युनो मिंडाचा अलॉय व्हीलचा ७९२ कोटींचा प्रकल्प
---
वार्षिक १८ लाख चाकांची असेल क्षमता ः एप्रिल ते सप्टेंबर २०२७ दरम्यान उत्पादनाचे उद्दिष्ट
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १२ : वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणाऱ्या युनो मिंडा लिमिटेडने छत्रपती संभाजीनगरमध्ये चारचाकी वाहनांसाठी अलॉय व्हील निर्मितीचा नवीन प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी ७९२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे वर्षाला १८ लाख अलॉय व्हील तयार होणार आहेत. पुढील चार वर्षांत विविध टप्प्यांत प्रकल्पाची उभारणी करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने ५ फेब्रुवारीला या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला मंजुरी दिली होती. त्यावेळी प्रकल्पासाठी ७६४ कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा अंदाज जाहीर करण्यात आला होता. नोव्हेंबर २०२६ च्या गुंतवणूकदार सादरीकरणात सुधारित प्रकल्प खर्च ७९२ कोटी रुपये नमूद करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या प्रकल्पावर ७४ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती कंपनीने दिली. या प्रकल्पात ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग (जीडीसी) आणि लो प्रेशर डाय कास्टिंग (एलपीडीसी) या दोन तंत्रज्ञानांचा वापर करून अलॉय व्हील तयार केले जाणार आहेत. वाहन उत्पादक कंपन्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या चाकांचे उत्पादन करण्याची क्षमता या प्रकल्पात विकसित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत उत्पादन क्षमता वाढविण्यात येणार आहे. युनो मिंडाच्या देशभरातील चारचाकी अलॉय व्हील उत्पादन क्षमतेत या प्रकल्पामुळे भर पडणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकल्पासोबतच हरियाणातील खरखोदा येथेही कंपनीचा चारचाकी अलॉय व्हील प्रकल्प आहे. या दोन्ही केंद्रांच्या विस्तारातून वाहन उद्योगातील वाढती मागणी पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे.
युनो मिंडाचा बिडकीन येथे २१० कोटी रुपयांचा ईव्ही कास्टिंग उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्ट २०२५ मध्ये झाले. या प्रकल्पासाठी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील उत्पादन आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या उत्तरार्धात सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, युनो मिंडा ऑटो इनोव्हेशन्सतर्फे चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी पॉवरट्रेन उत्पादने तयार करण्याचा ५४९ कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रकल्प प्रस्तावित असून, उत्पादन आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने सादरीकरणात म्हटले आहे.
--
संयुक्त उपक्रम
टोयोडा गोसेई आणि युनो मिंडा इंडिया (टीजीएसआयएन) संयुक्त उपक्रमाअंतर्गत ६७० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात एअरबॅग्ज, वाहनांचे अंतर्गत व बाह्य भाग, हॉसेस आणि बॉडी सीलिंग पार्ट तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पातून आर्थिक वर्ष २०२८-२९ च्या चौथ्या तिमाहीत व्यावसायिक उत्पादन सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ५ नोव्हेंबरला झालेल्या तिमाही कामगिरीच्या गुंतवणूकदारांशी झालेल्या चर्चेची माहिती शेअर बाजाराला सादर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.