंतर काही काळ अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापन केले. पण, मन व्यवसायातच रमले. शेवटी केवळ पाच हजार रुपयांच्या साधनसामग्रीवर स्कूटर गॅरेज सुरू केले. तेथूनच त्यांच्या उद्योग प्रवासाची खरी सुरवात झाली. वर्ष १९९३ मध्ये बजाज ऑटोने काही उत्पादन प्रक्रिया बाहेर देण्यास सुरवात केली आणि तेथूनच दाशरथी यांच्या उत्पादन उद्योगाला दिशा मिळाली. आज त्यांच्या उद्योग समूहाचे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या चार राज्यांत ११ उत्पादन प्रकल्प आहेत. त्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी सुटे भाग तयार केले जातात. देशातील जवळपास सर्व प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत.
----------------
‘समृद्धी महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगरचा मुंबईशी संपर्क सुधारला आहे; पण शहरांतर्गत रस्ते, औद्योगिक क्षेत्रांमधील जोडणी, विमानसेवा आणि लॉजिस्टिक्स यामध्ये अजून मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणे आवश्यक आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही उद्योग वाढू शकतो. आजची कनेक्टिव्हिटी ही पुढील विकासाचा पाया आहे. उद्योग केवळ कारखाना नव्हे; शहराच्या विकासाची चळवळ आहे’, असे मत ऋचा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक उमेश दाशरथी यांनी व्यक्त केले.
-----------
एकेकाळी औद्योगिक संघर्ष, कामगार आंदोलन आणि अस्थिर औद्योगिक वातावरणासाठी ओळखले जाणारे छत्रपती संभाजीनगर आज देशातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक केंद्रांपैकी एक ठरत आहे. या परिवर्तनाचा जवळून अनुभव घेतलेले दाशरथी सांगतात, ‘‘छत्रपती संभाजीनगरची औद्योगिक वाटचाल आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. टोयोटा, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि नवतंत्रज्ञान यामुळे शहराची ओळख अधिक बळकट होणार आहे; मात्र यासाठी उद्योग, प्रशासन आणि समाज यांची संयुक्त जबाबदारी कायम राहणे तितकेच आवश्यक आहे. शहराची औद्योगिक प्रगती ही एका दिवसात घडलेली नाही. त्यासाठी उद्योग, कामगार संघटना आणि प्रशासन या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. त्याचेच फळ आज संभाजीनगरला मिळत आहे. वर्ष १९८० च्या दशकात औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) औद्योगिकदृष्ट्या मागास नव्हते.
बजाज, एपीआय, लुपिन, गरवारे, ओखार्ड, रमणा इंजिनिअरिंग, काइनेटिक यांसारख्या नामांकित उद्योगांनी शहराची औद्योगिक ओळख निर्माण केली होती. मात्र, त्या काळातील औद्योगिक संबंध अत्यंत तणावपूर्ण होते. कामगार आंदोलन, संप आणि हिंसक घटनांमुळे अनेक गुंतवणूकदार मागे हटत होते.
------------
नव्या उद्योगांसाठी अजूनही अनेक अडथळे
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’चा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात उद्योग सुरू करणे अजूनही सोपे नसल्याचे दाशरथी स्पष्टपणे सांगतात; कारण उद्योग सुरू करण्यासाठी सर्वप्रथम जमीन उपलब्ध होत नाही. उपलब्ध जमीन अत्यंत महाग आहे. त्यानंतर परवानग्या, वीजजोडणी, ताबा मिळणे अशा प्रक्रियांमध्ये महिनोन्महिने जातात. त्यामुळे उद्योजकाचा उत्साहच कमी होतो. चीनसारख्या देशांमध्ये ‘प्लग अँड प्ले’ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भारतातही अशा सुविधा मोठ्या प्रमाणावर उभ्या राहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
------------
कुशल मनुष्यबळाचा वाढता तुटवडा
उद्योग वाढत असताना कुशल मनुष्यबळाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेपेक्षा निकालाला अधिक महत्त्व दिले जात असल्याने प्रत्यक्ष उद्योगांना आवश्यक कौशल्य असलेले विद्यार्थी कमी प्रमाणात तयार होत आहेत. विद्यार्थ्यांची क्षमता कमी नाही; मात्र शिक्षण पद्धतीत वास्तववादी बदल आवश्यक आहेत. केवळ पदवी नव्हे; तर कौशल्य, जिज्ञासा आणि प्रत्यक्ष काम करण्याची तयारी निर्माण करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे दाशरथी यांनी सांगितले.
-----------
एआय आणि रोबोटिक्सकडे उद्योगांची वाटचाल
पुढील पाच वर्षांत उत्पादन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यांच्या मते, पुनरावृत्तीची कामे पूर्णपणे स्वयंचलित होतील. मात्र, त्यामुळे रोजगार पूर्णपणे संपणार नाहीत; त्याऐवजी कौशल्यांचे स्वरूप बदलेल. एआयचा प्रभावी वापर करणारे कर्मचारीच भविष्यात अधिक महत्त्वाचे ठरतील.
-----------
स्थलांतरित कामगारांसाठी सुविधा आवश्यक
संभाजीनगरसारख्या औद्योगिक शहरात स्थलांतरित कामगारांसाठी निवास, स्वस्त वसतिगृहे, रेशन आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा झोपडपट्ट्या, सामाजिक असंतोष आणि गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते. उद्योगवाढीसोबत सामाजिक पायाभूत सुविधांवरही तितकाच भर दिला पाहिजे, असे मत दाशरथी यांनी व्यक्त केले.
---------
औद्योगिक संबंधांतील मोठा बदल
गेल्या पंचवीस वर्षांत संभाजीनगरच्या औद्योगिक संस्कृतीत मोठा सकारात्मक बदल झाला. उद्योग, कामगार संघटना आणि प्रशासन यांनी संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला. आज मतभेद असतात. पण, सकारात्मक चर्चेतून सोडवले जातात. याच बदलामुळे टोयोटा, अथर, जिंदालसारख्या मोठ्या उद्योगांनी संभाजीनगरची निवड केली. मोठ्या उद्योगांसाठी केवळ जमीन किंवा सुविधा महत्त्वाच्या नसतात; तर औद्योगिक शांतता हेही मोठे कारण असते, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.